शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई

आंतरराष्ट्रीय बजरंग दलाकडून शिक्षण खात्याच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांचे स्वागत

पणजी, १५ जुलै (वार्ता.) – गोवा शिक्षण संचालनालयाने शाळांमध्ये बाह्य संस्था, संघटना किंवा व्यक्ती यांना व्याख्याने, परिसंवाद अथवा इतर उपक्रम आयोजित करण्यापूर्वी सक्षम प्राधिकरणाची पूर्वानुमती घेणे बंधनकारक करणारी नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू केल्याविषयी ‘आंतरराष्ट्रीय बजरंग दल, गोवा’ने समाधान व्यक्त केले आहे.

आंतरराष्ट्रीय बजरंग दल, गोवाचे अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘‘शिक्षण संस्था या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, नैतिक आणि राष्ट्रीय चारित्र्य घडवण्याची केंद्रे आहेत. अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचा धार्मिक कट्टरतावादी, अतिरेकी, फुटीरतावादी किंवा राष्ट्रविरोधी विचारसरणीचा प्रसार होऊ नये, हे राज्याचे आणि समाजाचे सामूहिक दायित्व आहे. अलीकडे काही संघटनांच्या कार्यपद्धती आणि त्यांच्या विचारसरणीविषयी देशभरात विविध स्तरांवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर गोवा शिक्षण खात्याने शाळांमध्ये बाह्य कार्यक्रमांवर देखरेख ठेवण्याचा घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि शैक्षणिक वातावरण सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

शाळांमध्ये केवळ घटनात्मक मूल्ये, राष्ट्रीय एकात्मता, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सामाजिक सलोखा यांनाच प्राधान्य मिळावे. विद्यार्थ्यांच्या मनावर विपरीत परिणाम करणारे किंवा त्यांच्यामध्ये वैचारिक ध्रुवीकरण निर्माण करणारे उपक्रम शिक्षण संस्थांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. यापुढे प्रत्येक शाळेने बाह्य संस्थांना कार्यक्रमासाठी अनुमती देण्यापूर्वी त्यांच्या उद्दिष्टांचा, कार्यक्रमाच्या स्वरूपाचा आणि वक्त्यांच्या पार्श्वभूमीचा योग्य अभ्यास करावा.

शिक्षण खात्याने प्रसारित केलेल्या नव्या निर्देशांची राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, व्यवस्थापन, शिक्षक आणि पालक यांनी काटेकोरपणे कार्यवाही करावी.’’