Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !

रशियाने डॉन-अझोव्ह कालवा आणि केच सामुद्रधुनी येथील नौकाची वाहतूक रोखली

(सामुद्रधुनी म्हणजे दोन जलाशयांना जोडणारा जलमार्ग)

AI निर्मित चित्र

कीव्ह/मॉस्को (रशिया) – रशिया आणि युक्रेन यांच्यामधील सागरी संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. १५ जुलैच्या रात्री युक्रेनने क्रिमियाजवळील रशियाच्या ‘शॅडो फ्लीट’मधील २० नौकांवर ड्रोनद्वारे आक्रमण केले. यामध्ये १७ तेलवाहू नौका, २ गॅस नौका आणि एका ‘टगबोटी’चा समावेश होता. या आक्रमणानंतर रशियाने अझोव्ह समुद्रातील नौकांच्या हालचालींवर निर्बंध घातले आहेत.

रशियाने या कारवाईला ‘आतंकवादी आक्रमण’ असे संबोधले आहे. तसेच अझोव्ह समुद्रातील नौकांच्या हालचालींवर निर्बंध घातले आहेत.

रशियाकडून युक्रेनवर सलग ५ व्या दिवशीही आक्रमणे चालूच

दुसरीकडे रशियाचे युक्रेनवरील आक्रमणे सलग पाचव्या दिवशीही चालूच आहेत. ओडेसा आणि आजूबाजूच्या भागांवर रशियाने ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांद्वारे आक्रमण केले. ओडेसातील ७ मजली निवासी इमारतीवर क्षेपणास्त्र पडून ३ जणांचा मृत्यू झाला.

सागरी मार्गांवर वर्चस्वासाठी संघर्ष

भूमीवरील लढाई काही प्रमाणात मंदावल्यानंतर दोन्ही देशांनी समुद्राला नवे रणांगण बनवले आहे. रशिया युक्रेनच्या बंदरांवर आक्रमणे करून धान्य आणि सैनिकी पुरवठा रोखण्याचा प्रयत्न करत आहे, तर युक्रेन रशियाच्या तेल, गॅस आणि मालवाहू नौकांना लक्ष्य करत आहे. युक्रेनच्या ड्रोन कमांडरने गेल्या ९ दिवसांत अझोव्ह समुद्रातील ११६ रशियन नौकांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. सततच्या आक्रमणानंतर रशियाने डॉन-अझोव्ह कालवा आणि केच सामुद्रधुनीतील (दोन जलाशयांना जोडणार्‍या जलमार्गातील) नौकांची वाहतूक थांबवल्याचे सांगण्यात येत आहे. या सागरी तणावाचा परिणाम रशियाच्या तेल, गहू आणि कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अझोव्ह समुद्रातून रशियाच्या अनुमाने २५ टक्के गव्हाची निर्यात होते.

हॉर्मुझमध्येही तणाव वाढला

पश्चिम आशियातही तणाव वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी करार न झाल्यास इराणचे वीजप्रकल्प उद्ध्वस्त करण्याची चेतावणी दिली. अमेरिकेने हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या (दोन जलाशयांना जोडणार्‍या जलमार्गाच्या) परिसरात इराणची नाकाबंदी करत १५ जुलैला ७ घंट्यांत अनेक ठिकाणांवर आक्रमणे केली. अमेरिकेच्या या आक्रमणांमध्ये इराणचे ७ सैनिक ठार झाले असून २६० जण घायाळ झाले आहेत.या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून इराणने तेल आणि गॅस निर्यात रोखण्याची धमकी दिली, तसेच बहारीन, कुवेत आणि जॉर्डन या देशांच्या दिशेने अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. परिणामी हॉर्मुझ सामुद्रधुनीतही तणाव वाढला आहे.