
सोलापूर – आज हिंदु धर्म आणि धर्मीय यांवर विविध प्रकारचे आघात होत आहेत. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्यासाठी संघर्ष केला, त्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. किशोर जगताप यांनी केले. धाराशिव येथील सांजा येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते.

श्री. जगताप यांनी हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व, वक्फ कायदा, हिंदुविरोधी नॅरेटिव्ह (खोटे कथानक) इत्यादी विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रत्येक हिंदूने स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी धर्मशिक्षण घेणे आणि ते आचरणात आणणे, नोकरी, व्यवसाय सांभाळत असतांनाही धर्मरक्षणासाठी संघटितपणे कृती करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
सांजा परिसरात सर्व धर्मप्रेमी हिंदूंनी या सभेची सिद्धता आणि प्रसार केला. या सभेला २०० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. सभेनंतर झालेल्या आढावा बैठकीत २५ हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. उपस्थितांनी २ ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली, तसेच ‘गावात अनेक ठिकाणी सामूहिक आरतीच्या माध्यमातून तरुणांचे संघटन करणार’, असे सांगितले.