छत्रपती शिवरायांप्रमाणे राष्ट्रोद्धाराचे व्रत करण्याचे बळ आम्हाला मिळो ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी

सांगली, २६ सप्टेंबर (वार्ता.) – छत्रपती शिवरायांप्रमाणे राष्ट्रोद्धाराचे व्रत करण्याचे बळ आम्हाला आई जगदंबेकडून मिळो, हेच मागणे या श्री दुर्गामाता दौडीतून आपण करत आहोत. अंतःकरणातून जिवंत असणारे स्वतःसाठी जगत नसतात, तर देव, देश आणि धर्म यांसाठी जगत असतात. असा प्रवाह उत्पन्न करण्याचा मार्ग छत्रपती शिवरायांनी संपूर्ण भारताला पहिल्यांदा दाखवला, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी येथे केले. श्री दुर्गामाता दौडीच्या ५ व्या दिवशी ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी म्हणाले की, आत्मोद्धार, आत्मसाक्षात्कार, मोक्ष, उन्नती, आत्म्याचे परमात्म्याशी असलेले नाते अनुभवण्याचा मार्ग साधूसंतांनी जगाला दाखवला आहे. निश्चितच साधूसंतांचे हे अनंत उपकार आपल्या सर्वांवर आहेत. शेकडो वर्षे पारतंत्र्यात, परावशतेत, गुलामीत खितपत पडलेल्या, अडकलेल्या हिंदु समाजाला याची जाणही नव्हती की, आपण नरकयातना भोगत आहोत. अशा हिंदु समाजाला जागृत करण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ‘स्वतःच्या जीवनाची राखरांगोळी झाली, तरी चालेल, तरी पण जगावे मातृभूमीसाठी आणि मरावेही मातृभूमीसाठी, लढावे मातृभूमीसाठी आम्हाला वेड हे एक’ अशा पद्धतीने छत्रपती शिवराय जगले, तसेच आपल्याला जगायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी म्हणाले की, राष्ट्रोद्धार, राष्ट्रोन्नती, राष्ट्रसाक्षात्काराचा हा मार्ग छत्रपती शिवरायांनी भारताला दिला. हेच लक्षात ठेवून आई आम्ही तुझ्या पायाशी आलो आहोत. ती अंतःकरणातील शक्ती, कळकळ, तीव्र इच्छाशक्ती आणि ते धारिष्ट्य, समर्पण आणि त्याग यांची भावना तू राष्ट्रमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांच्या पुत्राला म्हणजेच छत्रपती शिवरायांना दिलीस. आम्ही ही दौड काढून तुझ्याकडे ती शक्ती मागण्यासाठी आलो आहोत. छत्रपती शिवरायांना जन्म देणार्‍या राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी जे व्रत केले, जगले ते व्रत करण्यासाठी या राष्ट्रासाठी, राष्ट्रोद्धारासाठी तू आम्हाला बळ दे !