दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून अनुभवलेली गुरुकृपा !

‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हे सर्वाेच्च ध्येय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आहे. या ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी हिंदुत्वाच्या विचारांचे दैनिक ‘सनातन प्रभात’, अशा वेळी चालू केले. त्या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेची कल्पना समाजालाच काय; पण आम्हालाही नव्हती. हिंदु राष्ट्रात सात्त्विकता असणार, म्हणजे रामराज्य असणार आणि या राष्ट्रात रहाण्यासाठी परात्पर गुरुदेवांनी पत्रकारितेचा गंधही नसलेल्या आम्हा साधकांना या दैनिकात सेवा करण्याची संधी दिली.

वर्ष १९९८ मध्ये साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ला प्रारंभ झाला, तर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा-सिंधुदुर्ग (४ एप्रिल १९९९), रत्नागिरी (२८ नोव्हेंबर १९९९), पश्चिम महाराष्ट्र (५ डिसेंबर १९९९) आणि मुंबई-विदर्भ (५ मार्च २०००) या ४ आवृत्त्या चालू झाल्या. कन्नड भाषेतील साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ आणि इंग्रजी अन् हिंदी भाषांतील पाक्षिक ‘सनातन प्रभात’, असा ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचा विस्तारही झाला. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीने २७ व्या वर्षात पदार्पण करत असतांना ‘सनातन प्रभात’विषयी कृतज्ञता म्हणून हा लेखप्रपंच !

दैनिकाच्या प्रारंभीच्या काळात साप्ताहिक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून वितरण, वार्ताहर आणि विज्ञापने घेणे अन् नंतर संपादकीय विभागात अशा सेवा चालू झाल्या. या सेवा करत असतांना मला शिकायला मिळालेली काही सूत्रे येथे दिली आहेत.

१. दैनिक वितरण सेवा

रत्नागिरीत सेवेला असतांना दैनिकाचा अभ्यासवर्ग घेण्यासाठी सिंधुदुर्ग आणि गोवा येथून श्री. प्रकाश मालोंडकर, डॉ. दुर्गेश सामंत आणि अन्य साधक यायचे. श्री. मालोंडकर यांनी एका अभ्यासवर्गात सांगितले, ‘‘आपण ‘सनातन प्रभात’चे वितरण कसे करतो ? अन्य दैनिकांप्रमाणे आपण का वितरण करू शकत नाही. अन्य दैनिकांचे वितरण करणारे कुठेही एस्.टी., भर रस्त्यात, चौकांत अगदी मोठ्याने ओरडून वाचकांपर्यंत दैनिक पोचवतात. आपण मात्र हळू आवाजात वाचकाच्या कानाशी जाऊन ‘दैनिक हवे का ?’, असे विचारतो. ‘आपण खणखणीत आवाजात मोठ्याने का बोलू शकत नाही ?’, याचा विचार करा.’’ यानंतर आम्ही साधकांनी तसे प्रयत्न केले. एस्.टी.त वितरण करतांना मला मात्र वेगळाच अनुभव आला. जवळ गेल्यानंतर कुणी प्रवासी दैनिक घ्यायचे; मात्र मी मोठ्याने बोललो की, कुणी लक्ष द्यायचे नाही. कदाचित् त्या वेळी उघडउघड ‘सनातन प्रभात’ घेण्याचे धाडस कुणी करत नव्हते. एकदा श्री. गुरुदास कुलकर्णी यांच्या समवेत रत्नागिरी एस्.टी. स्थानकाजवळ वितरण करण्यासाठी गेलो असता त्यांनी बोलत बोलत २० दैनिकांचे वितरण केले. मला मात्र तसे जमले नाही. मी केवळ एक-दोन जणांनाच दैनिक दिले. शेवटी त्यांनी माझ्याकडील दैनिक घेतले आणि तेही वितरित केले. शेवटी ‘वितरण करणे’, ही कलाच होती. थोड्या कालावधीत आम्ही तेही शिकलो.

श्री. संतोष गांधी

२. दैनिकात प्रारंभी झालेल्या चुका

दैनिकाच्या प्रारंभी अगदी गंभीर चुका व्हायच्या. यामध्ये एकदा ‘सनातन कार्य’ सदराला ‘अनर्थ वार्ता’ हे दुसर्‍या सदराचे नाव छापून आले. एका ठिकाणी छायाचित्राची जागा कोरीच राहिली आणि त्या रिकाम्या जागेत ‘छायाचित्र येणार आहे’, असे छापून आले. माजी संपादक डॉ. दुर्गेश सामंत अभ्यासवर्ग घेण्यासाठी रत्नागिरीत आले, त्याच वेळी पान ३ च्या ठिकाणी २ पान आणि पान २ च्या ठिकाणी ३ पान असे २ वेळा छापून आले. अशा चुका होत असतांना मनामध्ये ‘अशा चुका कशा होतात ? कुणीतरी व्यवस्थित पहायला हवे’, असे वाटायचे. त्या वेळी ‘या चुकांसाठी माझेही दायित्व आहे’, असे वाटायचे नाही; कारण त्या वेळी मी वार्ताहर म्हणून सेवा करत असे. तद्नंतर संपादकीय विभागात आल्यानंतर तेथील परिस्थिती लक्षात आली.

३. प.पू. पांडे महाराज यांनी दैनिकाच्या चुकांतून साधकांना घडवणे

रत्नागिरीतून संपादकीय विभाग देवद आश्रमात गेल्यानंतर आमच्याकडून होणार्‍या चुकांविषयी तीच तीच परिस्थिती असायची. त्या वेळी प.पू. पांडे महाराज सांगायचे, ‘‘दैनिकात चुका होतात. यात तुम्हाला कुणी बोल लावणार नाही. सर्व समाज ‘सनातन प्रभात’ला, म्हणजे प.पू. डॉ. आठवले यांनाच दोष देणार. त्यामुळे चुकीचे गांभीर्य लक्षात घ्या आणि चुका करण्याचे टाळा.’’

३ अ. प्रथम चुका कळू नयेत; असे वाटणे; परंतु नंतर चुकांच्या मुळाशी असणारा स्वभावदोष समजू लागणे : या चुकातून घडवण्यासाठी प.पू. पांडे महाराज यांनी पुष्कळ कष्ट घेतले. ते प्रतिदिन आम्हाला चुका सांगायचे. ते दैनिकातील चुका सांगायचे; म्हणून मी ते समोरून येत असतांना त्यांची गाठ पडू नये; म्हणून दुसर्‍या रस्त्याने जायचो. हेही प.पू. पांडे महाराज यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘मला टाळाल; पण देवाला कसे टाळाल, तो बघत असतोच ना !’’ त्यानंतर मात्र ते सांगतील, ते ऐकून चूक स्वीकारायचो. मनातील विचारही त्यांना सांगायचो आणि चुकांच्या मुळापर्यंत, म्हणजेच त्या चुकांमागील मूळ स्वभावदोष गृहीत धरणे, निष्काळजीपणा, विचारण्याची वृत्ती नसणे यांकडे आम्हाला जाता यायचे.

३ आ. प.पू. पांडे महाराज यांनी शिक्षेचे भय दिल्यानंतर दैनिक वेळेवर प्रसिद्धीसाठी जाऊ लागणे : देवद आश्रमातून दैनिक छापखान्यात (प्रिंटिंग प्रेसला) पाठवतांना आम्हाला रात्री ९ वाजून १० मिनिटे ही वेळ असायची. पाने वेळेत गेली, तरच छापखान्यातून ‘प्रिंटिंग’ वेळेत होऊन वितरणाच्या सर्व गाड्या वेळेत सुटायच्या. आम्ही अनेक वेळा शेवटपर्यंत सुधारणा करत रहायचो आणि पाने उशिरा, म्हणजे ९.२० ते ९.३० पर्यंत जायची. त्या वेळी सर्वत्र उशीर होऊन छापलेली इतर दैनिके घेऊन अन्य गाड्या निघून जायच्या. या वारंवार होणार्‍या चुकीवर शेवटी प.पू. पांडे महाराज यांनी आम्हाला चुकीची जाणीव करून दिली आणि सांगितले ९.१० च्या पुढे १ मिनिट झाले, तरी स्वतःलाच शिक्षा करा. शिक्षेचे भय दिल्यानंतर आम्ही सगळे सतर्क झालो आणि दैनिक वेळेतच पाठवायची आम्हाला सवय लागली, ती आजतागायत !

३ इ. कुठल्याही साधकाची चूक असली, तरी ती ‘माझी चूक आहे’, असे वाटण्यासाठी प.पू. पांडे महाराज यांनी साधना वाढवण्याचा, म्हणजेच स्वतःमध्ये व्यापकत्व आणण्यास सांगणे : काही प्रसंगांत ‘कुणी चूक केली ?’, असे प.पू. पांडे महाराज यांनी विचारल्यावर मी लगेच दुसर्‍या साधकाचे नाव सांगायचो. मग ते म्हणायचे, ‘‘तू चूक करतच नाहीस ना ? तुझ्या चुका कशा होतील म्हणा ? तू अगदी परिपूर्ण आहेस !’’ त्या वेळी आपण प्रत्येक चुकीला उत्तरदायी असतो, हेही ते सांगत. ते नेहमी सांगायचे, ‘‘दैनिकात पूर्ण चैतन्य केव्हा येणार ? दैनिकात एकही चूक नसेल, त्या वेळी चैतन्य येईल. हे कार्य चैतन्यावर चालू आहे. चैतन्य असेल, तर चुका होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही साधना वाढवा.’’

प.पू. पांडे महाराजांनी दैनिकातील शब्दब्रह्माची जाणीव करून देत ते चैतन्यमय करण्याचे महत्त्व सांगणे

परात्पर गुरु पांडे महाराज

प.पू. पांडे महाराज अन्य दैनिक आणि ‘सनातन प्रभात’मध्ये मुख्य भेद सांगतांना म्हटले की, अन्य दैनिक रज-तमप्रधान अधिक बातम्या देतात आणि त्यांचे लिखाण हे मायेशी बद्ध करणारे असते. यामुळे मन आणि बुद्धी यांवर आवरण येते आणि त्यात नकारात्मकता जाणवते. त्यांचा केवळ व्यापारी दृष्टीकोन असल्यामुळे ‘पैसा कसा मिळेल ?’, याकडेच त्यांचे लक्ष असते. ‘वाचकांचे काय होईल ?’, याचे त्यांना देणे-घेणे नसते. त्यामुळे ती केवळ रद्दीच असते.

‘सनातन प्रभात’मध्ये लिखाण प्रसिद्ध करत असतांना ‘वाचक मायेशी बद्ध होणार नाहीत’, याची काळजी घेतली जाते. या दैनिकातून साधकांच्या अनुभूती प्रसिद्ध केल्या जातात. त्यातून भगवंताच्या लीलेचे दर्शन घडते. यामुळे हे दैनिक वाचकांना मायेतील ब्रह्म दाखवते. वाचकांना आवश्यक ते लिखाण आणि नवीन शिकण्याच्या दृष्टीने लिखाण, तसेच चुकांविरहित दैनिक दिल्याने ते चैतन्यमय असते. चैतन्यमय अशा दैनिकामुळे वाचकांचे त्रासदायक आवरण निघून जाऊन त्याला आनंद मिळतो आणि वाचक नकळतपणे साधनेला लागतो. साहजिकच वाचकांचे धर्मपालन होऊ लागते आणि त्यांची ‘स्वतःमध्येच रामराज्य कसे येईल ?’, याचीही प्रक्रिया चालू होते. हे दैनिक कधीही जुने-पुराणे होत नाही, ते केवळ आणि केवळ ‘सनातन’ म्हणजे नित्य नूतन आहे. १० वर्षांनी जरी दैनिक वाचले, तरी त्यातील प्रत्येक गोष्ट साधनेला प्रवृत्त करते. दैनिकातील शब्दातील अर्थाने ब्रह्मांडावर परिणाम होतो आणि सर्वत्र चैतन्य पसरते; म्हणून शब्द हे ब्रह्म आहे ! त्यामुळेच हे दैनिक संग्रह करण्यासारखे आहे.

पुढे आम्ही रामनाथी आश्रमात सेवा चालू केली. या वेळी आश्रमातील अनेक साधकांकडून पुष्कळ शिकायला मिळाले.

– श्री. संतोष गांधी

४. प.पू. पांडे महाराज यांनी दैनिकासाठी लिखाण करायला शिकवणे

एकदा प.पू. पांडे महाराज यांनी मला काहीतरी ‘लेखन कर’, असे सांगितले. मी म्हटले कुठल्या विषयावर लिहायचे. ते म्हटले कोणत्याही तुझ्या आवडत्या विषयावर लिही; पण चार शब्द लिही. मी तिथे बसून मला आलेले काही अनुभव लिहिले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘अरे ! अनुभव नव्हे, तू दैनिकाविषयी काहीतरी लिही.’’ शेवटी त्यांनी २ – ३ विषय सांगितले आणि त्यावरून लिहायला सांगितले. मी त्यातील एका विषयावर लेखन केले आणि त्यांना दाखवले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘आता हे छापून आणा.’’ छापून आणा म्हटल्यानंतर ‘हे कसे छापायचे ? तुम्ही एकदा बघा. काहीतरी सुधारणा असणारच ना ?’ ते म्हणाले, ‘‘ते तू काय ते बघ.’’ मी ते लिखाण श्री. संजय पालशेतकर यांना दाखवले आणि ‘प.पू. पांडे महाराज यांनी छापायला सांगितले आहे’, असे सांगितले. श्री. पालशेतकर म्हणाले, ‘‘छापूया.’’ त्यानंतर ते लिखाण आम्ही नोंद म्हणून छापले. बाबा म्हणाले, ‘‘कसे करायचे, ते लक्षात आले ना ? आता तसे लिहीत रहा.’’ त्यानंतर मी पाच-सहा लेख लिहिले आणि त्यानंतर माझी नियमितची सेवा पालटली.

५. कोरोनाच्या काळातही गुरुकृपा अनुभवणे

थोडी स्थिरता आल्यानंतर वर्ष २०२० मध्ये कोरोनाचा काळ चालू झाला. या कालावधीत रत्नागिरीतील दैनिकाचे वितरण कोलमडले. कुणी बाहेर पडायचे नव्हते, बसगाड्याही बंद झाल्या. त्यामुळे १६ एप्रिल ते १६ ऑगस्ट २०२० या ५ महिन्यांत दैनिकाची छपाई बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या कालावधीत वाचकांना प्रत्यक्ष दैनिक देता येत नव्हते; पण देवाच्या कृपेने आम्ही ‘ऑनलाईन पि.डी.एफ्.’ पाठवणे चालू केले. त्यामुळे वाचकांपर्यंत आम्ही ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून पोचलो. कोरोनाचा कालावधी संपला आणि १७ ऑगस्ट २०२० या दिवसापासून पुन्हा आवृत्ती चालू झाली; परंतु अडचणी संपल्या नव्हत्या. वितरणाची अडचण येतच होती; कारण काही बसगाड्या बंद झाल्या होत्या. त्यामुळे वितरणही घसरले. बस बंद झाल्या, त्या पुन्हा चालू होईपर्यंत ४ वर्षे गेली. त्यानंतर वर्ष २०२१ मध्ये ‘ऑनलाईन’ वर्धापनदिन झाला आणि त्यानंतर हळूहळू स्थिती सुधारत गेली. वितरणाचा फटका बसला असला, तरी विज्ञापनांचा ओघ वाढला आणि देवाने आमची आर्थिक बाजूही सांभाळली. आवृत्तीचे विशेषांक अधिक काढता आले. हे यश केवळ गुरुकृपेमुळेच प्राप्त झाले !

६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची तळमळ

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी प्रतिदिन दैनिकात दाखवलेल्या चुकांतून आम्ही पुष्कळ शिकलो. आम्ही प्रतिदिन पाट्याटाकूपणे सेवा केल्यामुळे आमची साधनेत हानी होत होती. यासाठी आमची प्रत्येक सेवा परिपूर्ण होण्यासाठी परात्पर गुरुदेवांनी प्रतिदिन कष्ट घेतले. ‘वरवर लहान वाटणार्‍या चुकांमुळेही साधनेची कशी हानी होते ?’, हे दाखवून त्यांनी आमच्या मनावर परिपूर्ण सेवेचे महत्त्व कोरले. वेगवेगळ्या शब्दांच्या चुका, व्याकरणाच्या चुका, वाक्यातील चुका, परकीय शब्द आणि इंग्रजी शब्दांचे कंसात अर्थ लिहिणे, अशा अनेक चुका दाखवल्या. या परिस्थितीवर दृष्टीकोन देतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले होते, ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘बातम्या चुकीच्या छापल्या’, यासारख्या गंभीर चुका नाहीत. यामध्ये व्याकरण आणि वाक्यरचना यांसारख्या चुका आहेत. या टप्प्याच्या चुकांमुळे वाचकांची काही हानी होत नाही; परंतु यामुळे गेल्या १० – १५ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्‍या साधकांची प्रगती होत नाही. प्रत्येक साधकाने ‘त्यांच्या जीवनातील साधनेचा काळ या चुकांमुळे वाया जाऊ नये’, यासाठी या चुकांचा अभ्यास करायला हवा.’

या प्रक्रियेतून ‘शुद्धलेखन कसे करावे ? वाचकांना प्रत्येक शब्दाचा अर्थ कसा सुस्पष्ट होईल, येथपर्यंत शब्द कसे छापायला हवेत ?’, हेही त्यांनी आम्हाला शिकवले. आमचे लेखन शुद्ध झाले की, सात्त्विकताही वाढेल. यातून आमची व्यष्टी आणि समष्टी दोन्ही स्तरांवर साधना होईल. परात्पर गुरुदेवांनी इतके शिकवले की, त्यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच ठरेल !

कृतज्ञता !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संकल्प, रत्नागिरीतील सनातनच्या १० संतांचे आमच्यावरील लक्ष आणि आशीर्वाद, जिल्ह्यातून बातम्या पाठवणारे साधक, अन्य वार्ताहर श्री. मकरंद पटवर्धन, श्री. रमेश जोशी, जिल्हा माहिती अधिकारी श्री. प्रशांत सातपुते, कु. अन्नदा मराठे, पत्रकार श्री. धीरज वाटेकर, वितरण करणारे साधक, वितरक आणि छपाई करणारे साधक, दैनिकाचा आर्थिक भाग उचलणार्‍या विज्ञापनांशी संबंधित सर्व साधक अन् सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आमचे सर्व विज्ञापनदाते आणि वाचक यांच्या साहाय्यामुळेच दैनिक ‘सनातन प्रभात’ने २७ व्या वर्षात पदार्पण केले. या सर्वांच्या  प्रती आम्ही कृतज्ञ आहोत.

दैनिकाविषयी कृतज्ञतापर लिखाण लिहून घेतल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. ‘प.पू. गुरुदेवा, आम्हा सर्वांची आध्यात्मिक उन्नती होवो आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर होवो, अशी आपल्या चरणी प्रार्थना !

– श्री. संतोष गांधी, फोंडा, गोवा. (२६.१२.२०२५)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक