नृत्याच्या शास्त्रीय आणि आध्यात्मिक परिभाषा !
४ सप्टेंबरपासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या या लेखमालेत आज आपण ‘नृत्य’ या कलेच्या व्याख्या पाहूया.
‘नृत्य हे सृष्टीतील जिवांचे आनंद व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. साधना म्हणून नृत्य केल्यास ते आपल्याला ईश्वराची अनुभूती देते. नृत्यामुळे योग साधला जातो. नृत्य आणि योग हे दोन्ही शरीर अन् मन यांच्या एकरूपतेवर भर देतात. ज्याप्रमाणे योगामध्ये ध्यानाची अवस्था असते, त्याचप्रमाणे नृत्यांगना नृत्याशी एकरूप झाल्यावर तिला अशीच स्थिती प्राप्त होते. कूर्मपुराणानुसार नृत्य आणि योग यांची संकल्पना आद्यनर्तक भगवान शिवापासूनच अस्तित्वात आहे. त्यामुळे नृत्य हासुद्धा योगाची अनुभूती देणारा एक उत्तम मार्ग आहे. नृत्य ही केवळ शारीरिक हालचाल नसून नाट्यशास्त्रात नृत्याला एक दैवी कला मानले आहे.
(लेखांक ४)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/957862.html
या लेखातील काही संज्ञांचे अर्थ
१. स्वरांची पट्टी : सप्तकातील असा स्वर ज्याला ‘षड्ज’(सा) मानून पुढील स्वर गायले अथवा वाजवले जातात, त्या ‘सा’ या स्वराला ‘स्वरांची पट्टी’, असे म्हणतात.
२. सप्तक : सा, रे, ग, म, प, ध, नी या सात स्वरांच्या समुहास ‘सप्तक’, असे म्हणतात.
३. मात्रा : तालाच्या प्रत्येक भागास ‘मात्रा’, असे म्हणतात.
४. लय : दोन मात्रांमधील सारखे धावते अंतर.
५. ताल : नियमबद्ध मात्रांचा समूह.
१. नृत्य
१ अ. व्युत्पत्ती : ‘नृत्’ म्हणजे नृत्य करणे, अभिनय करणे. ‘नृत्’ या धातूवरून नृत्त, नृत्य, नर्तन इत्यादी शब्द बनले आहेत.
१ आ. व्याख्या : संगीताच्या लयीवर तालबद्ध हालचालींमधून अभिव्यक्त होणारी कला, म्हणजे नृत्य.
१ इ. समानार्थी शब्द : नटन (संस्कृत भाषेतील शब्द) म्हणजे नर्तन

‘संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; म्हणून पृथ्वी, आप, तेज आणि वायु या तत्त्वांशी संबंधित असलेल्या कलांपेक्षा संगीताशी संबंधित अनुभूती वरच्या स्तराच्या असतात !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय.
२. भारतीय नृत्याचे प्रकार
‘भरतमुनींनी नाट्यशास्त्रात नृत्याचे ‘मार्गी (अधिभौतिक)’ आणि ‘देशी (भौतिक)’, असे दोन प्रकार मानले आहेत. त्यांपैकी मार्गी या प्रकारात ‘तांडव’ आणि देशी या प्रकारामध्ये ‘लास्य’ या नृत्याचा अंतर्भाव होतो.’ (संदर्भ : मराठी विश्वकोश)

३. भारतीय नृत्य प्रस्तुतीकरणाच्या दोन प्रमुख शैली
३ अ. नाट्यधर्मी : यामध्ये शास्त्रीय आणि नियमबद्ध केलेल्या नृत्यांचा समावेश होतो, उदा. भरतनाट्यम्, कथकली, कथ्थक इत्यादी.
३ आ. लोकधर्मी : यामध्ये लोकनृत्य, प्रादेशिक आणि परंपरेनुसार पालटणार्या नृत्यांचा समावेश होतो, उदा. गुजरातचे गरबा, आसामचे बिहू इत्यादी.
४. नृत्याचे प्रकार
नर्तनाचे प्रकार म्हणजे ‘नटनभेद’ होय. आचार्य नंदिकेश्वर रचित ‘अभिनयदर्पणम्’ या शास्त्रीय नृत्याचा प्रमाणभूत आधार असलेल्या ग्रंथानुसार भरतमुनी आणि अन्य यांच्या मते नृत्याचे ३ भाग (भेद) आहेत – नृत्त, नृत्य आणि नाट्य. हे भेद चार प्रकारच्या अभिनयांशी जोडले गेले आहेत. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात नृत्याला ‘आंगिक (शरिराची हालचाल), वाचिक (संवाद), आहार्य (वेशभूषा) आणि सात्त्विक (भाव)’, या अंगांनी परिभाषित केले आहे.
४ अ. नृत्त
४ अ १. व्याख्या
भावाभिनयहीनं तु नृत्तमित्यभिधीयते । – आचार्य नंदिकेश्वर रचित अभिनयदर्पणम्, श्लोक १५
अर्थ : भाव आणि अभिनय यांविरहित असून ज्यात ताल, लय, पदन्यास अन् देहाच्या हालचाली यांचा समावेश आहे, ते ‘नृत्त’ होय.
४ अ २. आध्यात्मिक महत्त्व : आधुनिक नृत्यशास्त्रज्ञ किंवा कलाकार सांगत असलेल्या नाट्यशास्त्रातील तत्त्वज्ञानावर आधारित पुढील वाक्यांतून नृत्ताचे महत्त्व लक्षात येते.
अ. नृत्त हे ध्यानासारखे आहे. शरीर सतत हलते; परंतु मन एका लयीवर अखंड एकाग्र होते, ज्यातून चित्तवृत्तीनिरोध (टीप १) साध्य होतो.
टीप १ – चित्तवृत्तीनिरोध : मनात निर्माण होणारे विचार, भावना किंवा लहरी यांच्या चढ-उतारांवर नियंत्रण ठेवून मनाला स्थिर आणि शांत करणे.
आ. नृत्तातील लय, म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाची गती अन् त्यातील जिवंत स्पंदने (चेतना) होत.
४ आ. नृत्य
१. रसभावव्यञ्जकादियुक्तं नृत्यमितीर्यते । – आचार्य नंदिकेश्वर रचित अभिनयदर्पणम्, श्लोक १६
अर्थ : रस, भाव आणि व्यंजक (अभिनय) इत्यादींनी युक्त असलेले, ते नृत्य म्हटले जाते.
२. ‘ताल, अभिनय आणि लालित्य (सौंदर्य) या तीनही कलांचा मनोहर संगम म्हणजे नृत्य होय.’ (साभार : भारतीय संस्कृतिकोश, खंड ५, पृष्ठ १७४)
४ इ. नाट्य
नाट्यं तन्नाटकं चैव पूज्यं पूर्वकथायुतम् । – आचार्य नंदिकेश्वर रचित अभिनयदर्पणम्, श्लोक १५
अर्थ : नाट्य म्हणजेच ‘नाटक’. यामध्ये प्राचीन कथांचा आधार असल्याने ते अत्यंत पूजनीय मानले आहे.
४ इ १. व्युत्पत्ती : मूळ संस्कृत धातू ‘नट्’ (अभिनयक्रिडायाम्) याचा अर्थ ‘अभिनय करणे’, ‘खेळ करणे’ अथवा ‘रूप धारण करणे’, असा होतो. नाट्य म्हणजे ‘नटांनी केलेला अभिनय किंवा नाट्यकला.’
त्रेतायुगाच्या आरंभीच्या भरताच्या काळात नाट्यात ‘नृत्य’ आणि ‘नृत्त’ ही नर्तनाची दोन्ही अंगे अन् संगीत यांचा अंतर्भाव होई. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील नटनभेदानुसार ‘नाट्य’ हे केवळ आधुनिक (सध्या समाजातील प्रचलित) नाटकांपुरते मर्यादित नसून त्यात गीत, वाद्य, नृत्य आणि अभिनय या सर्व कलांचा समन्वय मानला आहे.
४ इ २. नाट्यशास्त्रातील तत्त्वज्ञानावर आधारित नाट्याची परिभाषा : ‘नाट्य हे अनेकविध कर्म दर्शवणारे आहे. नाट्य हे त्रैलोक्याचे ‘भावानुकीर्तन’ (टीप २) असते. ते विविध प्रकारच्या वृत्ती आणि प्रवृत्ती यांचे दर्शन असते. संपूर्ण विश्वातील व्यवहारातील सर्व भाव-भावनांच्या वर्णनातून नाट्य प्रगट होते.’
टीप २ – भावानुकीर्तन : भावानुकीर्तन म्हणजे जगातील लोकांचे आचार-विचार आणि त्यांच्या जीवनातील विविध भाव-भावना यांचे अनुकरण करून ते रंगमंचावर सादर करणे होय.
५. आध्यात्मिक परिभाषेतून नृत्यकला !

सनातनचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप यांना नृत्याच्या आध्यात्मिक परिभाषांविषयी मिळालेले ज्ञान पुढे दिले आहे.
अ. ‘आत्मसंगीताची जागृत अवस्था’, म्हणजे नृत्य.
आ. अल्पावधीत शिवाला प्रसन्न करणारी उपासनापद्धत, म्हणजे नृत्य.
इ. जीव (साधक) आणि शिव (भगवंत) यांना (एकमेकांशी) शरिराद्वारे जोडण्याचे माध्यम, म्हणजे नृत्य.
ई. मन, बुद्धी आणि शरीर यांचे भान हरपून देवाला समर्पित होण्याचे माध्यम, म्हणजे नृत्य. (टीप ३)
उ. भगवंताच्या कलात्मक स्वरूपाचा व्यक्त आविष्कार, म्हणजे नृत्य.
ऊ. भगवंताच्या मीलनासाठी देहाच्या माध्यमातून भक्ताची व्यक्त झालेली व्याकुळता, म्हणजे नृत्य.
ए. भगवंतासाठी देहभान हरपण्याचे उत्तम साधन, म्हणजे नृत्य.
ऐ. भावावस्थेचे देहस्वरूपातील प्रगटीकरण, म्हणजे ईश्वरीय नृत्य.
टीप ३ – संगीतामध्ये व्यक्तीच्या विशिष्ट अवयवांचा सहभाग असतो, तर नृत्यामध्ये सर्वांगांचा सहभाग असतो. त्यामुळे संगीताच्या माध्यमातून परमेश्वराची आराधना करतांना साधक टप्प्याटप्प्याने समर्पित होण्याची प्रक्रिया घडते, तर नृत्याच्या माध्यमातून भगवंताला समर्पित होण्याची क्रिया संगीताच्या तुलनेत वेगाने होते.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘वरील आध्यात्मिक परिभाषा पाहिल्यास कलांच्या सादरीकरणाला साधनेची जोड दिली, तर या कलांच्या माध्यमातून अध्यात्मातील उच्च अनुभूती घेता येऊ शकते.’
संग्राहक : कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १८ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१४.८.२०२५)
साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये चालू झालेल्यया लेखमालेमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘कलांकडे साधनेच्या दृष्टीने कसे पहावे ?’ या अनुषंगाने दिलेल्या दिशेप्रमाणे मार्गदर्शनपर लेख असणार आहेत. आपल्या संपर्कातील कलाप्रेमी, कलाकार आणि कलेतील जिज्ञासू यांच्यापर्यंत हे लेख पोचवण्याचा प्रयत्न करावा.
या लेखांविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
– संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
संपर्कासाठी पत्ता
श्री. अभिजीत सावंत संपर्क क्रमांक : ८७९३६७८१७८
ईमेल : [email protected]
|
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/965146.html

उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !