हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !

आद्य शंकराचार्यांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचे प्रकरण

उडुपी (कर्नाटक) – उडुपी येथील श्रीकृष्ण मठाच्या सभागृहात आयोजित हरिकथेच्या कार्यक्रमात आद्य शंकराचार्यांविषयी आक्षेपार्ह विधान करणार्‍या कलाकाराने सार्वजनिकरित्या क्षमायाचना केली. हिंदूंकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर संबंधित कलाकाराने एक व्हिडिओ प्रसारित करून त्याच्याकडून झालेल्या चुकीविषयी खंत व्यक्त केली आहे.

१. या कलाकाराने आद्य शंकराचार्यांच्या पार्श्वभूमीचा संदर्भ देत सांगितले की, ‘ज्या राक्षसांनी पूर्वी भीमसेनाची कृपा मिळवली होती, त्यांनी कलियुगात जन्म घेतला आणि आपल्या स्वभावानुसार ‘निर्गुण’ तत्त्वज्ञानाचा  प्रसार केला.’ त्या कलाकाराने पुढे असाही दावा केला की, ‘भगवान रुद्राकडून वरदान मिळाल्यानंतर ‘मणिमंत’ नावाचा एक राक्षस कालडी (केरळ) येथे ‘शंकर’ या नावाने जन्माला आला.’

२. ११ जुलै या दिवशी अंकिता नाईक आणि गौरी पांडुरंगी यांना एका घंट्याचा  भरतनाट्यम् कार्यक्रम आणि एका घंट्याची हरिवाण नृत्य सेवा सादर करण्याची अनुमती देण्यात आली होती; मात्र आयोजकांना कोणतीही पूर्वसूचना न देता कलाकारांनी अचानक ‘भक्त प्रल्हाद’ या हरिकथा प्रसंगाचे सादरीकरण केले. या वेळी एका कलाकाराने आद्य शंकराचार्यांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले.

३. या अनुचित घटनेविषयी मठाने तीव्र खेद व्यक्त करत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कलाकाराला सार्वजनिक क्षमा मागण्यास सांगण्यात आले होते, त्यानुसार त्यांनी व्हिडिओद्वारे क्षमा मागितली आहे, असे मठाचे दिवाण श्री. उदयकुमार सरळत्ताया यांनी स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका

हिंदूच हिंदूंचे खरे वैरी ! असे आक्षेपार्ह विधान कधी अन्य पंथीय त्यांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात करतात का ?