गुरुकृपेच्या बळावर ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यमाची निर्मिती आणि कार्य !

सत्य, धर्म आणि समाजहित यांना केंद्रस्थानी ठेवून केलेली पत्रकारिता ही काळाच्या ओघात परिवर्तनाचे माध्यम बनते. सध्याच्या काळात ध्येयवादी पत्रकारिता करण्याचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण म्हणजे ‘सनातन प्रभात’ नियतकालिके ! एका आध्यात्मिक संघटनेने स्वत:चे नियतकालिक चालू करणे आणि ते २६ वर्षे अखंड चालवणे हा एक चमत्कारच आहे ! दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ४ आवृत्त्या, २ साप्ताहिक (कन्नड आणि मराठी), २ पाक्षिके (हिंदी आणि इंग्रजी), ऑनलाईन दैनिक, तसेच सामाजिक माध्यमांवरील खाती या सर्व सेवा ‘सनातन प्रभात’ समुहाकडून साधकबळावर केल्या जातात. हे सर्व सहजगत्या आणि विनासायास होण्यामागे आहे साधकांवरील गुरुकृपा आणि संतांचा संकल्प ! सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांद्वारे चालू केलेला हिंदु राष्ट्राच्या संस्थापनेच्या वैचारिक महायज्ञाची धग जेथे हे नियतकालिक पोचत आहे, तेथे जाणवू लागली आहे आणि अनेक अपप्रवृत्तींमध्ये पालट होत आहे.

‘सनातन प्रभात’च्या सेवायात्रेतील प्रसंगांमध्ये गुरुकृपेच्या बळाची वेळोवेळी आलेली प्रचीती आणि त्याविषयीचे प्रसंग येथे शब्दबद्ध केले आहेत. ही गुरुकृपा ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून आम्हाला क्षणोक्षणी अनुभवता येऊ दे’, अशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना !

संकलक : श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, सनातन प्रभात, पनवेल.

हिंदूंचा वैचारिक योद्धा ‘सनातन प्रभात’ !

१. ‘सनातन प्रभात’ची गरुडझेप गुरुकृपेमुळेच !

‘सनातन प्रभात’ नियतकालिक समुहातील दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, तसेच ऑनलाईन दैनिक, विविध सामाजिक माध्यमांवरील ‘सनातन प्रभात’ची विविध खाती एवढे चालवण्यासाठी मोठा उद्योगसमूह किंवा राजकारणी यांचा पाठिंबा लागतो. प्रशिक्षित मनुष्यबळासह आर्थिक बाजूही भक्कम असावी लागते. यांपैकी काहीच नसतांना केवळ साधनाबळावर दैनिक आणि साप्ताहिक यांची यंत्रणा शून्यातून उभी करणे, साधकांची निवड करून त्यांना प्रशिक्षित करणे, वितरण व्यवस्था उभारणे, वार्र्तांकन आणि संपादकीय कौशल्य साधकांमध्ये निर्माण करणे, अनेक यशस्वी मोहिमा हाती घेऊन त्या पूर्ण करणे, अन्य वर्तमानपत्रे जे छापू शकत नाहीत किंवा ज्या गोष्टी उघडपणे बोलू शकत नाहीत, त्या ‘सनातन प्रभात’ निर्भीडपणे छापू शकते, हे केवळ गुरुकृपेच्या बळावरच !

२. अत्यल्प मनुष्यबळातही दैनिकाची सेवा वेळेत पूर्ण होऊन कौशल्य विकास साधता येणे, ही गुरुकृपाच ! 

‘सनातन प्रभात’मध्ये दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक काढणारे साधक दैनिक विभाग म्हणून एकत्र असतात किंवा संबंधित पाक्षिक अथवा साप्ताहिक यांच्या सेवांनुसार एकत्र असतात. दैनिकाची पाने सिद्ध करणे, यात बातम्या आणि संपादकीय लेखन करणे, लेख सिद्ध करणे, बातम्यांना संपादकीय दृष्टीकोन देणे यांसाठी साधक संपादकीय कौशल्य वाढवून, तर मिळालेल्या लिखाणाची दैनिकात चांगली अन् आकर्षक मांडणी करून रचनाकार साधक कौशल्य विकास करतात. सेवा करणार्‍या साधकांची ठराविक संख्या असणे आवश्यक आहे; मात्र काही वेळा साधकांच्या वैयक्तिक अडचणी, आजारपण यांमुळे साधक संख्या अगदी न्यूनतम होते. काही वेळा १-२ संपादक आणि १-२ रचनाकार एवढेच उपस्थित असतात, तरीही दैनिकाच्या पानांची सेवा वेळेत पूर्ण होऊन दैनिक वेळेत मुद्रणालयात छपाईसाठी जाते. गुरुकृपेचा हा अनुभव साधक नेहमी घेतात.

हिंदु राष्ट्राचे बीजारोपण करणारे ‘सनातन प्रभात’ !

हिंदू आणि अखिल मानवजात यांचे कल्याण साधणार्‍या, त्यांची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती साध्य करून देणार्‍या हिंदु राष्ट्राचा विचार स्थापनेपासून धीराने, वीरवृत्तीने, त्वेषाने आणि जोशाने केवळ ‘सनातन प्रभात’नेच मांडला आहे. ‘सनातन प्रभात’चे ब्रीदवाक्यच आहे, ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापने’साठी सनातन प्रभात !’ ते हिंदु राष्ट्राचा केवळ विचारच मांडून थांबलेले नाही, तर हिंदूंना आश्वस्त करणारे बोल ‘सनातन प्रभात’च्या पहिल्या संपादकीयमध्ये शेवटच्या ओळींमध्ये दिले होते. ‘ईश्वरी राज्याच्या (हिंदु राष्ट्राचा) स्थापनेचा प्रारंभ गोवा आणि सिंधुदुर्ग या पवित्र भूमीपासून करण्यात येईल. त्यानंतर या आध्यात्मिक क्रांतीच्या लाटा प्रथम देशभर आणि नंतर जगभर पसरतील अन् एका नव्या सत्ययुगाचा प्रारंभ होईल. हे होईपर्यंत शांत बसणे नाही…!’

– श्री. यज्ञेश सावंत

३. अभ्यासपूर्ण लिखाणासाठी साधकांना मिळणारे अनपेक्षित साहाय्य ! 

संपादकीय किंवा लेख लिखाणासाठी भरपूर अभ्यास, तसेच मोठा जनसंपर्क आवश्यक असतो. ‘सनातन प्रभात’ची सेवा करणारे साधक यासाठी विविध अडचणींवर मात करून प्रयत्न करत आहेत. साधकसंख्येच्या अभावी सर्वच साध्य करणे शक्य नसले, तरी साधकांना आवश्यक ती माहिती अल्प वेळेत मिळणे, कठीण वाटणार्‍या विषयाची माहिती जाणकाराची अचानक भेट होऊन मिळणे, तसेच लिखाणाची सेवा वेळेत पूर्ण होणे, अशा विविध अनुभूती साधकांनी घेतलेल्या आहेत.

४. ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ पारित होण्याचे श्रेय पत्रकारांनी ‘सनातन प्रभात’ला देणे, हे वैशिष्ट्यपूर्ण ! 

वर्ष २०२६ च्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनात धर्मस्वातंत्र्य विधेयक पारित झाले. अनेक वार्ताहरांनी ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांकडे अभिप्राय कळवले की, ‘तुमच्या (‘सनातन प्रभात’च्या) पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले !, तुम्ही हा विषय चांगल्या प्रकारे लावून धरलात.’ ‘गुरुकृपेमुळेच हे साध्य होऊ शकले’, असे साधकांना वाटते. (महाराष्ट्र सरकारने पारित केलेले ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६’ हे बळजोरीने, फसवणूक करून, आमिषाद्वारे किंवा विवाहाच्या माध्यमातून होणार्‍या (लव्ह जिहाद करून हिंदु मुलींचे धर्मांतर करण्यास प्रतिबंध करणारे) अवैध धर्मांतरास प्रतिबंध करण्यासाठी आणलेला कायदा आहे.)

५. ‘सनातन प्रभात’ची विषय निवडीतील दूरदृष्टी आणि काळाच्या पुढचे वार्तांकन ! 

श्री. यज्ञेश सावंत

काही वर्षांपूर्वी अन्य वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांपैकी कुणीही लव्ह जिहाद, लँड (भूमी) जिहाद, हिंदूंचे धर्मांतर, हिंदूंवरील आघात असे विषय घेऊन वार्तांकन करत नव्हते; पण ‘सनातन प्रभात’ने दूरदृष्टी ठेवून अनेक वर्षांपूर्वीच या विषयांवर जागृती करण्यास प्रारंभ केला होता. वरील आघातांच्या षड्यंत्राचे वाईट परिणाम आणि भयावहता आज सर्व प्रसारमाध्यमांना लक्षात येत असल्याने आता त्यांचे डोळे उघडू लागले आहेत.

‘सनातन प्रभात’द्वारे अनेक विषयांची बीजे काही वर्षांपूर्वीच बातम्या आणि लेख यांच्या स्वरूपात पेरलेली आहेत. नाटक, चित्रपट, विज्ञापने, लेख, सामाजिक माध्यमे इत्यादींद्वारे होणार्‍या हिंदु देवतांच्या अवमानाविषयी आवाज उठवला आहे. हिंदु धर्माविषयी टीका-टिपण्या, हिंदूंच्या प्रथा-परंपरा यांवर हिंदुद्वेषींकडून होणार्‍या सर्वच टीकांचे शास्त्रशुद्ध खंडण ‘सनातन प्रभात’ने वेळोवेळी केले आहे. हे विषय गुरुकृपेमुळेच लक्षात येऊ शकतात; म्हणूनच हे विषय निवडून त्यांविषयी जागृती करणे ही दूरदृष्टी पत्रकार आणि संपादकीय विभागातील साधक यांच्यामध्ये निर्माण होऊ शकली.

६. आध्यात्मिक पत्रकारिता करणारे ‘सनातन प्रभात’ हे जगातील एकमेव दैनिक ! 

‘सनातन प्रभात’ हे मन, बुद्धी आणि सूक्ष्म यांच्या स्तरावर समस्यांची माहिती देणारे, मानवी जीवनातील समस्यांची कारणमीमांसा करणारे अन् त्यावरील उपाय सांगणारे जगातील एकमेव दैनिक आहे. अन्य दैनिके केवळ बौद्धिक स्तरावरील माहिती देण्याचे कार्य करतात. सनातन प्रभात हे वाचकांना आनंदप्राप्तीसाठी साधना सांगणारे, जीवनमुक्तीकडे वाटचाल करायला लावणारे, साधक बनवणारे एकमेव दैनिक आहे, हे गुरुकृपेमुळेच शक्य होते. दैनिकाच्या अनेक वाचकांनी आध्यात्मिक उन्नती केली आहे. आज जग मन:शांतीच्या शोधात आहे, त्यासाठी लाखो रुपये खर्च करून अनेक उपाययोजनांचा शोध घेतला जात आहे; पण ती मन:शांती दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने वाचकांना विनासायास मिळते. ‘झोपतांना ‘सनातन प्रभात’ उशीजवळ ठेवल्यामुळे शांत झोप आली’, ‘दैनिक वाचनाने काम करण्यास स्फूर्ती मिळाली’, ‘समाजातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी भीती जाऊन निर्भयता आली’, अशा शेकडो अनुभूती वाचकांना आलेल्या आहेत.

७. ‘सनातन प्रभात’ मधील वृत्तांना टिपण्या देण्याच्या पद्धतीचा अन्य प्रसारमाध्यमांनीही केलेला अवलंब !

दैनिकात प्रत्येक वृत्ताला संपादकीय टिपण्या देण्याची आगळी-वेगळी पद्धत ‘सनातन प्रभात’चे संस्थापक संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी चालू केली होती. आता तर काही वृत्तवाहिन्या आणि दैनिके यांनीही ती पद्धत त्यांच्या स्तरावर वेगळ्या स्वरूपात चालू केली आहे. अनेक दैनिके सूचना लिहितात, ‘या दैनिकात छापलेल्या लिखाणाशी संपादक सहमत असतीलच, असे नाही.’ याउलट ‘सनातन प्रभात’मध्ये संपादकीय लिखाण परखड असते, तसेच समायोचित लेख सडेतोड लिहून लिखाणाचे संपूर्ण दायित्वही संपादकीय विभाग घेतो. अन्य दैनिकांना विरोधाची भीती किंवा अन्य कायदेशीर परिणामांची भीती असू शकते; पण ‘सनातन प्रभात’ कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नसल्यामुळे ईश्वरनिष्ठ आहे. त्यामुळे तो तत्त्वनिष्ठ राहून सर्वच विषयांवर भाष्य करू शकतो. ही गुरुकृपाच आहे !

८. ‘सनातन प्रभात’ची पत्रकारिता ही गुरुकृपेची देणगीच ! 

व्यावसायिक पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या पत्रकार संघटनेच्या एक महिला पदाधिकारी पत्रकार गोवा येथे पार पडलेल्या वार्ताहर शिबिरात सहभागी झाल्या होत्या. साधक वार्ताहराच्या दृष्टीने गुणवृद्धी, कौशल्यवृद्धी करण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांविषयी शिबिरात सांगण्यात आले. महिला पत्रकारांनी त्यांचे अनुभवकथन करतांना सांगितले, ‘मी व्यावसायिक पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे; मात्र अडीच दिवसांच्या शिबिरात एवढे विषय शिकण्यास मिळाले, ते माझ्या शिक्षणाच्या कालावधीत कधी शिकताही आले नव्हते.’’ प्रायोगिक विषयांवर भर देणारी ‘सनातन प्रभात’ची पत्रकारिता हा गुरुकृपेचाच परिणाम आहे.

९. वार्ताहरांच्या कृतीशीलतेमुळे जनआंदोलन उभारले जाऊन अयोग्य गोष्टी रोखता येणे 

दैनिक ‘सनातन प्रभात’चे २ वार्ताहर साधक आळंदी येथे बातम्या मिळण्याच्या दृष्टीने संपर्कासाठी गेले होते. तेथे मोठे पशूवधगृह हे विकास आराखड्यात प्रस्तावित असल्याची माहिती वार्ताहर साधकांच्या कानावर आली. त्यांनी याची तात्काळ नोंद घेऊन सविस्तर माहिती मिळवली, तसेच स्थानिकांसह वारकरी महाराज, हिंदुत्वनिष्ठ आणि काही राजकीय पक्षांचे प्रमुख यांचेही अभिप्राय घेतले. त्याला दैनिक ‘सनातन प्रभात’ने ठळक प्रसिद्धी दिली. ‘सनातन प्रभात’मध्ये हा विषय आल्यावर स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात जागृती होऊन त्याला जनआंदोलनाचे स्वरूप आले. शेवटी सरकारने ‘पशूवधगृहाचे हे आरक्षण रहित करण्यात येईल’, असे घोषित करून ते शासकीय प्रक्रियेद्वारे रहितही केले. गुरुकृपेविना इतके मोठे परिवर्तन घडणे अशक्यच होते.

१०. अनुचित प्रकारांना वाचा फोडून गुरुकृपेच्या बळावर समाजपरिवर्तन घडवणारे दैनिक ! 

मंत्रालयाच्या समोरील पादचारी मार्गावर रस्ता अडवून अवैधरित्या मुसलमानांकडून नमाजपठण करण्यात येत होते. याविषयीचे वृत्त ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करून हा विषय संबंधित अधिकारी आणि मंत्री यांच्यापर्यंत पोचवला. पोलीस आणि महापालिका यांनी वृत्ताची नोंद घेऊन तात्काळ कृती केली अन् नमाजपठण रोखले.

मंत्रालयातील प्रत्येक इमारतीच्या मार्गिकेत मोठ्या प्रमाणात साठलेले कागदपत्रांचे ढीग दूर करण्यासाठी मार्गिकेतील छायाचित्रांसह सर्व स्थितींची इत्थंभूत माहिती ‘सनातन प्रभात’ने प्रसिद्ध केल्यावर याची प्रशासनिक पातळीवर नोंद घेण्यात आली आणि सर्व मार्गिकांतील ढीग बाजूला करून चालण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात आला. हाच भाग मंत्रालयाच्या परिसरात असलेल्या बेवारस स्थितीतील चारचाकी गाड्यांविषयी, तसेच त्यातून निर्माण होणार्‍या संभाव्य धोक्यांविषयी छायाचित्रे प्रसिद्ध करून लक्षात आणून दिला. अनेक वर्षे धूळ खात पडलेल्या गाड्या हलवण्याची प्रक्रिया आता मंत्रालय स्तरावर चालू करण्यात येत आहे.

११. मंत्रालयात अनुभवलेली ‘सनातन प्रभात’ची विश्वासार्हता हीसुद्धा निवळ गुरुकृपाच ! 

अ. मंत्रालय आणि विधीमंडळातील वार्ताहर कक्षात गेल्यावर काही पत्रकार उत्स्फूर्तपणे ‘यांचे (‘सनातन प्रभात’चे) पत्रकार हे खरी पत्रकारिता करतात, तुम्ही देवमाणसे आहात’, असे उत्स्फूर्त मत व्यक्त करतात.

आ. ‘सनातन प्रभात’च्या पत्रकारांवर विश्वास ठेवतात. त्यांना स्थानिक पत्रकारांचे राजकारण आणि त्यातून येणार्‍या अडचणी मोकळेपणाने सांगतात.

इ. दैनिकाच्या दृष्टीने शासकीय अनुमती मिळवण्यासाठी काय केले पाहिजे ? हे अन्य अनुभवी पत्रकार त्यांचे अनुभव स्वत:हून सांगतात.

ई. विधीमंडळ वार्तांकनासाठी अन्य जिल्ह्यातून आलेल्या ‘सनातन प्रभात’च्या एका पत्रकाराला मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी ‘पास’ मिळाला नाही, तेव्हा तेथील पत्रकारांनी ‘तुम्हाला तर पास मिळालाच पाहिजे’, असे सांगून आम्ही प्रयत्न करतो’, असे सांगितले.

१२. देवस्थानची अपकीर्ती थांबवण्यासाठी ‘सनातन प्रभात’ने केलेला प्रयत्न !

पश्चिम महाराष्ट्रातील श्री क्षेत्र खरसुंडी येथील देवस्थानाचा स्थानिक राजकारणामुळे पुष्कळ अपप्रचार झाला होता. त्यामुळे त्या मंदिराची अपकीर्ती झाली होती. ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराने मंदिराशी संपर्क करून वस्तूनिष्ठ वार्तांकन करून त्याला प्रसिद्धी दिली. याविषयी वृत्त असलेल्या दैनिकाचे अधिकचे अंक घेऊन देवस्थानाने वितरण केले. संबंधितांनी सांगितले, ‘‘तुम्ही आमची योग्य बाजू मांडल्यामुळे समाजाला वस्तूस्थिती समजली. अन्य दैनिकांनी केवळ नकारात्मक बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे आमची अपकीर्ती झाली होती.’’

विस्तारभयास्तव ‘सनातन प्रभात’मुळे समाजाला झालेल्या लाभांची काही मोजकी उदाहरणे येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

१३. दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे गुरुकृपेच्या बळावर चाललेला ज्ञानयज्ञच ! 

प्रवाहाच्या विरुद्ध पोहत, आर्थिक हानीची पर्वा न करता केवळ ‘धर्मसंस्थापना’ आणि ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हेच सर्वाेच्च ध्येय ठेवून कार्य करणारे ‘सनातन प्रभात’ हे जगातील एकमेव नियतकालिक ठरले आहे. गुरुकृपेच्या बळावर चाललेला हा ज्ञानयज्ञ, वैचारिक यज्ञ यापुढेही अधिक तेजाने चालू राहील आणि मानवाच्या पारलौकिक कल्याणासाठी मार्गदर्शक ठरेल, यात शंकाच नाही.

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, सनातन प्रभात, पनवेल. (१५.७.२०२६)