कलांच्या आध्यात्मिक इतिहासाचे प्रास्ताविक !
४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत पुढील काही भागांत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांचा आध्यात्मिक इतिहास पहाणार आहोत. या लेखात आपण भारतीय कलांच्या निर्मितीविषयी समजून घेऊ.
(लेखांक ६)

भारतीय कलांचा इतिहास आणि त्यांचे आध्यात्मिक स्वरूप !
‘भारतीय कलांना आध्यात्मिक इतिहासाचा प्रगल्भ वारसा लाभला आहे. भारतीय तत्त्वज्ञान आणि अध्यात्म हे भारतीय कलांचे प्रेरणास्थान आहे. भारतीय कलांची उत्पत्ती आध्यात्मिक पायाभरणीतून झाली आहे. कलेचा आध्यात्मिक इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रथम भारतीय संस्कृतीची उत्पत्ती आणि पर्यायाने सृष्टीची निर्मिती यांविषयी जाणून घ्यावे लागेल.
(भाग १)
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/965146.html
१. आध्यात्मिक दृष्टीकोनातून सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया
परमेश्वराच्या निर्गुण निराकार तत्त्वापासून ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिदेवांची निर्मिती झाली.
१ अ. सृष्टीनिर्मितीच्या प्रक्रियेमधील प्रथम नाद ‘ॐ’कार ! : श्रीविष्णुपुराणानुसार क्षीरसागरामध्ये विराजमान असलेल्या भगवान श्रीविष्णूच्या नाभीकमलातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. श्रीविष्णूच्या आदेशाप्रमाणे ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी जो प्रथम नाद उत्पन्न झाला, तो ‘ॐ’कार होता. शिवपुराणामध्ये ‘भगवान शिवाच्या डमरूच्या नादातून ‘ॐ’कार स्वरूप ‘नादब्रह्म’ प्रकट झाले आणि त्या नादाच्या माध्यमातून सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया झाली’, असे सांगितले आहे. श्रीविष्णुपुराण आणि शिवपुराण या दोन्ही पुराणांनुसार ‘ॐ’कार हा सृष्टीनिर्मितीतील पहिला नाद मानला गेला आहे.
१ आ. शास्त्रात सांगितलेले ‘ॐ’काराचे महत्त्व !

१. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः।
प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ७, श्लोक ८
अर्थ : हे कुंतीपुत्र अर्जुना, मी पाण्यातील रस आहे, चंद्र-सूर्यातील प्रकाश आहे, सर्व वेदांतील ‘ॐ’कार आहे, आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व आहे.
२. ओमित्येतदक्षरमिदं सर्वं तस्योपव्याख्यानं भूतं भवद् भविष्यदिति सर्वमोङ्कार एव । यच्चान्यत् त्रिकालातीतं तदप्योङ्कार एव । – माण्डुक्योपनिषद्, वाक्य १
अर्थ : ‘ॐ’ हेच अक्षर आहे, हेच संपूर्ण विश्व आहे, हीच त्याची व्याख्या आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे सर्व ‘ॐ’कारच आहे अन् अन्य जे काही कालातीत आहे, तेही ‘ॐ’कारच आहे.
१ इ. ‘ॐ’कारातूनच वेदांची निर्मिती होणे : वेद हे अनादि आणि अपौरुषेय आहेत. ‘ॐ’कारापासूनच वेदांची निर्मिती झाली’, असे पुराणांत लिहिले आहे.
‘अ, उ, म आणि सूक्ष्म नाद यांपासून ४ वेद निर्माण झाले.’
– शिवपुराण, वायवीयसंहिता, उत्तरभाग, अध्याय ६, श्लोक २७१
ई. चार वेदांपासून कलांची निर्मिती होणे
१. प्राचीन काळातील ऋषिमुनींनी निर्गुण ‘ॐ’कारातून प्रगट झालेल्या ४ वेदांचे सार सूक्ष्मातून ग्रहण केले.
२. भारतीय संस्कृतीचा पाया असलेल्या ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४ वेदांमध्येच भारतीय संस्कृतीच्या सर्व घटकांची, म्हणजे हिंदु शास्त्र, हिंदु जीवनदर्शन, कला, नीतीमूल्ये, तत्त्वज्ञान इत्यादींची बिजे सुप्तावस्थेत विद्यमान होती. त्यातूनच भारतीय संस्कृतीने आकार घेतला आणि त्या समवेत विविध कलांचा जन्म झाला. भारतीय कला या भारतीय तत्त्वज्ञान साकार करतात.
३. ऋषिमुनींनी वेदांच्या माध्यमातून विद्या आणि कला ग्रहण केल्या. त्यानंतर त्यांनी भूतलावरील मानवाला विद्या आणि कला शिकवणे चालू केले. त्यातूनच भूतलावर भारतीय वेदसंस्कृतीचा (विद्या आणि कला यांचा) आरंभ झाला. (वेदांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संगीत, नृत्य आणि नाट्य या भारतीय कलांचा युगांनुसार सविस्तर इतिहास आपण पुढील काही भागांत पहाणार आहोत.)
२. प्राचीन भारतातील कलाप्रवाह
प्राचीन काळापासून कलेचे लोकधर्मी आणि नाट्यधर्मी, असे २ प्रवाह चालू आहेत.
२ अ. लोकधर्मी कला : लोकधर्मी कला, म्हणजे लोकांनी सामूहिकपणे लोकांसाठी सहजतेने आणि उत्स्फूर्तपणे निर्मिलेली कला. याला ‘लोकांच्या सामूहिक जाणिवेतून सामूहिकपणे झालेला कलाविष्कार’, असेही म्हणता येईल. ‘लोककला’ या प्राकृत भाषेतून आणि प्राचीन भारतातील निरनिराळ्या प्रांतातील जाती-जमातींमधून निर्माण झाल्या असाव्यात’, असे काही तज्ञांचे मत आहे. या लोककलांचा आरंभ सामूहिकपणे ईश्वराची आराधना करण्यासाठी झाला होता. सर्व प्रकारची लोकगीते, लोकगायन, लोकनृत्ये, लोककथागायन आणि लोकनाट्य ही या प्रकारांत मोडतात, उदा. गुजरातमध्ये देवीच्या आराधनेसाठी गायनासह केलेले गरबा नृत्य, महाराष्ट्रातील देवीसाठी घालण्यात येणारा गोंधळ (देवीचे क्षात्रभावात असलेले स्तुतीगीत), दक्षिणेकडील ईश्वराचे लीलानाट्य साकारणारे यक्षगान.
२ आ. नाट्यधर्मी कला : कलेच्या शास्त्रकारांनी कलांचा सखोल अभ्यास करून, तसेच काही नियम आणि पद्धती सिद्ध करून कलेला शास्त्रामध्ये बांधले. शास्त्रात बांधलेल्या कलांना ‘नाट्यधर्मी कला’, असे म्हणतात. नाट्यधर्मी कलांचे अध्ययन आणि प्रस्तुतीकरण शास्त्रात बांधलेल्या पद्धतीनुसारच होते, उदा. भरतमुनींनी नाट्यशास्त्रात प्रयोगात्मक कलेचे तात्त्विक अन् प्रायोगिक शास्त्र सांगितले आहे. त्यानुसार कलेची केलेली प्रस्तुती, म्हणजे नाट्यधर्मी कला (अभिजात म्हणजे प्राचीन उत्कृष्ट कला) होय. ‘संस्कृत रंगभूमी, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय गायन आणि वादन’, ही नाट्यधर्मी कलेची काही उदाहरणे आहेत.
या लेखाच्या पुढील भागात आपण ‘काळानुसार कलांच्या प्रस्तुतीच्या पालटत गेलेल्या प्रेरणा आणि काळानुरूप कलांमधून होणारे रंजन’ हा विषय पहाणार आहोत.’
(क्रमशः)
– सौ. शुभांगी शेळके (एम्.ए. नाट्यशास्त्र), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२६.९.२०२५)
साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती
या लेखमालिकेविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
संपर्कासाठी पत्ता –
श्री. अभिजीत सावंत संपर्क क्रमांक : ८७९३६७८१७८
ई-मेल : [email protected]
या लेखाचा या पुढील भाग वाचण्याकरीता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/969515.html
| सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !