
निपाणी – निपाणी नगरपालिकेच्या हद्दीतील ४४ ‘एफ्’मधील जागा सर्व धर्मियांसाठी राखीव असतांना ही जागा ‘इस्लाम असोसिएशन’ला देण्याचा घाट नगरपालिका प्रशासन घालत आहे. त्याला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला असून विशेष सभा घेऊन हा ठराव रहित करावा, या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष सोनल कोठडीया यांना देण्यात आले.
नगराध्यक्ष सोनल कोठडीया यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जागा सर्वांसाठीच राखीव असतांना ठराविक धर्माच्या संस्थेला देऊन धर्मांधतेला खतपाणी घालण्याचे प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे. वर्ष २०१७ मध्ये मतांच्या लांगूलचालनासाठी ही जागा सदर संस्थेला देण्याचा ठराव नागरिकांना विश्वासात न घेता झाला होता. या राखीव जागेत सर्वांसाठी उपयुक्त अशी बाग, वाचनालय, व्यायामशाळा, गोशाळा बांधण्यासाठी प्रयत्न केल्यास त्याचा सर्वांना लाभ मिळेल. तरी ही जागा देण्याचा ठराव विशेष सभा घेऊन रहित करावा, अन्यथा त्याचे तीव्र पडसाद उमटून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. या वेळी बजरंग दलाचे श्री. अजित पारळे, श्री. अतीश चव्हाण, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनिल बुडके, श्री. विशाल जाधव, ‘श्रीराम सेना कर्नाटक’चे श्री. बबन निर्मले आणि श्री. अमोल चेंडके, ‘हिंदु हेल्पलाइन’चे श्री. सागर श्रीखंडे, श्री. जयदत्त काळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. सुमेध देशपांडे, श्री. प्रवीण सूर्यवंशी, श्री. महेश शिंदे, यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.