मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !

डबेवाले बांधवांची पाद्यपूजा करतांना स्थानिक

मुंबई – मुंबईतील अनेक कार्यालयांत अविरतपणे आणि वेळेत घरगुती जेवणाचे डबे पोचवणारे डबेवाले बांधवांच्या सन्मानार्थ ११ जुलै या भागवत एकादशीच्या दिवशी बोरिवली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या वतीने डबेवाल्यांची वैद्यकीय पडताळणी करण्यात आली. आयोजकांच्या वतीने त्यांची पाद्यपूजा करण्यात आली. डबेवाल्यांच्या १३५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले. एकीकडे पंढरपूरची वारी चालू असतांना या पाद्यपूजेने डबेवाले बांधव आणि त्यांचे पाद्यपूजन करणारे लोक यांनी समाधान अनुभवले. एकादशीनिमित्त उपस्थित सर्वांना साबुदाण्याच्या खिचडीचा प्रसाद देण्यात आला. २५० डबेवाले बांधवांना रेनकोट वितरित करण्यात आले.

नाना पालकर स्मृती समिती, श्री मोरेश्वर सेवा संघ आणि ‘जी.एस्.बी. टेम्पल ट्रस्ट’च्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन झाले होते. या वेळी बोरिवली विधानसभेचे भाजपचे आमदार संजय उपाध्याय, दहिसर विधानसभेच्या भाजपच्या आमदार मनीषा चौधरी, डबेवाल्यांचे आमदार अशी ओळख असलेले भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागसंघचालक डॉ. मकरंद शिंदे, भाग कार्यवाह श्री. आंबावकर, ज्येष्ठ नाट्यकलावंत श्री. प्रदीप कबरे, चित्रपट नाट्य कलाकार श्री. अरुण नलावडे उपस्थित होते.