‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !

नाट्यकलेच्या व्याख्या आणि आध्यात्मिक परिभाषा !

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आज आपण ‘नाट्यकला’ म्हणजे काय ? प्राचीन नाट्याचार्यांनी केलेल्या नाट्याच्या परिभाषा, तसेच नाट्यकला आणि साधना यांचा संबंध’, हे विषय थोडक्यात जाणून घेऊया.

(लेखांक ५)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/960415.html

‘भारतीय विचारवंतांनी केवळ रंगमंचावरच नव्हे, तर ब्रह्मांडातील कणाकणांत ‘नाट्य’ बघितले आहे. त्यांनी विश्वातील सर्वच घटक आणि हालचाली यांना ‘ईश्वरीय नाट्य’, असे संबोधले आहे. विश्वाच्या आरंभापासून अंतापर्यंत सर्वत्र ‘नाट्य’ आहे. ‘विश्वाची निर्मिती, विष्णूचे दशावतार, वेद, उपनिषदे, पुराणे, निसर्गाचे लीलानाट्य, उदा. आकाशात इंद्रधनुष्य दिसणे, भूकंप, पूर येणे, जन्म, मृत्यू इत्यादी; पशू-पक्ष्यांचे अनेक नाट्यमय आविष्कार, उदा. कोकिळ पक्ष्याचे गाणे, मोराचे नृत्य, हत्तीची चाल इत्यादी’, हे सर्व नाट्यपद्धतीनेही दाखवले जाते. माणसाच्या दैनंदिन जीवनातही सर्वत्र ‘नाट्य’ आढळते. ‘मुलींचे लहानपणी ‘भातुकली’ खेळणे, त्यात ‘खोटा-खोटा स्वयंपाक’ करणे, आजीने नाट्यमय पद्धतीने गोष्ट सांगणे’, हेही नाटकच आहे; कारण त्यात अनुकरणासहित सर्व नाट्यतत्त्वे आहेत.

लेखातील काही संज्ञांचे अर्थ

१. नेपथ्य : नाटकातील प्रसंगानुसार रंगमंचावर केलेला देखावा, उदा. घर, जंगल, मैदान इत्यादी.
२. नवरस : शृंगार, वीर, करुण, हास्य, रौद्र, भयानक, बीभत्स, अद्भुत आणि शांत.
३. गांधर्व संगीत : हे एक आध्यात्मिक संगीत आहे. ते स्वर्गलोकातील गंधर्व मोक्षसाधनेसाठी गातात किंवा वाजवतात. यालाच ‘मार्गी संगीत’, असे म्हणतात.

१. ‘नाटक’ या शब्दाची व्युत्पत्ती आणि परिभाषा

१ अ. व्युत्पत्ती : मूळ संस्कृत धातू ‘नट्’ (अभिनयक्रिडायाम्) याचा अर्थ ‘अभिनय करणे’, ‘खेळ करणे’ अथवा ‘रूप धारण करणे’, असा होतो. नाट्य म्हणजे नटांनी (अभिनेत्यांनी) केलेला अभिनय किंवा नाट्यकला.

१ आ. प्रचलित अर्थ : सामान्यपणे ‘नटांनी रंगमंचावर एखादी कथा किंवा घटना यांची संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यमय दृक्-श्राव्य स्वरूपात सादर केलेली कलाकृती, म्हणजे नाटक होय’, हा नाट्यकलेचा प्रचलित अर्थ आहे. ‘संहितालेखन, दिग्दर्शन, अभिनय, अभिनेता, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत-संयोजन आणि प्रेक्षक’, या घटकांनी मिळून नाटक सिद्ध होत असते.

सौ. शुभांगी शेळके

१ इ. भरतमुनींनी नाट्यशास्त्रात सांगितलेला अर्थ

१. ‘नाट्य’ हे ब्रह्मदेवाने निर्माण केलेले असून ते चारही वेदांचे सार आहे. ब्रह्मदेवाने नाट्यास ‘पंचम वेद’, असे म्हटले आहे.

२. नृत्य, गायन, वादन आणि अभिनय यांच्या एकत्रित सादरीकरणास ‘नाट्य’ ही संज्ञा दिली आहे.

१ ई. ‘नाटक’ म्हणजे शक्तीचे प्रगट स्वरूप असणे

१. ‘नाटक (येथे ‘सर्वच कला’, या अर्थाने), म्हणजे शिवाने स्वानंदासाठी आपणा स्वतःतच केलेले दोन भाग होत. कला हे त्याचे दृश्य स्वरूप आहे. कला ही शिवाची शक्तीच होय. कला म्हणजे शिव-शक्तीच्या तादात्म्याचे साक्षात् दर्शन !’ (साभार : मूळ ग्रंथ : ‘नाट्यशास्त्र’, विवेचन ग्रंथ : भारतीय कला : उद्गम आणि विकास, श्री. वि.य. कुलकर्णी)

विवरण : ‘ब्रह्मांडाची निर्मिती आणि कारभार हे एक ईश्वरीय नाट्यच आहे’, या अर्थाने वरील ओळी आहेत, म्हणजेच ब्रह्मांडाच्या प्रारंभी केवळ शिवतत्त्व अस्तित्वात होते. शिव (पुरुष) हा स्थिर, अविचल आणि त्रिगुणातीत आहे; कारण तो केवळ ध्यानमग्न आहे. जेव्हा शिवाने स्वानंदासाठी स्वतःचे दोन भाग केले, तेव्हा शिव (पुरुष) आणि शक्ती (प्रकृती) प्रगट झाले. शक्ती (प्रकृती) ही त्रिगुणात्मक आहे, म्हणजेच तिच्यामध्ये सत्त्व, रज आणि तम हे गुण आहेत. त्यामुळे प्रकृतीद्वारे नाटकाला पोषक असे विविध रस आणि घटक निर्माण झाले. परिणामस्वरूप प्रसंग आणि घटना घडू लागल्या. त्या नाट्यमय आहेत, उदा. त्रेतायुगात ‘रामायण’ घडले. थोडक्यात, जेव्हा शिवाने आपला अर्धा भाग (म्हणजेच प्रकृती (शक्ती)) कार्यरत केला, तेव्हा विश्वाचे नाट्य घडू लागले; म्हणूनच शक्तीला ‘कला’, असे संबोधले आहे.

२. ‘शक्ती’ (प्रकृती) ही त्रिगुणात्मक असल्याने ती नाना लोकचरित्रातून प्रगट होते. नाटकांत त्रिगुणात्मक प्रवृत्ती असलेल्या लोकांची नाना रसांची चरित्रे दिसतात’, असे भरतमुनी मानतात.’ (संदर्भ : मूळ ग्रंथ : नाट्यशास्त्र, विवेचन ग्रंथ : भारतीय कला – उद्गम आणि विकास, श्री. वि.य. कुलकर्णी)

विवरण : भरतमुनींच्या मते ‘शक्ती’ ही सत्त्व-रज-तम हे त्रिगुण धारण करत असल्याने ती विश्वात घडणारी विविध लोकचरित्रे, त्यांतील घटना, प्रसंग आणि पात्र या सर्वांमध्ये सत्त्व-रज-तम या त्रिगुणांच्या रूपात अस्तित्वात असते अन् प्रगट होत असते. (म्हणूनच आपण सहज बोलतांना म्हणतो की, अमुक व्यक्तीची प्रकृतीच तशी आहे, म्हणजे तिचा स्वभाव शांत आहे किंवा रागीट आहे.) विश्वात घडणारी ही चरित्रे आणि त्यांतील पात्रांचे चरित्रचित्रण यांवरच नाटक होत असते. त्यातून नवरसांची निष्पत्ती होते.

१ उ. आध्यात्मिक स्तरावरील व्याख्या

१. ‘जेव्हा एखाद्या आविष्कारात पंचमहाभूतीय तत्त्वे आणि त्रिगुण यांचे प्रमाणबद्ध मिश्रण एकवटलेले असते, तसेच ज्यात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध अन् मन, बुद्धी आणि अहं या सर्वांचा आविष्कार देहाच्या माध्यमातून होत असतो, तेव्हा नाट्य साकारत असते. अशा प्रकारे नाट्य हे प्रकृतीलाच पुन्हा साकारत असते. नाट्य ही दृक्-श्राव्य स्वरूपाची अनुभूती आहे.’ – सौ. शुभांगी शेळके (एम्.ए. (नाट्यशास्त्र)) (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (वर्ष २०१६)

२. ‘नाटक हे पंचमहाभूते आणि त्रिगुण यांचे मिश्रण आहे. ‘ही पंचमहाभूते आणि त्रिगुण यांना अनुभवून त्यांच्या पुढे जाणे’, म्हणजे गुणातीत होणे आणि आनंदात स्थिर होणे, म्हणजे खरे नाट्य होय.’

– सौ. रेणुका क्राक (नाट्य अभ्यासिका) (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (वर्ष २०२४)

२. नाट्यकलेचे महत्त्व

नाटकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ‘नाटक’ हे दृक्-श्राव्य स्वरूपाचे असल्याने ते अधिक प्रभावी माध्यम आहे.

‘नाशिक येथे असतांना स्वा. सावरकर म्हणाले होते, ‘‘जे काम हजार व्याख्यानांनी होत नाही, ते एका चांगल्या नाटकाने होते.’’ – श्री. शंकर दत्तात्रय गोखले (साभार : ‘स्वातंत्र्यवीर जन्मोत्सव विशेषांक २००८’, पृष्ठ २६)

३. वैशिष्ट्ये

३ अ. भिन्न रुचींच्या व्यक्तींचे समाधान करणे

नाट्यं भिन्नरुचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम् । – मालविकाग्निमित्र, अंक १, श्लोक ४

अर्थ : ‘नाटक’ हे भिन्न आवडी असणार्‍या लोकांचे मनोरंजनाचे समान साधन आहे.

‘मालविकाग्निमित्र’ हे कालिदासांचे एक संस्कृत नाटक आहे. या नाटकाच्या पहिल्या अंकात आरंभीच नाटकातील नटीच्या ‘प्रत्येक व्यक्तीची रुची भिन्न असते, तर एकच नाटक सर्वांना कसे आवडेल ?’, या प्रश्नाला उत्तर देतांना नाटकाचा सूत्रधार सांगतो, ‘‘नाटक’ या कलेमुळे एकाच वेळी अनेक प्रकारच्या अभिरुची असलेल्या सर्व प्रेक्षकांचे समाराधान (उद्बोधन) होते आणि त्याच समवेत त्यांना निखळ स्वानंदाची अनुभूतीही मिळते.’’

सौ. रेणुका क्राक

३ आ. सर्व कलांचा समावेश असणे : नाटकात सर्वच कला अंतर्भूत होतात.

१. ‘दृश्य कला’, उदा. शिल्पकला, चित्रकला इत्यादी

२. ‘प्रयोगात्मक कला (Performing Arts)’, म्हणजेच नृत्य, गायन, वादन, आणि अभिनय’

३. सोप्या भाषेत सांगायचे म्हटले,

अ. नाटकाच्या प्रयोगासाठी अभिनय,

आ. नेपथ्यासाठी (पार्श्वभूमीवर) चित्रकला, शिल्पे इत्यादींची,

इ. वेशभूषेसाठी शिवणकला, शृंगारकला (मेक्-अप) यांची आवश्यकता भासते.

ई. नाटकाच्या संहितेसाठी साहित्य, म्हणजे इतिहास, काव्ये, कथा इत्यादी लागतात.

उ. नाटक फुलवण्यासाठी गायन-वादन-नृत्य यांची आवश्यकता भासते.

३ इ. ‘नाटकातील घटना प्रत्यक्ष घडत आहेत’, असे प्रेक्षकांना वाटणे आणि त्यांच्या मनात तशा भाव-भावना निर्माण होणे : नाटकांचे प्रयोग हे केवळ रंगमंचावर मर्यादित रहात नाहीत, तर प्रेक्षक त्या घटनांकडे वास्तव म्हणून बघतात, उदा. नाटकातील खलनायकाची षड्यंत्रे बघून प्रेक्षकांच्या मनात चीड उत्पन्न होते. रामायणाचे प्रयोग बघायला येणारे प्रेक्षक प्रयोगाकडे जणू पूजा-आराधना म्हणून बघतात. प्रेक्षक ‘रामा’चे पात्र साकारणार्‍या नटाच्या पाया पडतात. आजही ‘संत तुकाराम’ या कृष्णधवल चित्रपटातील ‘तुकोबांचे वैकुंठगमन’, हे दृश्य बघतांना प्रेक्षकांच्या डोळ्यांतून अश्रू येतात. हे सर्व त्या घटना खर्‍या वाटल्याने होते. अशा सात्त्विक नाटकांमुळे समाजामध्ये भाववृद्धी होते अन् समाज साधनेला लागतो.

३ ई. मानवासाठी हितकारी आणि ज्ञानदायी असणे : ‘नाट्यामध्ये केवळ देवतांच्या चरित्राचे अनुकरण नाही, तर त्रिलोकामध्ये असलेल्या भावांचे सादरीकरण आहे. नाट्यामध्ये धर्म, अर्थ (राजनीती, अर्थनीती), हास्य, युद्ध आणि काम (इच्छा, आकांक्षा) यांचा समावेश आहे. नाटक हे धर्मपरायण व्यक्तींसाठी धर्म आहे. नाटक हे वीरता उत्पन्न करणारे, अबोध जनांना ज्ञान प्रदान करणारे, विद्वानांचे ज्ञान वाढवणारे, दुःखी व्यक्तींना स्थिरता देणारे आहे. नाट्य हे धर्म, यश, आयुष्य आणि हितोपदेश देणारे आहे.’ (साभार : नाट्यशास्त्र, अध्याय १)

अशा प्रकारे ‘नाटक हे सर्वांसाठी हितकारी, ज्ञानदायी, त्यांची गुणवृद्धी करणारे आणि त्यांची साधना करून घेणारे आहे’, हे लक्षात येते.

४. ‘ईश्वरप्राप्ती’, हा नाट्यकलेचा मूळ उद्देश असणे

अ. ‘अभिनय = अभि + नी. यातील ‘अभि’ म्हणजे कडे आणि ‘नी-नय’, म्हणजे नेणे. प्रेक्षकांसमोर जे करून दाखवले जात आहे, ते त्याच्या खर्‍या स्वरूपाकडे नेणारे असेल, तर तो खरा अभिनय.’ (संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’, २२.४.२००७)

आ. गान्धर्वञ्चैव नाट्यञ्च यः सम्यगनुपश्यति ।
लभते सद्गतिं पुण्यां समं ब्रह्मर्षिभिर्नरः ।। – नाट्यशास्त्रावरील श्री. बाबूलाल शुक्ल शास्त्रीप्रणीत टीका (चौखंबा प्रकाशन)

अर्थ : जो कलाकार गांधर्व आणि नाट्यप्रयोग यांचे संपूर्ण जाणीवपूर्वक, ज्ञानपूर्वक आणि लक्षपूर्वक अवलोकन करतो, तोच शेवटी ब्रह्मर्षीगणांमध्ये स्थान प्राप्त करून सद्गतीपर्यंत पोचतो.

‘नाट्याची निर्मिती ही ईश्वराच्या आराधनेसाठीच झालेली आहे’, हे वरील श्लोकातून लक्षात येते.

इ. सात्त्विक नाटकांमधील कलाकार ‘भूमिका उत्तम पार पडावी’, यासाठी साधना करतात. प्रेक्षकांवर अशा कलाकारांच्या अभिनयाची छाप पडते. त्यामुळे कलाकार आणि प्रेक्षक यांचा भक्तीभाव वृद्धींगत होण्यास साहाय्य होते. याचाच अर्थ सात्त्विक नाटकाद्वारे कलाकार आणि प्रेक्षक या दोघांची साधना होते.

यातून लक्षात येते की, नाटक या कलेचे आताचे स्वरूप वेगळे असले, तरी नाटकाचा मूळ उद्देश ‘ईश्वरप्राप्ती’ हाच होता.’

– सौ. रेणुका क्राक, नाट्य अभ्यासिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१७.९.२०२५)

(या लेखमालेच्या पुढील भागापासून आपण गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांना असलेल्या आध्यात्मिक अधिष्ठानाचा इतिहास जाणून घेणार आहोत.)

साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये चालू झालेल्यया लेखमालेमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘कलांकडे साधनेच्या दृष्टीने कसे पहावे ?’ या अनुषंगाने दिलेल्या दिशेप्रमाणे मार्गदर्शनपर लेख असणार आहेत. आपल्या संपर्कातील कलाप्रेमी, कलाकार आणि कलेतील जिज्ञासू यांच्यापर्यंत हे लेख पोचवण्याचा प्रयत्न करावा.

या लेखांविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

– संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

संपर्कासाठी पत्ता

श्री. अभिजीत सावंत संपर्क क्रमांक : ८७९३६ ७८१७८

ईमेल : [email protected]

याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/967396.html

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक