राष्ट्रवादावाचून मराठी साहित्य संमेलन, म्हणजे अमावास्येला कोजागरी साजरी करणे !

आज (१ जानेवारी २०२६ पासून) सातारा येथे चालू होत असलेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या निमित्ताने…

प्रतिवर्षी मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाते. या मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रवादाला कुठेही स्थान नसल्याचे आढळून येत आहे. तुर्की, इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, अशा परकीय आक्रमकांना नमवून पराभवाची परंपरा नष्ट करून विजयाची परंपरा निर्माण केली, ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी ! त्यासाठीच त्यांनी महादेवासमोर हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि पूर्णत्वास नेली. छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणार्‍या साहित्य संमेलनात मात्र राष्ट्रवादाला कोणतेही स्थान नाही, हे लज्जास्पद आहे.

राष्ट्रवाद नागरिकांना त्यांची सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय यांसारख्या अनेक परंपरांचा विकास करण्याचे आणि त्यांचे संरक्षण करण्याचे बळ देतो. नागरिकांच्या मनातील गुलामी वृत्ती नष्ट करून स्वाभिमान आणि लढाऊ वृत्ती बळकट करतो. असे असतांनाही मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रवादाला कोणतेही स्थान दिले जात नाही, याची खंत मनाला अस्वस्थ करते.   

(भाग १)

१. राष्ट्रविघातक विचारांना विरोध करण्यासाठी साहित्य संमेलनात चर्चासत्र नसणे आश्चर्यजनक !

हिंदु धर्म आणि संस्कृती ही जगातील सर्वोत्तम असलेली प्राचीन अविनाशी संस्कृती आहे. दुर्दैवाने स्वतःला ‘साहित्यिक’ म्हणवणार्‍या अनेक साहित्यिकांना याविषयी अभिमान वाटत नाही. उलट हिंदु धर्म, संस्कृती आणि हिंदु राष्ट्र यांविषयी त्यांच्या मनात असलेली द्वेषभावना त्यांची लेखणी अन् वाणी यांतून गरळ ओकतांना दिसते. साहित्य संमेलनातही त्यांनी त्यांच्या या विकृत विचारांचे प्रदर्शन मांडले आहे.

श्री. दुर्गेश परुळकर

९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १ ते ४ जानेवारी २०२६ या ४ दिवसांत सातारा येथे पार पडणार आहे. या संमेलनातील कार्यक्रमाचे स्वरूप पाहिले असता मन, बुद्धी आणि विचार यांना खटकणारे प्रमुख सूत्र आहे ते म्हणजे आपल्या देशात राष्ट्रविघातक प्रवृत्ती दिवसेंदिवस बळावत चालली आहे. आपल्या देशाची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू आहे. सैन्यबळ आणि सैन्याचे शौर्य यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करून इस्लामी आतंकवाद्यांची आणि विशेषतः पाकिस्तान अन् बांगलादेश या शत्रूराष्ट्रांची तळी उचलण्याचे काम करणार्‍या राष्ट्रविघातक विचारांना जोरदार विरोध करण्यासाठी या साहित्य संमेलनात कोणत्याही चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले नाही. आयोजक आणि साहित्यिक यांना ‘आपण सुरक्षित आहोत. राष्ट्राचे काही झाले, तरी त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही’, असे वाटत असेल, तर ‘ते साहित्यिक, लेखक, कवी म्हणून खरोखरच स्वतःचे द्रष्टेपण, स्वतःची निर्भयता, स्पष्टवक्तेपणा अजूनही तेवढाच तेजस्वी आहे, हे सिद्ध करण्यासाठी असमर्थ ठरतात’, असेच म्हणावे लागेल; कारण अन्याय, अत्याचार आणि दुष्प्रवृत्ती यांच्याविरुद्ध आपल्या देशबांधवांच्या मनात चीड निर्माण करून त्या विरुद्ध लढण्यासाठी, मानसिक सामर्थ्य देण्यासाठी आणि विद्यमान साहित्यिकांच्या हातून मुठी वळवणार्‍या साहित्याची निर्मिती होत नाही. त्याचे प्रतिबिंब साहित्य संमेलनातही दिसून येते. या वस्तूस्थितीकडे डोळेझाक करता येत नाही.

२. समर्थ रामदासस्वामी यांचा अवमान करणारे साहित्यिक साहित्य संमेलनात मिरवणे लज्जास्पद !

आजच्या विद्रोही साहित्यिकांना समर्थ रामदासस्वामी यांचे विचार मानवत नाहीत. उलट ते जातीजातींमध्ये विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. यामागचे कारण एकच, ते म्हणजे त्यांना स्वतःच्या मातृभूमीविषयी श्रद्धा नाही. ‘हा देश एकसंघ रहावा’, असे त्यांना वाटत नाही. ‘या देशाच्या मुळावर उठणारे आणि सातत्याने हिंदूंना त्यांचे सण-उत्सव साजरे करता येऊ नये; म्हणून दंगली घडवणारे, देशात बाँबस्फोटांची मालिका घडवून आणणारे, ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारे, ‘सर तन से जुदा’ची (शिरच्छेदाची) घोषणा देऊन ती कृतीत आणणारे, छत्रपती शिवरायांची मिरवणूक मशिदीसमोरून जाऊ न देणारे, यांच्या विरोधात मात्र हे विद्रोही साहित्यिक एक अक्षरही लिहीत नाहीत; पण ‘समर्थ रामदासस्वामी आदिलशाहचे हेर होते’, असे दामटून सर्वत्र खोटे पसरवणारे साहित्यिक अखिल भारतीय साहित्य संमेलनात ताठ मानेने मिरवतांना दिसतात. अशा साहित्यिकांचे वर्चस्व असलेल्या साहित्य संमेलनात राष्ट्रवादाचा विषय निघणेच शक्य नाही.

समर्थ रामदासस्वामी यांनी केलेले पारतंत्र्याच्या दुःखाचे वर्णन

समर्थ रामदासस्वामी

सर्व संगपरित्याग केलेल्या आपल्या संतांनीसुद्धा राष्ट्र आणि धर्म रक्षणार्थ त्यांनी त्यांची लेखणी आणि वाणी यांचा स्वैर उपयोग केला. संतांच्या पदपथावरून वाटचाल करण्याची उर्मी वर्तमान काळातील साहित्यिकांमध्ये नाही, हा दैवदुर्विलास आहे. आपण जर राष्ट्राभिमान बाळगला नाही, तर स्वतःची प्रतिकारशक्ती नष्ट होते. अंततः आपल्यावर पारतंत्र्यात जाण्याचा प्रसंग येतो. पारतंत्र्याचे दुःख काय असते, याचा अनुभव आज ज्यांचे वय ७८ वर्षांपेक्षा न्यून आहे त्यांना नाही.

पारतंत्र्याच्या दुःखाचे वर्णन समर्थ रामदासस्वामी यांनी केले आहे…

पदार्थमात्र तितुका गेला । नुसता देशचि उरला ।
जन बुडाले बुडाले । पोटेविण गेले ।।

रडावे बोंबलवेना । लाथा बुक्या परोपरी ।
उदंड ताडणे होती । दुःख शोक विटंबना ।।

आधार पाहता नाही । कैवारी तो असेचि ना ।
देहत्याग बरा वाटे । दुःख ब्रह्मांड जाहले ।।

अशी परिस्थिती देशात निर्माण होऊ नये, यासाठी आपण सजग राहून आपल्या बांधवांनाही सजग केले पाहिजे. हे कार्य साहित्यिकांचे आहे. समर्थ रामदासस्वामी यांच्याप्रमाणेच साहित्यिकांनीसुद्धा आपल्या बांधवांना राष्ट्रपारतंत्र्यात असो, राष्ट्र संकटात सापडलेले असो किंवा राष्ट्राचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सातत्याने राष्ट्रजागराचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी समर्थ रामदासस्वामी सांगतात त्याप्रमाणे, ‘अवघे जन मेळवावे । धर्मकार्यासि लावावे । मर्‍हाट धर्माचे स्थापावे । प्रतिष्ठा स्वराज्य ।।’

३. विद्रोही डॉ. आ.ह. साळुंखे यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची अपकीर्ती करूनही त्यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रयत्न करणे

‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज परंपरा, धर्म, शास्त्र, रूढी यांच्या विरोधात बंड करणारे होते. त्यांनी वेद, शास्त्र, वर्णाश्रम आणि धर्म यांविरुद्ध बंड करून समाजरचना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला’, असे लिहिणारे डॉ. आ.ह. साळुंखे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जेव्हा प्रयत्न करतात, त्या वेळी अशा साहित्यिकांच्या साहित्य संमेलनात राष्ट्र आणि धर्म निष्ठा अशा विषयांवर चर्चासत्र आयोजित होईल, अशी अपेक्षा ठेवणे, म्हणजे ‘रेडा कधीतरी दूध देईल’, असे म्हणून अपेक्षा ठेवण्यासारखे आहे.

४. संत तुकाराम महाराज यांचे विद्रोह्यांविषयीचे लिखाण आणि धर्म यांच्याविषयीचे विचार

जगद्गुरु संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराज यांनी,

वेदां निंदी तो चांडाळ ।
भ्रष्ट सुतकीया खळ ।।

वेदश्रुती ग्रंथ नाही ज्या प्रमाण ।
श्रेष्ठाचे वचन न मानी जो ।।

तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न ।
तैसा तो दुर्जन शिवो नये ।।

ज्याला वेदशास्त्र प्रमाण नाहीत, श्रेष्ठ ऋषिमुनींचे जो वचन ऐकत नाही, तो दुर्जन आहे. दारू पिणार्‍याचे मिष्टान्न जसे खाऊ नये, तसे त्या दुर्जनाला कुणीही स्पर्शसुद्धा करू नये.

संत तुकाराम महाराज यांच्या या अभंगावरून आपण असे निश्चित अनुमान काढू शकतो की, वेदशास्त्रांची निंदा करणारे जे विद्रोही वाङ्मय आहे, ते संत तुकाराम महाराज यांच्या दृष्टीने दारूड्याचे मिष्टान्न असून त्याला हातसुद्धा लावू नये.

धर्माविषयी संत तुकाराम महाराज म्हणतात…,

धर्म रक्षावया साठीं । करणें आटी आम्हांसि ।।
धर्मरक्षणाकारणे । साधू होताती अवतीर्णे ।।
धर्माचे पालन । करणे पाखंडखंडण ।।
हेचि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ।।

धर्माचे पालन करण्यासाठी आणि धर्म न मानणारे, वेद न मारणारे जे नास्तिक आहेत, त्यांच्या पाखंडीपणाचे खंडण करण्यासाठी आम्ही अवतीर्ण झालो आहोत. विठ्ठलभक्ती वाढवणे, हे आमचे काम आहे.

संतांची अपकीर्ती करणार्‍यांना आणि आपल्या हिंदु धर्माविषयी ज्यांच्या मनात काडीचाही अभिमानही नाही, त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची तीव्र भावना असणे संभवत नाही. ज्याप्रमाणे ‘गारगोट्यांमध्ये हिरा सापडेल’, अशी आशा धरणे जसे व्यर्थ आहे, त्याप्रमाणेच अशा साहित्य संमेलनात राष्ट्रवादाचे चर्चासत्र आढळून येईल, अशी अशा बाळगणे व्यर्थ आहे.

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२८.१२.२०२५)

या लेखाचा भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/993138.html

संपादकीय भूमिका

राष्ट्रहितार्थासाठी स्वतःच्या लेखण्या न झिजवणार्‍या साहित्यिकांचे संमेलन म्हणजे केवळ ‘साहित्य जत्रा’ होय !