The Jaipur Dialogues 2025 : ‘हंगर इंडेक्स’ आणि ‘हॅपीनेस इंडेक्स’ यांमध्ये भारताला खालच्या क्रमांकावर दाखवणे, ही शत्रूराष्ट्रांची कारस्थाने !

  • ‘जयपूर डायलॉग्ज २०२५’च्या परिसंवादात ‘शत्रूबोध’ या विषयावर दुसर्‍या दिवशीही प्रखर चर्चा !

  • वक्त्यांनी भारतविरोधी कथानकांची उघडपणे करून दिली ओळख !

  • हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनीही केले दिशादर्शन !

(‘हंगर इंडेक्स’ ही आकडेवारी जगातील देशांमध्ये भुकेचे प्रमाण दर्शवते. यात एखाद्या देशाचा जेवढ्या खाली क्रमांक असेल, तेवढ्या प्रमाणात तेथील लोक भुकेले रहातात, तसेच तेथील लहान मुलांची मृत होण्याचे प्रमाण अधिक असते.)

(‘हॅपीनेस इंडेक्स’ म्हणजे जगातील देशांमधील लोक त्यांच्या जीवनात किती प्रमाणात आनंद आणि समाधान मिळवतात ?, हे प्रमाण दर्शवते. ही संख्या जेवढी अल्प असेल, तेवढे तेथील लोक असमाधानी आणि दुःखी असल्याचे मानले जाते.)

डावीकडून राजेश कुमार सिंह, विनोद कुमार, शांतनु गुप्ता, अभिजीत जोग, आनंद रंगनाथन्, गर्वित भारद्वाज, उदय माहूरकर आणि अनुपम मिश्रा

जयपूर (राजस्थान) – ‘राष्ट्रवाद्यांचा महामेळावा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘जयपूर डायलॉग्ज २०२५’ या परिसंवादात दुसर्‍या दिवशी ‘शत्रूबोध’ या विषयावर विविध क्षेत्रांतील तज्ञांनी भारतावरील अंतर्बाह्य आक्रमणांविषयी सखोल चर्चा केली. लेखक आणि विचारवंत आनंद रंगनाथन्, प्रमुख चित्रपट समीक्षक राजेश कुमारसिंह, राजकीय विश्लेषक शांतनु गुप्ता, संशोधक विनोद कुमार, माजी मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर, गर्वित भारद्वाज आणि वरिष्ठ पत्रकार अनुपम मिश्रा यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’पासून चीन-पाक संबंधांतील नव्या हालचालींपर्यंत अनेक विषयांवर प्रकाश टाकत भारताने सजग रहाण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनीही संबोधित केले. या प्रसंगी श्री. अभिजित जोग यांच्या ‘भारत दॅट इज इंडिया : रिक्लेमिंग अवर रिअल आयडेंटिटी’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

‘लुटियन्स (देहलीतील साम्यवादी पत्रकार) विरुद्ध नॅशनलिस्ट (राष्ट्रवादी पत्रकार) – कोण जिंकतोय ?’ या विषयावरील सत्रात प्रसिद्ध पत्रकार सुशांत सिन्हा, आनंद नरसिंहमन्, प्रदीप भंडारी, भाऊ तोरसेकर आणि हर्ष कुमार यांनी तथाकथित ‘लुटियन्स’ माध्यमांनी चालवलेल्या मोदीविरोधी मोहिमेवर प्रहार केला. त्यांनी म्हटले की, गेल्या ११ वर्षांत भारतात मोठा पालट झाला आहे; भारताला ‘हंगर इंडेक्स’ आणि ‘हॅपीनेस इंडेक्स’मध्ये पाकिस्तानसारख्या देशांपेक्षा खालच्या क्रमांकावर दाखवणे, ही शत्रूराष्ट्रांची चाल आहे.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना वक्ते

‘लॉ-फेअर शत्रूबोध’ या सत्रात अयोध्या प्रकरणातील सुप्रसिद्ध अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालयातील सुप्रसिद्ध अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, विजय सरदाना, सामाजिक कार्यकर्त्या नाजिया इलाही खान आणि पत्रकार अजित भारती यांनी न्यायव्यवस्थेतील विसंगती समोर आणल्या. या चर्चेचे सूत्रसंचालन ‘जयपूर डायलॉग्ज’चे अध्यक्ष संजय दीक्षित यांनी केले. लॉ-फेअर म्हणजे कायद्याचा स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अथवा एखादे कथानक रचण्यासाठी करण्यात आलेला वापर.

चर्चासत्र : ‘आय लव्ह महंमद’ विरुद्ध बुलडोझर न्याय !

या चर्चासत्रात नाजिया, साहिल आणि नीरज अत्री यांनी सांगितले की, धर्मनिरपेक्षतेचा अर्थ हिंदु देवतांचा अपमान करणे नव्हे. ‘आय लव्ह महंमद’ प्रकरणी उत्तरप्रदेश सरकारने घेतलेली भूमिका योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील अनेक बेकायदेशीर कामांत मुसलमान घटक सहभागी असल्याने ‘बुलडोझर कारवाई’ न्याय्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी ममता बॅनर्जी आणि ओवैसी यांच्यावरही टीका करत ‘घुसखोरांच्या मतांवर टिकलेली सरकारे भारतासाठी धोका आहेत,’ असे म्हटले.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर

आजही वर्तमानपत्रांची शक्ती कायम !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ विचारवंत अभिषेक तिवारी, शेफाली वैद्य, आनंद रंगनाथन् आणि प्रखर श्रीवास्तव यांनी सांगितले की, आजही ‘प्रिंट मीडिया’ हेच सर्वाधिक विश्वसनीय माध्यम आहे. ‘वक्फ’सारख्या संस्थांना मर्यादेत आणल्याविना विकास होणार नाही, असेही मत या वेळी त्यांनी मांडले.

धर्माधारित आरक्षण घटनाविरोधी !

‘५० टक्क्यांवर आरक्षण देणे हे चांगले, वाईट कि कुरूप ?’, या विषयावरील सत्रात अधिवक्ता विष्णु शंकर जैन, ‘ब्रहत फाऊंडेशन’चे अध्यक्ष पंकज सक्सेना आणि प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ पत्रकार अजित भारती यांनी विचार मांडले. ‘राज्यघटनेत धर्माधारित आरक्षणाला स्थान नाही; मात्र बंगाल आणि कर्नाटकात मुसलमानांना ओबीसी आरक्षण देऊन मतपेटीचे राजकारण चालते. काही तथाकथित ‘दलित नेते’ हिंदु देवतांचा अवमान करतात, तरी हिंदु धर्म सोडत नाहीत’, असा या चर्चेचा सूर होता.

हलाल मांस नको असेल, तर हिंदु खाटिक समाजाला जागरूक करा ! – रमेश शिंदे

व्यासपिठावर डावीकडून श्री. देवदत्त माझी, डॉ. ओमेंद्र रत्नू, श्री. संदीप बालकृष्ण, श्री. रमेश शिंदे आणि श्री. जय आहुजा

भारतातील ‘हलाल अर्थव्यवस्था’ या शत्रूबोधाच्या अंतर्गत झालेल्या चर्चासत्राला हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे यांच्या समवेत श्री. जय अहुजा, डॉ. ओमेंद्र रत्नू आणि श्री. देवदत्त माझी यांनी संबोधन केले. या वेळी श्री. रमेश शिंदे म्हणाले की,

१. सर्वत्रचे मुसलमान हलाल उत्पादनांची मागणी करतात; परंतु एकही हिंदु ‘हलाल उत्पादने नको’, अशा प्रकारे आवाज उठवत नाही कि तशी मागणी करत नाही.

२. एखाद्या मुसलमानाला म्हटले की, ‘तुला ५० रुपये स्वस्त दराने झटका मांस देतो’, तरी तो त्यास नकार देतो. याउलट हिंदूला झटका असो कि हलाल ?, याच्याशी काही देणे-घेणे नाही.

३. दुसरीकडे हिंदू मांसाचा व्यापार करायलाच सिद्ध होत नाहीत. त्यात त्यांना काही अडचणी असल्याचे लक्षात आले. हा व्यवसाय केला, तर लग्नासाठी मुली मिळत नाहीत. काही ठिकाणी असा एक अपसमजही आहे की, प्राण्यांना मारले, तर त्याचे आपल्याला पाप लागते. त्यामुळे जे हिंदु व्यापारी मांस विकतात, ते मुसलमानांनी मारलेले प्राणीच आणून त्यांचे मांस विकतात.

४. खाटिक समाजातील अनेक लोक अशिक्षित आणि धर्मशिक्षित नसल्याने त्यांचे याविषयी दिशादर्शन होणे आवश्यक आहे. जेव्हा इस्लाम नव्हता, तेव्हा लोक मांसाहार करतच होते. तेव्हा हिंदू लोक प्राण्यांची हत्या करत असले, तर त्यांना पाप लागत नव्हते का ? त्यामुळे या अनुषंगाने हिंदूंना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

५. ही सर्व भयावहता आकड्यांच्या स्वरूपात पाहिली, तर केवळ कोंबडी आणि बकरी यांच्या मांसाचा एकूण व्यापार १० सहस्र कोटी रुपये आहे. यातील सर्वाधिक मांस उत्पादन हलाल पद्धतीने होते.

‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठ संघटना कशा प्रकारे एकत्रित येऊन हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करत आहेत ?, याविषयीसुद्धा श्री. शिंदे यांनी या वेळी माहिती दिली.
या वेळी आधुनिक वैद्य असलेले डॉ. रत्नू म्हणाले की, हलाल मांस हे स्वास्थ्याच्या दृष्टीने हानीकारक असून झटका मांस हे सुरक्षित आहे.