CM Yogi On SAMBHAL : संभलमध्ये जे हिंदूंचे आहे, ते त्यांना मिळालेच पाहिजे !

जे आपले आहे, ते आपल्याला मिळालेच पाहिजे – मुख्यमंत्री योगींचा घणाघात !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : यावर्षी २६ फेब्रुवारी या दिवशी महाशिवरात्रीच्या वेळी ५६ वर्षांनंतर संभलमधील बंद असणार्‍या शिवमंदिरात जलाभिषेकाचा कार्यक्रम झाला. एका खोडसाळ कारस्थानाचा भाग म्हणून संभलच्या ६८ तीर्थक्षेत्रांच्या आणि १९ विहिरींच्या खुणा पुसण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. येथे आता ६८ तीर्थक्षेत्रांपैकी ५४ तीर्थक्षेत्रे आणि १९ विहिरींचा शोध लागला आहे. अनेक वर्षांमध्ये यांना जाणीवपूर्वक लपवण्यात आले होते. जे आपले आहे, ते आपल्याला मिळाले पाहिजे. याखेरीज दुसरे काही नाही, असा घणाघात उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेत केला.

संभल येथे भगवान विष्णूचा कलियुगातील कल्की अवतार होणार आहे. येथे पृथ्वीराज चौहान यांच्या काळात श्री हरिहर मंदिर बांधण्यात आले होते. या मंदिराच्या परिसरात प्राचीन नकाशानुसार ६८ तीर्थक्षेत्रे आणि १९ विहिरी आहेत. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच मंदिराची मशीद करण्यात आली असून ती परत मिळवण्यासाठी हिंदूंकडून न्यायालयाच्या माध्यमांतून प्रयत्न चालू आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे हे विधान महत्त्वाचे म्हटले जात आहे.

संभल येथील मूळचे श्री हरिहर मंदिर असलेली ‘वादग्रस्त इमारत’ !

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की,

१. ४६ वर्षांपासून बंद असलेल्या खग्गू सराई येथील कार्तिकेश्‍वर मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. त्याचप्रमाणे सरयात्रीमध्ये, वर्षानुवर्षे बंद असलेल्या राधाकृष्ण मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. पायर्‍यांची एक मोठी विहीर सापडली.

२. अधिवक्ता आयुक्त आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्या सर्वेक्षण अहवालातूनही येथील शाही जामा मशिदीविषयीचे सत्य उघड झाले आहे. वक्फ मालमत्तेच्या नावाखाली खेळला जाणारा खेळ उघडकीस आला आहे.

३. संभलला धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी मोठ्या योजना आखल्या जात आहेत. यामुळे स्थानिक व्यवसायाला चालना मिळेल.