कुणाल कामरा पुन्हा मुंबई पोलिसांसमोर उपस्थित झाले नाहीत !
(‘बुक माय शो’ हे चित्रपट, नाटके, तसेच अन्य कार्यक्रम यांसाठी ऑनलाईन संकेतस्थळ आणि ॲप आहे.)
मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबन गाण्याच्या प्रकरणात विनोदी कलाकार कुणाल कामरा ५ एप्रिल या दिवशी मुंबई पोलिसांसमोर उपस्थित झाले नाहीत. पोलिसांनी पाठवलेल्या समन्सचे पालन न करण्याची कामरा यांची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी पोलिसांनी कामरा यांना २ समन्स पाठवले होते. दुसरीकडे याच दिवशी ‘बुक माय शो’ने त्यांच्याशी संबंधित सर्व सामग्री काढून त्यांचे नाव त्यांच्या संकेतस्थळावरील कलाकारांच्या सूचीतूनही काढले आहे. कामरा यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत ३ गुन्हे नोंद आहेत.
शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांनी ३ एप्रिल या दिवशी ‘बुक माय शो’ला एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये त्यांनी कुणाल कामरा यांना त्यांच्या भविष्यातील ‘शो’साठी व्यासपीठ देऊ नये, अशी विनंती केली होती. कुणाल कामरा १ एप्रिल या दिवशी मद्रास उच्च न्यायालयात उपस्थित झाले होते. त्यांनी असा दावा केला होता की, पोलीस त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत; म्हणून त्याला ‘ट्रान्झिट ॲन्टिसिपेटरी’ (संक्रमण अटकपूर्व) जामीन मान्य करावा. या खटल्याची सुनावणी करतांना न्यायमूर्ती सुंदर मोहन यांनी कामरा यांना जामीन मान्य केला. यानंतर त्यांनी याविषयी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटरवर) एक पोस्ट प्रसारित केली.