‘परमकल्याण केवळ गुरुच करू शकतात’, याची साधकाला निश्चिती पटणे
ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित झालेले साधक आणि शिष्य यांनी प्रत्यक्ष गुरुकृपा अनुभवलेली असल्याने त्यांना गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व पटलेले असते. त्यामुळे त्यांना ‘आपल्या गुरूंसाठी काय करू आणि किती करू’, असे वाटत असते. गुरुकृपेचे वर्णन अन् महत्त्व हे शब्दातीत असल्यामुळे ते शब्दांतून व्यक्त करणे अशक्यच असते. तरीही शिष्यांना गुरूंच्या संदर्भात आलेल्या अनुभूती, गुरूंनी केलेली कृपा, त्यांचे हास्य, त्यांनी आपल्याशी केलेली मधुरवचने, मार्गदर्शन इत्यादींचे नित्य स्मरण शिष्याकडून होत असते आणि तो गुरूंच्या आठवणीतच सतत रममाण होत असतो. त्याला आता खर्या अर्थाने गुरूंचे वेड लागलेले असते. अंतर्यामी गुरूंचे महत्त्व पटलेले असल्याने आणि उत्तरोत्तर गुरूंची ओढ वाढत गेल्याने त्याला आता गुरूंविना चैन पडत नाही. आपले परमकल्याण केवळ गुरुच करू शकतात, याची निश्चिती पटल्याने तो पूर्णपणे गुरूंना समर्पित होतो आणि गुरुही त्याला जवळ घेतात.
‘साधनेतला प्रवास केवळ गुरुकृपेनेच झाला आहे’, याची अनुभूती घेणार्या शिष्याची स्थिती
खरेतर साधकाने अध्यात्माच्या शाळेत प्रवेश केल्यापासूनच गुरु त्याची साधना करवून घेत असतात; परंतु साधकाला त्याची जाणीव नसते. साधकाची साधनेत जसजशी प्रगती होत जाते, तसतसे त्याला गुरूंचे महत्त्व पटू लागते. ‘आतापर्यंतचा साधनेतला प्रवास केवळ गुरुकृपेनेच झाला आहे’, याची त्याला निश्चिती पटते. गुरुकृपा सातत्याने मिळवण्यासाठी तो गुरूंच्या मार्गदर्शनानुसार प्रयत्न करतो. शिष्य झाल्यावर गुरुच त्याच्याकडून योग्य प्रकारे साधना करवून घेऊन त्याची साधनेत प्रगती करून घेतात. या स्थितीला ‘गुरूंचे आज्ञापालन करणे’, हा एकच ध्यास शिष्याला लागलेला असतो. ‘आपली प्रगती गुरूंच्या संकल्पाने होत आहे आणि तेच सर्वकाही आपल्याकडून करवून घेत आहेत’, अशी अनुभूती सातत्याने घेतल्याने शिष्याचा गुरूंप्रती कृतज्ञताभाव अन् शरणागतभाव वाढू लागतो. आता त्याला देवतांची भक्तीही करावी लागत नाही. गुरुचरणांशीच सर्व देवता असल्याने आता तो केवळ गुरुभक्ती आणि गुरुसेवा यांत रममाण होतो.
‘गुरूंना आपल्या शिष्यासाठी ‘काय करू ? आणि किती करू ?’, असे वाटत असणे
शिष्याला गुरूंचा काही महिन्यांचा अथवा काही वर्षांचा सहवास लाभला, तरी तो गुरूंसाठी वेडा होतो. ज्या गुरूंनी अनेक जन्मांपासून त्याचे बोट धरून ठेवले आहे आणि ते त्याला प्रत्येक जन्मात साधनेचे मार्गदर्शन करून पुढे पुढे घेऊन जातात, त्यांना आपल्या शिष्याचे किती वेड असेल ! गुरूंना आपल्या शिष्यासाठी ‘काय करू आणि किती करू’, असे वाटत असते. त्यांचे प्रेमही शिष्याला भरभरून मिळत असते. त्याला आपल्यासारखा बनवण्यासाठी ते अधीर असतात. शिष्याला जेव्हा गुरुचरणांची आणि त्यांच्या चरणी स्थान प्राप्त करण्याची ओढ लागते आणि ती वाढत जाते, त्या वेळी गुरुच त्याला आत्मज्ञान देतात अन् त्यानंतर स्वत:मध्ये सामावून घेतात. खरेतर हे सर्व गुरूंनीच केलेले असते. त्यासाठी शिष्याला काहीही प्रयत्न करावे लागत नाहीत. जसे आपण काशीला जाणार्या आगगाडीत बसलो की, आपणही काही न करता काशीला पोचतो, त्याप्रमाणे एकदा आपण गुरुकृपेच्या गाडीत बसलो की, आपोआपच गुरु आपल्याला योग्य ठिकाणी नेऊन सोडतात. त्यासाठी शिष्याला काहीही करावे लागत नाही. हे अनुभवल्यामुळेच शिष्याला गुरुकृपेचे अनन्यसाधारण महत्त्व माहीत असते आणि तो गुरुचरणी सतत लीन असतो.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गुरुकृपायोग’)

साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निर्मिलेला साधनामार्ग गुरुकृपायोग !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
सनातन संस्थेच्या साधकांचे एक वेगळे वैशिष्ट्य : गुरुकृपेने सूक्ष्मातील जाणू शकणे !