बांगलादेशाचे क्रौर्य आणि अभिनेते शाहरुख खान यांची देशविरोधी मानसिकता !    

शत्रूराष्ट्राच्या खेळाडूवर पैशांची उधळण !

बांगलादेशामध्ये सद्यःस्थितीत हिंदु अल्पसंख्यांकांवर होणारे अत्याचार आणि तेथील राजकीय अस्थिरता यांमुळे संपूर्ण भारतात चिंतेचे वातावरण आहे. तिथे सातत्याने हिंदूंची घरे जाळली जात असून अनेक निष्पाप हिंदूंना प्राण गमवावे लागत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत ‘आय.पी.एल्.’च्या (‘इंडियन प्रीमियर लीग’च्या) लिलावाच्या वेळी अभिनेते शाहरुख खान मालक असलेल्या ‘कोलकाता नाईट रायडर्स’ (के.के.आर्.) संघाने बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला ९.२ कोटी रुपयांची मोठी बोली लावून संघात समाविष्ट केले आहे.

अभिनेते शाहरुख खान यांच्या मालकीच्या या संघाच्या निर्णयावर आता देशभरातून कडक शब्दांत टीका केली जात आहे. एकीकडे देश सुरक्षेच्या प्रश्नावर झुंजत असतांना दुसरीकडे शत्रूराष्ट्राला साथ देणार्‍या देशाच्या खेळाडूंवर पैशांची उधळण करणे, हे अनेकांना देशविरोधी कृत्य वाटत आहे.

सध्याच्या काळात सीमेवरील तणाव आणि देशांतर्गत सुरक्षा हे विषय अत्यंत कळीचे बनले आहेत. बांगलादेशातील हिंसाचार आणि तिथे वाढलेला भारतविरोधी सूर पहाता अशा प्रकारे बांगलादेशाच्या खेळाडूवर मोठी रक्कम व्यय करणे, हे सर्वसामान्यांच्या पचनी पडत नाही. सामाजिक माध्यमांवर यावरून मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला जात असून ‘खेळापेक्षा देश महत्त्वाचा आहे’, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

                   

१. भारताच्या सुरक्षेला धोका 

भारताच्या ईशान्येकडील राज्यांना जोडणारा ‘चिकन नेक’, म्हणजेच ‘सिलिगुडी कॉरिडॉर’ सध्या शत्रूराष्ट्रांच्या निशाण्यावर असल्याचे समोर आले आहे. बांगलादेशातील काही कट्टरपंथी संघटना आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आय.एस्.आय.’ (गुप्तचर संस्था) हे मिळून भारताचे तुकडे करण्याचे षड्यंत्र रचत आहेत. चीनच्या साहाय्याने हा भूभाग भारतापासून तोडण्याचा प्रयत्न केला जात असून यामुळे देशाच्या अखंडतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. अशा संवेदनशील काळात बांगलादेशाशी असलेले क्रिकेट संबंध तोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

२. हिंदूंचे शिरकाण आणि वाढता हिंसाचार

बांगलादेशातील सत्तापालटानंतर तिथे हिंदु समुदायाला लक्ष्य केले जात आहे. अनेक मंदिरांची विटंबना करण्यात आली असून महिला आणि बालके यांवरही अमानुष अत्याचार झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनांचा निषेध होत असला तरी तिथे परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. अशा वेळी भारतीय नागरिकांच्या भावना दुखावणारे निर्णय व्यावसायिक संस्थांनी घेऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोलकाता संघाने यापूर्वीही बांगलादेशी खेळाडूंना प्राधान्य दिल्याने आता त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची मोहीम तीव्र होतांना दिसत आहे.

श्री. नित्‍यानंद भिसे

३. शाहरुख खान आणि ‘के.के.आर्.’ यांच्यावर टीकेची झोड

बांगलादेशातील मैमनसिंह जिल्ह्यात दीपू चंद्र दास या हिंदु तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली असून विविध स्तरांतून याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

दीपू दास हे एका कपड्याच्या कारखान्यात काम करत होते. त्यांच्यावर ईशनिंदा केल्याचे खोटे आरोप लावून बांगलादेशातील धर्मांधांनी त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्यांना जिवंत जाळले. या अमानुष कृत्याचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला.यामुळे बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या घटनेनंतर बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोणत्याही ठोस पुराव्याविना केवळ अफवांच्या आधारे एका निरपराध तरुणाची हत्या केल्याने जगभरातील मानवतावादी संघटनांनीही यावर चिंता व्यक्त केली आहे. या घटनेने भारतात हिंदू संतप्त झाले असतांना दुसरीकडे ‘आय.पी.एल्.’मध्ये शाहरुख खान यांच्या मालकीच्या ‘कोलकाता नाईट रायडर्स’ या संघाने मुस्तफिजूर रहमानवर ९.२ कोटी रुपये व्यय केल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड संताप आहे. ‘ज्या देशातील सरकार आणि संघटना भारताच्या विरोधात कारस्थान करत आहेत, त्याच देशाच्या खेळाडूला इतकी मोठी रक्कम देणे’, हे नैतिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे मत मांडले जात आहे. या कृत्यामुळे शाहरुख खान यांच्यावर देशविरोधी असल्याचा आरोप केला जात असून आगामी काळात या वादाचे पडसाद क्रिकेटच्या मैदानावर उमटण्याची दाट शक्यता आहे.

– श्री. नित्यानंद भिसे, पनवेल

(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’)