पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

सडा, वास्को येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रकरण

पणजी, १५ जुलै (वार्ता.) – सडा, वास्को येथील मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृतपणे उभारण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुरगाव बंदर प्राधिकरणाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात १५ जुलै या दिवशी सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर आणि मुरगाव परिसरातील रहिवासी यांची न्यायालयात उपस्थिती होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणी प्रतिवाद्यांना ‘पुतळा हटवण्याचा निर्णय झाल्यास पुतळा पुनर्स्थापनेसाठी पर्यायी जागा सुचवावी’, असा निर्देश दिला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी आता २१ जुलै या दिवशी होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने जुलैच्या शेवटास हा पुतळा हटवण्यासाठी कृती आराखडा निश्चित केला होता; मात्र हा  पुतळा हटवण्याचा दिवस आणि वेळ गुप्त ठेवण्यात आली होती.