Congress Called Temples For Funds : हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारने सरकारी योजनांसाठी हिंदूंच्या मंदिरांकडे मागितले पैसे !

(म्हणे) ‘विनामूल्य पैसे देण्याच्या योजनांसाठी सरकारकडे पैसे नाहीत !’

हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू

शिमला (हिमाचल प्रदेश) – विनामूल्य भेटवस्तू वाटपामुळे आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारचे लक्ष आता मंदिरांवर आहे. हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने राज्यातील मोठ्या मंदिरांना पत्र लिहून सरकारी योजना चालवण्यासाठी मंदिरांकडून पैसे मागितले आहेत. सरकारने त्यांच्या २ योजनांसाठी पैसे देण्याची विनंती केली आहे. भाजपने याला विरोध केला आहे.

१. काँग्रेस सरकारच्या भाषा आणि संस्कृती विभागाने २९ जानेवारी या दिवशी मंदिरांच्या न्यासांना (ट्रस्टला) पत्र लिहिले आहे. यामध्ये मंदिर समित्यांना गरजू मुलांना साहाय्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.

२. सरकारच्या आवाहनावरून जिल्हा दंडाधिकार्‍यांनी मंदिरांच्या न्यासांना पत्रे पाठवली  आहेत. सरकारच्या अखत्यारीतील मंदिरे ‘मुख्यमंत्री सुखाश्रय’ आणि ‘मुख्यमंत्री – सुख शिक्षा’ या योजनांमध्येही साहाय्य करतील, असे पत्रात लिहिले होते.

३. हिमाचल प्रदेशात जिल्हा प्रशासनाकडून ३६ प्रमुख हिंदु मंदिरांची देखभाल केली जाते. या मंदिरांमधून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. तथापि, हे एक आवाहन होते आणि या योजनांना पाठिंबा द्यायचा कि नाही, हे मंदिर समित्यांवर सोडण्यात आले होते.

हिमाचल प्रदेश काँग्रेस प्रशासनाकडून मंदिरांना लिहिलेले पत्र –

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

सरकारकडून चालवल्या जातात या विनामूल्य पैसे वाटप योजना !

‘मुख्यमंत्री – सुख शिक्षा’ योजनेच्या अंतर्गत विधवा, घटस्फोटित, निराधार महिला आणि अपंग पालकांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य अन् पोषण यांसाठी आर्थिक साहाय्य दिले जात आहे. यासाठी पात्रता १८ वर्षांपेक्षा अल्प वयाची आहे. यांतर्गत अशा प्रत्येक मुलाला प्रतिमहिना १ सहस्र रुपये दिले जात आहेत.

‘मुख्यमंत्री सुखाश्रय’ योजनेअंतर्गत सरकारने ६ सहस्र मुलांना दत्तक घेतले आहे आणि त्यांना ‘राज्याची मुले’ असा दर्जा दिला आहे.

भाजपने दर्शवला प्रखर विरोध !

विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर म्हणाले की, काँग्रेस सरकार सनातन अन् हिंदु यांना विरोध करते आणि दुसरीकडे मंदिरांकडून पैसे घेऊन योजना चालवू इच्छिते.

मंदिरांकडून पैसे घेऊन ते सरकारकडे लवकर पाठवण्यासाठी अधिकार्‍यांवर दबाव आणला जात आहे. लोकांनी याचा विरोध करावा, असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे.

हिमाचल प्रदेशातील केवळ २ मंदिरांचा असा आहे देवनिधी !

हिमाचल प्रदेशातील सरकारच्या अखत्यारीत ३६ मंदिरांमध्ये सर्वांत श्रीमंत मंदिर म्हणजे उना जिल्ह्यातील मां चिंतापूर्णी मंदिर. या मंदिराच्या तिजोरीत १०० कोटी रुपयांच्या मुदत ठेवी, १ सहस्र ९८ किलोपेक्षा अधिक सोने आणि ७२ सहस्र किलो चांदी आहे.

बिलासपूर येथील शक्तीपीठ नैनादेवी मंदिरात ११ कोटी रुपये रोख आणि ५८ कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांच्या मुदत ठेवी बँकेत आहेत. तसेच १ सहस्र ८० किलो सोने आणि ७२ सहस्र किलोपेक्षा अधिक चांदी आहे. याखेरीज इतर अनेक शक्तीपीठांमध्येही अब्जावधी रुपयांची मालमत्ता आहे.

संपादकीय भूमिका

  • काँग्रेस सरकारला जर पैसेच हवे आहेत, तर तिने मशिदी, चर्च किंवा अन्य धर्मियांच्या धार्मिक आणि सामाजिक संस्थांकडे पैसे का मागितले नाही ?
  • लोकांना विनामूल्य पैसे देण्याच्या घोषणा करून सत्ता मिळवणार्‍या काँग्रेस सरकारला यावरून देशभरातील हिंदूंनी जाब विचारला पाहिजे. एकीकडे हिंदु धर्माची हेटाळणी करायची, अवमान करायचा आणि दुसरीकडे त्याच हिंदूंच्या मंदिरांकडे भीक मागायची, याची काँग्रेसला लाज कशी वाटत नाही ?