रुग्णालयाची अपकीर्ती न होण्यासाठी डॉ. सुश्रुत घैसास यांचे त्यागपत्र !

रुग्णालय व्यवस्थापन योग्य निर्णय घेईल ! – डॉ. केळकर, अधिष्ठाता

पुणे – येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रसृतीतज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांनी रुग्णालयाची अपकीर्ती होऊ नये; म्हणून त्यागपत्र रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्द केला आहे. रुग्णालय व्यवस्थापन त्यावर चर्चा करून योग्य निर्णय घेईल, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. धनंजय केळकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

डॉ. केळकर पुढे म्हणाले की, रुग्णालय आगाऊ रक्कम (डिपॉझिट) घेत नाही; मात्र डॉ. घैसास यांनी कशासाठी रुग्णालयाच्या पेपरवर ते लिहून दिले, हे माहिती नाही. अतिशय मोठ्या संख्येत रुग्ण आल्यावरच डिपॉझिट घेतले जाते, तेही आता बंद केले आहे. विविध शासकीय अहवाल आल्यावरच या प्रकरणी आमचे मत देऊ. आम्ही आमच्या कराचे पैसे न्यायालयात भरतो. त्यामुळे ‘आम्ही कर थकवला’ या म्हणण्यात तथ्य नाही.

भाजपच्या काही महिला पदाधिकार्‍यांनी घैसास यांच्या रुग्णालयामध्ये तोडफोड केल्याचे प्रकरण !

कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेणे योग्य नाही ! – प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णीं, भाजप, खासदार

पुणे – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकार समोर आल्यानंतर भाजपच्या काही महिला पदाधिकार्‍यांनी घैसास यांच्या रुग्णालयामध्ये तोडफोड केली होती. यावरून कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे सांगत भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णीं यांनी शहराध्यक्षांना पत्र लिहित पदाधिकार्‍यांना फैलावर घेतले.

प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, डॉ. सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या रुग्णालयाचा या घटनेशी काही संबंध नसतांना केलेले हे मोडतोडीचे आणि उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे. तोडफोड करणे हे भाजपच्या पुणे महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे आणि इतर पदाधिकार्‍यांना निश्चितच शोभत नाही. राजकीय व्यक्तींनी कायम कृतीला विचारांची जोड देऊन कार्य करणे आवश्यक असते.