Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !

मुसळधार पावसातही २ लाख भाविकांची उपस्थिती

पुरी (ओडिशा) – येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला १६ जुलैपासून प्रारंभ झाला. पारंपरिक ‘पाहंडी’ विधीच्या अंतर्गत सर्वांत आधी भगवान सुदर्शन, त्यानंतर भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि शेवटी भगवान जगन्नाथ यांना गर्भगृहातून बाहेर आणून त्यांच्या नंदीघोष, तालध्वज अन् दर्पदलन या भव्य रथांपर्यंत पोचवण्यात आले. रथांवर विराजमान होण्यापूर्वी भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ या तिन्ही देवांनी नवीन रथांची परिक्रमा केली. ‘रथ बीजे’ विधीनंतर त्यांना सिंहासनावर विराजमान करण्यात आले. यानंतर गोवर्धन पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी विशेष पूजा-अर्चा केली, तर पुरीचे गजपती महाराज दिव्यसिंह देव यांनी पारंपरिक ‘छेरा पहंरा’ विधीच्या अंतर्गत सोन्याच्या झाडूने तिन्ही रथांची स्वच्छता करून त्यावर सुगंधी पवित्र पाण्याचा शिडकाव केला. सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर आणि रथांना लाकडी घोडे जोडल्यानंतर भाविकांनी रथ ओढणे चालू केले.

परंपरेनुसार, सर्वात आधी भगवान बलभद्रांचा ‘तालध्वज’ रथ, त्यानंतर देवी सुभद्रेचा ‘दर्पदलन’ रथ आणि शेवटी भगवान जगन्नाथांचा ‘नंदीघोष’ रथ श्री गुंडीचा मंदिराकडे मार्गस्थ झाले. ओडिशामधील पुरी येथे सतत होत असलेल्या मुसळधार पावसातही अनुमाने २ लाख भाविक या वेळी उपस्थित होते.

कर्णावती (गुजरात) येथे भगवान जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !

गुजरातची राजधानी कर्णावतीमध्ये १६ जुलैला सकाळी भगवान जगन्नाथ यांची १४९ वी रथयात्रा कडक सुरक्षाव्यवस्थेत चालू झाली. या यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पारंपरिक ‘पाहिंद विधी’ करून केला. त्यांनी भगवान जगन्नाथ, मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या तिन्ही रथांसमोरील मार्ग सोन्याच्या झाडूने स्वच्छ केला.