Ban Khalid Ka Shivaji : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विकृत माहिती देणार्‍या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती

मुंबई : ‘खालिद का शिवाजी’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी ऐतिहासिकदृष्ट्या खोटी, तथ्यहीन आणि विकृत माहिती देऊन समस्त जनतेची दिशाभूल केली आहे. या विकृत प्रचारामुळे समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ज्याप्रमाणे ‘उदयपूर फाइल्स : कन्हैय्यालाल टेलर मर्डर’ या चित्रपटामुळे मुसलमान समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यावर अंतरिम बंदी आणण्यात आली होती, त्याचप्रमाणे ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटावरही बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्य आणि केंद्र सरकारकडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,…

१. या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या सैन्यात ३५ टक्के मुसलमान सैनिक होते, महाराजांचे ११ अंगरक्षक मुसलमान होते, तसेच रायगडावर महाराजांनी मशीद बांधली होती, असे आक्षेपार्ह आणि विकृत दावे करण्यात आले आहेत. हे सर्व दावे भ्रामक, अप्रामाणिक आणि कोणत्याही ऐतिहासिक पुराव्यांविना प्रसारित करण्यात आले आहेत.

२. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. त्यांनी धर्मनिष्ठ हिंदवी स्वराज्य उभारले. त्यांनी स्वतः त्यांचा सावत्र भाऊ व्यंकोजीराजेंना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला आहे, ‘तुर्क फौजेत ठेविले, मग जय कैसा होईल ?’

३. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांना ‘सेक्युलर’ ठरवण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न इतिहासाच्या नावाने समाजात गोंधळ निर्माण करणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणतीही धार्मिक जनगणना नव्हती. अशा परिस्थितीत ३५ टक्के मुसलमान सैनिक असल्याचा दावा कोणत्या आधारावर केला जात आहे ?

४. जर मुसलमान समाजाला खरंच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम असते, तर पाच मुसलमान पातशाह्यांनी त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला नसता किंवा छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारले नसते. सध्याच्या काळातही जर मुसलमान समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आदर असता, तर यवत (ता. दौंड, जि. पुणे) येथे झालेल्या हिंसाचारात ‘सय्यद’ नावाच्या धर्मांधाने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती फोडली नसती. त्यामुळे ‘खालिद का शिवाजी’ हा चित्रपट हिंदु समाजात भ्रम निर्माण करणारा आणि शिवाजी महाराजांचे खोटे चित्रण करणारा आहे.

५. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १९(२) आणि भारतीय दंड संहिता कलम २९५ (अ) नुसार ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे विकृत चित्रण जनतेच्या धार्मिक भावना दुखावणारे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणारे ठरू शकते. पूर्वीही ‘पद्मावत’, ‘जोधा अकबर’ या चित्रपटांच्या वेळी अशा विकृत इतिहासामुळे जनक्षोभ निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटावर जोपर्यंत त्यातील ऐतिहासिक माहितीचे अधिकृत सत्यापन होत नाही, तोपर्यंत बंदी घालण्यात यावी.

संपादकीय भूमिका

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेवर येऊ नये. सरकारने स्वतःहून याची नोंद घेणे आवश्यक !