उत्तरप्रदेशात वादळी वार्‍यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश राज्याला वादळी वार्‍यासह पडलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. उन्नाव आणि गाझीपूर येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाला, तर कासगंजमध्ये घराचे छत कोसळून पती-पत्नी आणि मुलगी यांचा जीव गेला. यासह मध्यप्रदेशातील इटारसी येथे झालेल्या वादळी पावसामुळे रुग्णवाहिकेवर झाड कोसळले. राजस्थानातील चुरू येथे भिंत कोसळून चौघेजण घायाळ झाले. झारखंड आणि ओडिशा येथे मौसमी पावसाचे आगमन झाले असून पुढील काही दिवसांत तो उत्तरप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पोचण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अनेक राज्यांत पाऊस चालू असला, तरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे कायम आहे.