Bangladesh Rangpur Hindus Attacked : बांगलादेशात महंमद पैगंबर यांच्यावरील कथित आक्षेपार्ह पोस्ट नंतर मुसलमानांनी हिंदूंची १५ घरे जाळली

हिंदु मुलाच्या नावाने खोटे खाते उघडून करण्यात आली पोस्ट !

मुसलमानांचे आक्रमण

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील रंगपूर जिल्ह्यातील गंगाचारा भागात एका हिंदु मुलाने फेसबुकवर महंमद पैगंबर यांच्यावरील कथित अवमानकारक केलेल्या पोस्टवरून मुसलमानांनी हिंदूंच्या १५ हून अधिक घरांवर आक्रमण केले. मुसलमानांनी हिंदूंच्या घरांची लुटमार करत त्यांची तोडफोड केली आणि नंतर त्यांना आग लावली. ‘हिंदु मुलाने केलेली पोस्ट धार्मिक भावना दुखावणारी होती’, असा आरोप मुसलमानांनी केला. पोलिसांनी हिंदु मुलाला अटक केली, तरी मुसलमानांनी आक्रमण थांबवले नाही. या आक्रमणात जीवितहानी झाली नाही.

नमाजानंतर केले आक्रमण

मुसलमानांच्या जमावाने हिंदूची घरे लुटली.

२७ जुलैला दुपारी नमाजानंतर ५०० ते ६०० मुसलमानांच्या जमावाने हे आक्रमण केले. त्यांनी हिंदूची घरे लुटली. या आक्रमणात पोलीसह घायाळ झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सैन्याला तैनात करण्यात आले आहे. अद्याप एका आरोपीलाही अटक झालेली नाही.

स्थानिक पोलीस अधिकारी महंमद कमरुज्जमा यांनी सांगितले की, आम्ही हिंदु मुलाच्या घराचे संरक्षण केले; पण जमावाने आजूबाजूची १५ ते २० घरे उद्ध्वस्त केली.

रंगपूरचे उपायुक्त असीब अहसन यांनी सांगितले की, पीडितांना तात्पुरते निवास आणि साहाय्य सामग्री देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

पोलिसांनी दुर्लक्ष केले ?

धर्माचा अपमान केल्याच्या आरोपाखाली हिंदू समुदायावर झालेल्या हल्ल्यामुळे रंगपूरमधील कुटुंबे गावे सोडत आहेत
चित्र सौजन्य : TheDailyHinduObserver

एका हिंदु तरुणाने ‘आजकर पत्रिका’ या दैनिकाला माहिती दिली आहे. तो म्हणाला, ‘‘जेव्हा हे लोक आमचे घर फोडायला आले, तेव्हा पोलीस तिथे होते. त्यांनी आधी मुसलमानांना थांबवायचा प्रयत्न केला; पण नंतर ते निघून गेले. आम्हाला आमच्या नशिबावर सोडले. आम्ही निरपराध आहोत, तरी आमची घरे का उद्ध्वस्त केली गेली ?’’

आता कसे जगायचे ?


एका पीडित हिंदु महिलेने सांगितले की, आमचे सगळे त्यांनी लुटले. कपडे, सोने, धान्य, पैसे, काहीही शिल्लक नाही. आम्ही आता कसे जगायचे ?

कायद्याची अपेक्षा आणि न्यायाची मागणी

या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांवर अनेकांकडून टीका होत आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते निष्पक्ष चौकशी, उत्तरदायींवर गुन्हे नोंदवून कठोर शिक्षा करणे, तसेच पीडितांना हानीभरपाई देण्याची मागणी केली.

ज्या आरोपावरून हिंदु मुलाला अटक झाली, ते खोटे फेसबुक खाते !

पत्रकार सोहन आर्.एस्.बी. यांच्या मते, मुलाचे मूळ फेसबुक खाते वेगळे असून त्याच्या नावाने खोटे खाते बनवून त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या छायाचित्रासह अपमानास्पद पोस्ट करण्यात आल्या होत्या. तरीही पोलिसांनी कोणतीही तपासणी न करता मुलाला अटक केली.

पोलिस अधिकारी अल इमरान यांनी सांगितले की, गावकर्‍यांचा रोष पाहून आम्ही त्याला अटक केली.

वर्ष २०२१ मध्येही येथे झाले होते हिंदूंवर आक्रमण

या भागात अशा प्रकारच्या हिंसाचाराची ही पहिली घटना नाही. वर्ष २०२१ मध्ये दुर्गापूजेच्या काळातसुद्धा अशाच एका सामाजिक माध्यमावरील पोस्टवरून २० पेक्षा अधिक हिंदूंची घरे जाळण्यात आली होती.

हिंदु, बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिलची मागणी

बांगलादेश हिंदु, बौद्ध, ख्रिश्चन युनिटी कौन्सिलने बांगलादेश सरकारकडे मागणी केली आहे की, या आक्रमणांतील दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबांना हानीभरपाई दिली जावी.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात अशा प्रकारे हिंदूंच्या नावाने खोटी खाती उघडून त्यावर इस्लामचा अवमान करणारी पोस्ट करून हिंदूंवर आक्रमण करण्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. यापुढेही त्या घडत रहातील, यात शंका नाही. अशा घटना रोखण्यासाठी जगभरातील हिंदू निष्क्रीय रहातात, हेही तितकेच सत्य आहे !