रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधक श्री. रामानंद परब (वय ४१ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांना एका जिल्ह्यात अध्यात्मप्रसाराची सेवा करणार्या एका साधिकेने ‘सत्संगात ‘सत्सेवा’ हा विषय कसा शिकवायचा ?’, याविषयी विचारले होते. त्या वेळी देवाने श्री. रामानंद यांना ‘अध्यात्मात गुरूंच्या व्यष्टी आणि समष्टी रूपाची सेवा करतांना तळमळीने भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा केल्याने कोणते लाभ होतात ?’, याविषयी काही सूत्रे सुचवली. ती सूत्रे सर्वच साधकांच्या साधनेसाठी उपयुक्त ठरणारी असल्याने येथे प्रसिद्ध करत आहोत. – संकलक

१. जलद आध्यात्मिक उन्नती होणे
‘आपण गुरूंची सेवा करत आहोत’, असा भाव ठेवून सेवा केली, तर ती भावपूर्ण आणि परिपूर्ण होते. त्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती जलद होते.
२. सध्याच्या प्रतिकूल काळात मिळालेली प्रत्येक सत्सेवा मनापासून केल्याने आपल्याला त्या सेवेचे फळ अधिक मिळते.
३. आपण सत्सेवा करतांना लक्षात आलेल्या स्वभावदोषांचे निर्मूलन व्हावे, यासाठी प्रयत्न केले, तर आपल्याला आनंद मिळतो.
४. जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून लवकर मुक्तता होणे
आपण देहभान हरपून सत्सेवा केली, तर आपल्याला सेवेतील चैतन्य अधिक प्रमाणात मिळते. त्यामुळे आपले प्रारब्ध न्यून होण्यास साहाय्य होते आणि आपली जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्तता लवकर होते.
५. गुरूंची कृपा अधिक होणे
सत्सेवेमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असे काही नसते. छोटी-मोठी सेवा याला महत्त्व नाही, तर तळमळीने सेवा करण्याला पुष्कळ महत्त्व आहे. आपण तळमळीने सत्सेवा केली, तर आपल्यावर गुरूंची कृपा अधिक होते. सत्सेवा करतांना येणार्या अडचणीही गुरूंच्या कृपेने दूर होतात.
६. प्रार्थनेमुळे कर्तेपणाचे विचार न येणे
सत्सेवा करतांना अधिकाधिक प्रार्थना केल्याने देव आपल्याला सतत भावाच्या स्थितीत ठेवतो. प्रार्थना केल्याने आपली भावाची स्थिती ३० टक्के वाढते आणि सेवेत देवाचे साहाय्य अधिक मिळते. आपल्या मनात सेवेविषयी कर्तेपणाचे विचार येत नाहीत.
७. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता येणे
सत्सेवा करतांना भावाच्या स्थितीत राहिल्याने आपल्याला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता येते.
८. ईश्वरप्राप्ती लवकर होते
देव भावाचा भुकेला असतो. आपली सेवा भावपूर्ण झाली, तर देव आपल्यावर प्रसन्न होतो आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. ‘ईश्वरप्राप्ती लवकरात लवकर व्हावी’, ही आपली एकमेव इच्छा असली पाहिजे. आपल्याला सत्सेवेतूनच हे साध्य करायचे आहे.
९. ‘साधक ते शिष्य’ असा साधनेचा प्रवास करता येणे
आपल्याला ‘साधक ते शिष्य’ असा साधनेचा प्रवास करायचा आहे. ‘मिळालेली सत्सेवा मनापासून स्वीकारणे, देवाला आळवणे आणि परिपूर्ण सेवा होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे’, ही सूत्रे लक्षात घेऊन सत्सेवा केल्यास आपले ध्येय साध्य होऊ शकेल.’
– श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.८.२०२४)