कोल्हापूर – ८ मार्च या जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने ‘महिला पतंजली योग समिती‘ यांच्या वतीने माता-भगिनी यांच्यासाठी गांधी मैदान येथे राज्यस्तरीय महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनासाठी योगऋषी
योगऋषी स्वामी रामदेवबाबा, तसेच ‘मातृशक्ती’च्या प्रेरणास्थान केंद्रीय प्रभारी साध्वी देवप्रियाजी या उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला वरिष्ठ राज्य प्रभारी सुधाताई अळ्ळीमोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ‘भागीरथी महिला संस्थे’च्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, सन्मती मिरजे, ‘पतंजलि योग समिती महाराष्ट्र राज्या’चे प्रभारी चंद्रशेखर खापणे, ‘हिल रायडर्स’चे प्रमोद पाटील उपस्थित होते.
याचा प्रारंभ सकाळी ८ वाजता कुंकूमार्चनाने होणार आहे. यानंतर सकाळी ९ वाजता योगऋषी स्वामी रामदेवबाबा, तसेच साध्वी देवप्रियाजी हे योग, आयुर्वेद, स्वदेशी, गुरुकुल यांसह अन्य विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. याचसमवेत सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांच्या रणरागिणी, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, विविध क्षेत्रांत कार्य करणार्या महिलांचा सन्मान, संस्थांचा सत्कार असे कार्यक्रम होणार आहेत. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून १० सहस्र महिला सहभागी होतील. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी योग समितीच्या १०० योगशिक्षिका सहभागी होणार आहेत. महिलांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, तरी या संमेलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सुधाताई अळ्ळीमोरे यांनी केले आहे.