रामायण-महाभारत यांचा खगोलशास्त्राच्या आधारे कालावधी शोधणारे अमेरिकेतील जगप्रसिद्ध संशोधक डॉ. नीलेश ओक !

डॉ. नीलेश नीलकंठ ओक हे अमेरिकेत स्थायिक असलेले, जगप्रसिद्ध भारतीय इतिहास संशोधक आहेत. रामायण आणि महाभारत यांच्या कालनिर्धारणावर केलेल्या त्यांच्या संशोधनामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. ते खगोलशास्त्र, प्राचीन ग्रंथांतील संदर्भ आणि अंतर्गत सुसंगतता यांच्या आधारे अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने प्राचीन इतिहास समजावून सांगतात. यामुळेच ते हिंदुत्वाचे शिलेदार आहेत.

डॉ. नीलेश नीलकंठ ओक

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वाेच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. डॉ. नीलेश ओक यांचे जीवन आणि शिक्षण

माझा जन्म महाराष्ट्र राज्यात रत्नागिरी जिल्ह्यातील (परशुराम क्षेत्र) बोरगाव या गावात झाला. १० वीची परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत मी त्या भागातील विविध शाळांमधून शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई येथील पार्ले महाविद्यालयातून कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय आणि पदवीपूर्व अभियांत्रिकी शिक्षण घेतले. त्यानंतर ‘यूडिसीटी’/ ‘आयसीटी’ (युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी /इन्फॉर्मेशन अँड टेक्नोलॉजी) यांमधून ‘केमिकल इंजिनीयरींग’मधील (रासायनिक अभियांत्रिकी) पदवी संपादन केली आणि कॅनडामध्ये जाऊन पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. सध्या मी अमेरिकेतील ‘इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड सायन्सेस’ येथे कार्यरत आहे.

८ वर्षीय विद्यार्थी नीलेश
पत्नी सौ. अश्विनी यांच्यासमवेत नीलेश ओक

२. राष्ट्र-धर्म आणि हिंदुत्व, तसेच रामायण-महाभारत यांच्या कालावधीचे संशोधन करण्याविषयीचे कार्य

‘समाजाने आपल्यासाठी पुष्कळ काही केले आहे आणि एखादा जे धर्मकार्य करतो ही त्याची समाजासाठी छोटीशी परतफेड असते, ही मलभूत जाणीव माझ्या पालकांनी माझ्यामध्ये लहानपणापासून जोपासली होती. लहानपणापासून मी जिज्ञासू होतो आणि अधाशीपणे पुस्तके वाचत होतो. सर्वसाधारणपणे मी पुष्कळ वाचन करून पुष्कळ विचारही करतो. यामुळे माझ्या वाढत्या प्रश्नांना उत्तरे मिळवण्यासाठी अनेक विषयांचा अभ्यास केला. यामध्ये लहान वयातच मी वेगवेगळी शास्त्रे आणि धर्म यांचा अभ्यास केला. गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ मी करत असलेल्या संशोधनकार्याला ही मुख्य पार्श्वभूमी होती.

व्यावसायिक कारकीर्दीत जनरल इलेक्ट्रिक आस्थापनामध्ये जागतिक प्रशिक्षक म्हणून नीलेश ओक

यानंतर महाभारताचा नेमका आणि अचूक कालावधी खगोलशास्त्राच्या आधारे शोधण्याचे माझे काम चालू झाले. त्यानंतर मी रामायणाचा कालावधी शोधला. या क्षेत्रातील मी केलेले संशोधन खर्‍या अर्थाने पहिला शास्त्रीय आणि तर्कशुद्ध प्रयत्न होता. यामुळे माझ्या कामाचे मोठ्या प्रमाणात विज्ञान क्षेत्रातील २० शाखांमध्ये बहुविद्याशाखीय शास्त्रीय पुरावा म्हणून प्रमाणीकरण झाले. याखेरीज भारतीय खगोलशास्त्र, कृषी, जलवाहतूक, प्राण्यांचे पालन करणे, अनुभवजन्य ज्ञान, तत्त्वज्ञान, दर्शनशास्त्र आणि भाषाज्ञानातील भारतीय पाया या विषयांमधील प्राचीनता प्रस्थापित करणे, हे अतिरिक्त कार्य मी केले आहे. आताचे माझे कार्य, म्हणजे खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, कृषी, जलवाहतूक, तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र, रसायनशास्त्र, आयुर्वेद आणि इतर अनेक शास्त्र यांचे दुवे जोडण्याचे कार्य चालू आहे.

३. संत आणि थोरपुरुष यांच्या कार्यातून धार्मिक संशोधन करण्याची प्रेरणा

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदासस्वामी यांसारखे थोर संत, तसेच लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य विनोबा भावे, ब्रह्मर्षि डॉ. पद्माकर विष्णु वर्तक, प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे प्रा. अनंत दामोदर आठवले), धरमपाल, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, रा.स्व. संघाचे डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि इतर अनेक जणांचे जीवनचरित्र, त्यांच्याविषयीच्या कथा किंवा माहिती यांची माझ्या जीवनात महत्त्वाची भूमिका आहे. माझ्या विचार करण्याच्या प्रक्रियेवर जोसेफ कॅम्पबेल, कार्ल पॉपर, हेन्री डेव्हिड थोरऊ, सेनेका माँटीग्न यांची विचारप्रक्रिया आणि त्यांचे लेखन यांचा माझ्यावर मोठा प्रभाव होता. अलीकडच्या काळात श्री. नीरज अत्री, श्री. राजीव मल्होत्रा, अधिवक्ता जे. साईदीपक यांच्याकडून मला अंतर्दृष्टी मिळाली आहे.

‘वेदिक अकॅडमी ऑफ सायन्स अँड आर्ट्स’चे संस्थापक जेफ्री आर्मस्ट्रॉंग यांच्या समवेत नीलेश ओक

आजच्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या काळात ज्ञानयोगाचे महत्त्व हे समर्पकता आणि श्रद्धेविना नाही, तसेच प्रज्ञेविना काहीही शक्य नाही. मुख्य म्हणजे श्रद्धा आणि प्रज्ञा शुद्ध करण्यात ज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे.

पद्मभूषण श्री. वामदेव शास्त्री (डॉ. डेव्हिड फ्रॉली) यांच्यासोबत नीलेश ओक

४. हिंदुत्वविरोधी कथानकांचा सामना करण्यासाठी प्रतिदिन भगवद्गीतेचा अभ्यास करणे महत्त्वाचे !

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांतून हिंदुत्वविरोधी कथानकांचा सामना करण्यासाठी सर्वसाधारण किंवा असाधारण हिंदु असो, प्रत्येक हिंदूंने त्याचा स्वधर्म पाळला पाहिजे. स्वधर्म म्हणजे काय ?, हे जाणून घेण्यासाठी प्रतिदिन भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे. धर्म आणि मानवता यांच्या कल्याणासाठी ही प्रक्रिया सर्वांत उत्कृष्ट आहे, यावर माझा विश्वास आहे.

५. हिंदु समाजव्यवस्थेच्या अनुषंगाने करावयाचे प्रयत्न

‘हिंदु इकोसिस्टम’ (यंत्रणा) काही प्रमाणात अस्तित्वात आहे. त्या दृष्टीकोनातून उत्कृष्ट व्यवस्थाही केली जात आहे; परंतु ती वेगवेगळ्या ठिकाणी तेवढ्यापुरती सीमित आहे. लोकांमध्ये चांगल्या पद्धतींविषयी जागृती निर्माण करणे, हे सामाजिक माध्यमे करू शकतात. जेव्हा वैयक्तिक संस्था (आध्यात्मिक, बौद्धीक, अधिवक्ता, प्रसारमाध्यमे, न्यायिक किंवा इतर) हे इतर संस्थांकडे स्वतःच्या क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रांत त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पहातात, तेव्हा समाजव्यवस्था बिघडण्याची भीती असते. मला असे वाटते की, सर्व संस्थांनी या आत्मकेंद्रित दृष्टीकोनातून बाहेर आले पाहिजे. व्यक्तीगत हिंदु बुद्धीवंतांनाही हाच सल्ला लागू आहे. जर तुम्ही दुसर्‍याला सहकार्य करू शकत असाल, तर तसे अवश्य करा. जर तुम्ही साहाय्य करू शकत नाही, तर तुम्ही तुमचा स्वतःचा मार्ग अनुसरा.

जून २०२४ मध्ये ‘सनातन प्रभात’ने डॉ. नीलेश ओक यांचा ‘पॉडकास्ट’ (मुलाखत) घेतल्यानंतर त्यांना ‘सनातन प्रभात’चा अंक भेट देतांना समूह संपादक श्री. योगेश जलतारे

६. ‘मिलेनियल्स’, ‘जेन झी’ आणि तरुण पिढी यांच्यासाठी सूचना

जर हिंदु विचारवंत, गुरु, स्वामी आणि संघटना यांना परिपूर्ण मानून सहस्रो लोक, ‘मिलेनियल्स’ (वर्ष १९८०-१९९६ या कालावधीत जन्मलेली पिढी), ‘जेन झी’ पिढी (वर्ष १९९६ ते २०१० या कालावधीत जन्माला आलेली पिढी) किंवा कुणालाही उपदेश किंवा शिकवण्याचा प्रयत्न करू लागल्या, तर ते निश्चितपणे अपयशी होतील, असे वाटते. ऐकणारा कोण आहे, याकडे दुर्लक्ष करून हिंदु बुद्धीवंत आणि संघटना यांच्यासाठी त्यांचे कौशल्य किंवा ज्ञान यांची खोली वा मर्यादा यांविषयी त्यांनी प्रामाणिक रहावे. जोपर्यंत हे सर्वजण आपल्या अनुभवाविषयी अतिशयोक्ती करत नाहीत, तोपर्यंत सहस्रो लोक, ‘मिलेनियल्स’, ‘जेन झी’ पिढी आणि तरुण पिढी ही बुद्धीवंत अन् संघटना यांच्याशी जोडलेले रहातील.

७. हिंदु समाजाला जागृत करण्यासाठी महत्त्वाची सूत्रे

अ. पुष्कळ विस्तृतपणे वाचन करा. धर्मशास्त्राचा अभ्यास करा.

आ. वैज्ञानिक कौशल्य, तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्याचे कौशल्य आणि समस्या निवारण करण्याचे कौशल्य आत्मसात् करा अन् त्यांचा अभ्यास करा.

इ. स्वतःमध्ये समृद्धता आणि साधेपणा उभारा. ध्येय ठेवा आणि ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा. जरी प्रत्यक्ष ध्येय साध्य झाले किंवा झाले नाही, तरी त्याची जाणीव झाली, म्हणजे पुष्कळ काही मिळवले, असे होईल.

रामायण-महाभारत यांच्या कालमापनाचे संशोधनकार्य !

१. महाभारताचे कालनिर्धारण

‘When Did the Mahabharata War Happen ? – The Mystery of Arundhati’ नावाच्या त्यांच्या पुस्तकात ओक यांनी व्यासमुनींनी लिहिलेल्या महाभारतातील खगोलशास्त्रीय संदर्भांचा अभ्यास केला आहे. त्यांच्या संशोधनानुसार, महाभारत युद्ध  इ.स. पू. ५ सहस्र ५६१ मध्ये झाले. ‘अरुंधती-वासिष्ठ’ यांचा विशेष उल्लेख केला जातो – ज्या काळात अरुंधती वसिष्ठाच्या पुढे जात होती, ही खगोलशास्त्रीयदृष्ट्या एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे आणि हीच गोष्ट महाभारतात नमूद आहे.

२.️ रामायणाचे कालनिर्धारण

‘The Historic Rama’ या त्यांच्या पुस्तकात डॉ. ओक यांनी वाल्मीकि रामायणातील खगोलशास्त्रीय संदर्भांचा अभ्यास करून रामायणातील घटनांचा काल ठरवला. त्यांच्या संशोधनानुसार रामायणातील घटना इ.स. पू. १२ सहस्र २०९ च्या सुमारास घडल्या. ग्रंथातील ऋतूंचे वर्णन, ग्रहस्थिती, चंद्र-सूर्यग्रहणे, नक्षत्रे आदींचा अभ्यास करून त्यांनी हे निष्कर्ष मांडले आहेत.

३. संशोधनपद्धत

अ. आधुनिक खगोलशास्त्राचे सॉफ्टवेअर वापरून ग्रह-नक्षत्रांची संगती तपासणे.

आ. भूगोल, पुरातत्व, ग्रंथसामग्री यांची पडताळणी करणे.

इ. ग्रंथातील अंतर्गत सुसंगतता आणि तार्किक स्थिरता राखणे.

ते विविध पॉडकास्ट, परिषदा आणि ‘इंडिक’ मंचांवर इतिहासाच्या भारतीय दृष्टीकोनातून मांडणी करण्याचे काम करतात.

जगातील प्राचीन सभ्यतांच्या संशोधकांमध्ये एक असलेले नीलेश ओक !

श्री. नीलेश ओक यांना मिळालेल्या अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांपैकी काहींचा उल्लेख !

प्राईड ऑफ अमेरिका : जागतिक सभ्यतेविषयी संशोधन करणार्‍या अमेरिकी नागरिकांना हा पुरस्कार दिला जातो.

सुराभारती समुपासक सन्मान : संस्कृत आणि संस्कृत वाङ्मय यांमध्ये योगदान अन् त्यांचे वैज्ञानिक संशोधन यांच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार देण्यात आला.

श्री. ओक यांच्या व्यावसायिक कारकीर्दीत त्यांना मिळालेल्या काही पुरस्कारांचा नामोल्लेख !

‘जीई पावर अवार्ड’, ‘सिक्स सिगमा गुरु’, ‘लीन जेदी’, ‘बीटा गामा सिगमा’ पुरस्कार

हे ही अवश्य पाहा → श्री. नीलेश ओक यांचा ‘सनातन प्रभात’ने घेतलेला पॉडकास्ट

भाग १

भाग २

भाग ३ 

🪷हिंदुत्वाचे शिलेदार या सदरामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मान्यवरांची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा !🪷