राज्यातील धरणांमध्ये २५ टक्के पाणीसाठा शेष !

  • सर्व धरणांमधील पाणी पिण्यासाठी राखीव आणि अन्य कारणांसाठी पाणी उपसाबंदी लागू !

  • पुणे विभागात सर्वाधिक अल्प म्हणजे १५ टक्के पाणीसाठा

कोल्हापूर, १४ जून (वार्ता.) – जूनचा पंधरवडा पूर्ण होत आला, तरी राज्यात पावसाळा लांबल्याने धरणांमधील पाण्याच्या साठ्याची स्थिती गंभीर झाली आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवाडीनुसार नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण या ६ विभागांमधील ३ सहस्र २८ लहान अन् मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ २४.७४ टक्के पाणीसाठा शेष आहे. गतवर्षी तो ३०.५९ टक्के होता. पुणे विभागातील पाणीसाठा सगळ्यांत अल्प म्हणजे केवळ १४.५७ टक्के आहे. जलसंपदा विभागाने राज्यातील सर्वच धरणांमधील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले असून सिंचनासाठी पाणी उपसाबंदी लागू केली आहे.

‘एल् निनो’च्या पार्श्वभूमीवर विभागाने काढलेल्या परिपत्रकात सर्व जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांना त्यांच्या क्षेत्रातील धरणे अन् जलाशये यांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत सर्व शहरी आणि ग्रामीण भागांत अखंडित पिण्याचा पाण्याचा पुरवठा होईल, यासाठी धरणामध्ये आवश्यक पाणीसाठा आरक्षित करून तो वापरण्यासाठी कृती आराखडा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राधानगरी धरणात केवळ २६ टक्के पाणीसाठा

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या असलेल्या राधानगरी धरणाची क्षमता २३६.७९ दशलक्ष घनमीटर (८ टी.एम्.सी.) असून सध्या केवळ २.१६ टी.एम्.सी. म्हणजे २६ टक्के इतका पाणीसाठा शेष आहे.

कोल्हापूर शहरात १ दिवसाआड पाणीपुरवठा

काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी अल्प झाल्याने ‘थेट वाहिनी योजने’द्वारे होणारा पाणीउपसा बंद झाला आहे. यामुळे या योजनेतून शहराला पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्य योजनांमधून पाणीउपसा चालू आहे. पंचगंगा नदीतील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन कोल्हापूर शहर आणि उपनगरात १ दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

कोयना धरणात १४.३८ टी.एम्.सी. पाणीसाठा

पश्चिम महाराष्ट्रासाठी जीवनदायिनी असणार्‍या कोयना धरणातील पाण्याने तळ गाठला असून धरणात केवळ १४.३८ टी.एम्.सी. पाणीसाठा शिल्लक आहे.

पिण्याचे पाणी सोडून सिंचन आणि अन्य कारणासाठी उपसाबंदी लागू झाल्याने शेतकर्‍यांसाठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पुण्यातील उजनीसह, कोयना, तसेच अनेक धरणांमधील पाणी हे लहान-मोठे प्रकल्प आणि कालव्यांद्वारे शेतीसाठी पुरवले जाते. धरणांमध्येच पुरेसे पाणी नसल्याने शेतीसाठी पाणी मिळणे कठीण आहे. विहिरी आणि कूपनलिका यांतील पाणीही खाली गेले आहे किंवा काहींच्या कूपनलिका आटल्या आहेत. अशा स्थितीत शेती टिकवायची कशी ? हा मोठा प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे.

 

संपादकीय भूमिका

धरणांमधील अल्प पाणीसाठा पहाता राज्य सरकार भीषण दुष्काळाचा सामना करण्यास सिद्ध आहे का ?