परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या योग्‍य मार्गदर्शनामुळे मायावी आनंदापासून मुक्‍त होऊन शाश्‍वत आनंदाकडे वाटचाल करणारी कु. निधी देशमुख !

‘प्रत्‍येकाला कुठला ना कुठला छंद असतो. छंद सात्त्विक असणे आणि तो छंद जपणारी व्‍यक्‍ती मूलतः सात्त्विक असणे आवश्यक आहे, अन्यथा ती व्यक्‍ती आणि अपरोक्षपणे समाज यांची हानी होते. व्यक्‍तीस्‍वातंत्र्याची आवई उठवणार्‍या या युगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘व्यक्ती, कला आणि त्या माध्‍यमातून समाज’ यांचा सर्वांगीण उत्कर्ष होण्यासाठी वेळोवेळी अमूल्य मार्‍गदर्शन केले आहे. त्यांनी मला केलेल्या अमूल्‍य मार्गद़र्शनाबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने मी हे लिखाण केले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. लहानपणापासून नृत्‍याची आवड असणे; पण नृत्‍याचे शास्‍त्रीय शिक्षण घेता न येणे

मला लहानपणापासूनच नृत्‍याची आवड होती; पण मला त्‍याचे शास्‍त्रीय शिक्षण घेता आले नाही. ‘माझ्या नृत्यावर केवळ देवाचा अधिकार आहे. देवदासी जशा केवळ देवासाठी नाचायच्या, तसे मला देवासाठी नृत्य करायचे आहे’, या विचाराने शिक्षण घेता न आल्याचे मला कधी दुःख झाले नाही. ‘हे देवाचेच नियोजन होते’, हे आता माझ्या लक्‍षात येतेे. मला शास्त्रीय नृत्याचे शिक्षण मिळाले असते, तर मला त्याचा अहंकार झाला असता आणि मी जीवनाच्या खर्‍या ध्येयापासून दूर गेले असते.

२. ‘नृत्‍य करणे’, हे भावभावना व्‍यक्‍त करण्‍याचे योग्‍य माध्‍यम आहे’, असे वाटणे 

२ अ. येता-जाता, चालता-बोलता नृत्‍य करणे आणि नृत्‍यासाठी संगीताचीही आवश्यकता न भासणे : नृत्‍य करण्‍यासाठी मला कशाचीही आवश्‍यकता नसायची. नृत्‍यासाठी मी वेगळा वेळही देत नसे. येता-जाता, चालता-बोलता, घरातील कामे करतांना, कधीही मी नृत्‍य करायचे. नृत्‍यासाठी संगीत असायलाच हवे, असे नव्‍हते. कधी मनात आले, तर मी ढगांच्या गडगडाटावर किंवा पावसाच्या आवाजावरही नृत्य करायचे.

कु. निधी देशमुख

२ आ. ‘नृत्‍य हेच मनातील भावभावना अभिव्‍यक्‍त करण्‍याचे माध्‍यम आहे’, असे वाटणे : माझ्‍यासाठी ‘नृत्‍य’ हे मनातील कुठलीही भावना अभिव्‍यक्‍त करायचे माध्‍यम झाले होते. मला क्रोध आला, तर तो दूर करायला मी तीव्र गतीने नृत्‍य करायचे. मला दुःख झालेे, तर मी आनंद व्यक्त करणारे नृत्य करायचे. मला कशाचा त्रास होत असेल, तर मी तो त्रास देवाला नृत्याच्या माध्यमातून सांगायचे.

३. नृत्‍याच्‍या माध्‍यमातून आध्‍यात्मिक त्रास प्रकट होत असणे

३ अ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी ‘आध्‍यात्मिक त्रासामुळे नृत्‍य करत आहेस’, असे लक्षात आणून देणे : वर्ष २००७ मध्‍ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात नृत्‍याच्‍या संदर्भात संशोधनाच्‍या दृष्‍टीने नृत्‍याचे प्रयोग चालू होते. तेव्‍हा मलाही नृत्‍य करण्‍यास सांगितले होते. ‘देव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) आपले नृत्य बघणार’, या विचाराने मी नृत्य केलेे. या नृत्याच्या प्रयोगानंतर परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘तुझे नृत्य आध्यात्‍मिक त्रासामुळे होते.’’ त्यांनी माझ्या हे लक्षात आणून दिल्यावर मला प्रथम ते स्वीकारता आले नाही. माझ्या मनात ‘मी नृत्यामध्‍ये पूर्ण पावित्र्य ठेवले असून मी ‘उपासना आणि साधना’ या भावाने नृत्य करते’, असे विचार येत होते. हळूहळू माझ्या मनातील ते विचारही गुरुदेवांनीच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच) दूर केले.

३ आ. ‘‘साधना केली नसती, तर या जन्‍मात आणि पुढच्या जन्मीसुद्धा दुःख भोगले असते’’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे : नृत्‍याचे प्रयोग बघायला बरेच साधक येत असत. माझी नृत्‍यातील निपुणता आणि सहजता पाहून एका साधकाने माझ्‍यासमोरच परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना विचारले, ‘‘ही साधना करत नसती, तर ही कुणी नृत्‍यांगना झाली असती का ?’’ तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉक्‍टर म्‍हणाले, ‘‘साधना केली नसती, तर या जन्‍मात आणि पुढच्या जन्मीही हिने दुःख भोगले असते.’’

तेव्‍हा मला कळले, ‘व्‍यक्‍तीगत भाव-भावनांना महत्त्व नसते. ‘मी देवासाठी नाचते’, या विचारांत काही अर्थ नाही. स्‍थळ-काळ, म्‍हणजे व्‍यक्‍ती आणि काळ अनुकूल असायला हवे. संकटकाळात साधना नसली, तर योग्‍य कृतींचाही अपलाभ होतो.

४. एक वर्षभर प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या भजनांवर नृत्‍य करणे

४ अ. वर्ष २००७ मध्‍ये पूर्ण वर्ष प.पू. भक्‍तराज महाराज यांनी रचलेल्‍या आणि संगीतबद्ध केलेल्‍या भजनांवर नृत्‍य करणे : रामनाथी आश्रमात झालेल्‍या प्रयोगात ‘प.पू. भक्‍तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्‍या भजनांत सर्वाधिक चैतन्‍य आहे आणि त्यातून चैतन्य मिळते’, असा निष्कर्‍ष निघाला होता. त्यामुळे पुढचे पूर्ण वर्ष मी प.पू. बाबांनी लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या भजनांवर नृत्य केले. वर्ष २००८ मध्ये मी रामनाथी आश्रमात आले. तेव्हा बर्‍याच साधकांनी ‘तुझा आध्यात्मिक त्रास न्यून झाला आहे’, असे मला सांगितले.

४ आ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘अनिष्ट शक्ती स्वभावदोषांचा अपलाभ घेऊन तिची साधना वाढवून प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांवर नृत्य करते’, असे सांगून स्वभावदोष शोधून त्यावर उपाय शोधायला सांगणे : एकदा माझ्‍या वडिलांनी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना सांगितले, ‘‘प.पू. बाबांची भजने ऐकून ही नाचते.’’ परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला सांगितले, ‘‘त्‍याने तुझा आध्यात्मिक त्रास वाढतो. ते थांबव.’’ त्यावर मी विचारले, ‘‘मी प.पू. बाबांच्या भजनांवर उपाय म्हणून नृत्य करते.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘त्यातून अनिष्ट शक्ती तिची साधना वाढवते आणि मग नृत्य करते अन् काही दिवसांनी पुन्हा साधना वाढवते आणि परत नृत्य करते, असे हे चक्र आहे. ‘अनिष्ट शक्‍ती तुझ्या कोणत्या स्‍वभावद़ोषाचा अपलाभ घेेते ?’, हे पाहून त्याच्‍यावर उपाय काढायला शिक.’’ माझा हा त्रास दूर होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला माझ्या वडिलांचे ऐकायला सांगितले.

५. साधनेत आनंद मिळू लागल्‍यावर मायावी सुखाची ओढ न्‍यून होणे

‘नृत्‍य म्‍हणजे स्‍वतःला अभिव्‍यक्‍त करणे’, असे मला वाटायचे. मी योग्‍य पद्धतीने योग्‍य वेळी स्‍वतःला अभिव्‍यक्‍त करू शकत नाही. मला शब्‍दांत आपले मत व्‍यक्‍त करता येत नाही आणि मुख्य म्हणजे त्यातून मला आनंद मिळत नाही. बहुतेक त्यामुळे कृपाळू गुरुमाऊलीने मला लेखांचे हिंदीत भाषांतर करण्याची सेवा दिली. शब्दांच्या या विश्वात रमू लागल्यावर ‘माझे नृत्य करणे’ हळूहळू न्यून होऊ लागले. साधनेत मला आनंद मिळू लागल्यावर माझी या मायावी सुखाची ओढ न्यून झाली.

६. ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर जे सांगतील, त्‍यातून साधना होणार आहे’, अशी मनात दृढ श्रद्धा असल्‍याने नृत्‍याचे विचार पुन्‍हा मनात न येणे 

एकदा सत्‍संगात साधकांनी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना नृत्‍याच्‍या संदर्भात विचारले; पण ‘आपण असे काही विचारावे’, असे मला कधीही वाटले नाही. ‘माझ्‍यासाठी ते आवश्यक नसेल; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ‘साधना’ म्हणून नृत्य करण्यासाठी कधीच सांगितले नाही. माझा मार्ग वेगळा असेल. ते जे सांगतील, ती माझी साधना असेल’, असे मला वाटले.

७. वर्ष २०१७ मध्‍ये रामनाथी आश्रमात पुन्‍हा नृत्‍याचे प्रयोग चालू होणे, तेव्‍हा पुन्‍हा मनात नृत्‍याचे विचार तीव्र होणे

तेव्‍हा माझ्‍या मनात नृत्‍य करण्‍याचे विचार तीव्रतेने येऊ लागले. मी १ – २ जणांना तसे सांगितलेही. याच कालावधीत ‘दुसरे काही केले, तरी आनंद मिळत नाही’, अशी माझी अवस्‍था झाली.

८. नकारात्‍मक विचार आल्‍यावर देवाने सुचवलेले सकारात्‍मक विचार आणि नृत्य करण्याच्या विचारांवर केलेली मात !

८ अ. नृत्‍याच्‍या विचाराने मन अस्‍वस्‍थ होणे, तेव्‍हा ‘देव परिस्‍थितीतून तरून जायला शिकवत आहे’, असे सकारात्‍मक विचार येणे : मला वाटले, ‘मी परत मूळ स्‍थितीला येऊन पोचले. मी आतापर्यंत केलेली साधना आणि सर्व प्रयत्न शून्य झाले.’ तेव्हा देवाने मला सुचवले, ‘देव आपल्याला चंद्राची सोळावी कला शिकवत आहे. पंधरा दिवस चंद्र वाढत वाढत जातो आणि नंतर अमावास्येपर्‍यंत त्याचा क्षय होत जातो. नंतर पुन्हा तो नव्या तेजाने वाढत जातो आणि चमकतो. यातून देव आपल्याला या परिस्थितीतून तरून जायला शिकवत आहे.’

८ आ. ‘कलेपेक्षा विद्या श्रेष्‍ठ आहे’, असा विचार येऊन सकारात्मक रहाता येणे : ‘आपल्‍या जीवनात कुठलीच कला उरली नाही’, असे निराशेचे विचार मनात आल्यावर ‘कलेपेक्षा विद्या श्रेष्ठ आहे. देव मला ‘अध्यात्मविद्या विद्यानाम् ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक ३२), म्हणजे सर्व विद्यांमधे श्रेष्ठ अशी अध्यात्मविद्या शिकवत आहे. ही सर्व बंधनांतून मुक्त करणारी विद्या आहे. ‘सा विद्या या विमुक्तये ।’, म्हणजे ‘जी (भवसागरातून) मुक्ती द़ेते, तीच खरी विद्या होय.’

८ इ. देवाला ‘हनुमंताप्रमाणे दास्‍यत्‍व प्रदान कर’, अशी प्रार्थना करणे : त्रासामुळे मला नृत्‍य करण्‍याची इच्‍छा अनावर व्‍हायची. तेव्‍हा हनुमंताला ‘बुद्धिमतां वरिष्‍ठम्’ (म्‍हणजे ‘बुद्धीवंतामध्‍ये श्रेष्‍ठ’) असे म्‍हटले जाते.  सर्वश्रेष्‍ठ असूनही त्‍याने सगळ्‍यांना ‘मी श्रीरामाचा दास आहे’, अशी आपली ओळख करून दिली. त्याचप्रमाणे कुठल्याही कलेमध्ये निपुण किंवा सर्वश्रेष्ठ होण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा ‘भगवंताचा दास होणे श्रेष्ठ आहे’, असा विचार करून मी देवाला ‘मला हे दास्यत्‍व प्‍रदान कर !’, अशी प्रार्थना करत असे.

९. कृतज्ञता

माझ्‍या मनात नकारात्‍मक विचार आले, तरी या वेळी देवाने लगेच सकारात्‍मक विचारही सुचवले. हे प्रभु, नकारात्‍मक विचार दूर होण्‍यासाठी उपाय केल्‍यामुळे आता ते विचार अल्प झाले आहेत. ‘स्व’विषयीचे विचार मनात आल्यामुळे मला पुष्कळ अपराधी वाटले. ‘मी क्षणोक्षणी चरण-सुखाला मुकत आहे’, असे मला वाटले; पण ‘या प्रसंगातून देव मला पुढच्या टप्प्यात नेत आहे’, याची मला जाणीव झाली. ‘देव मला मायावी सुखातून शाश्वत अशा आनंदाकडे नेत आहे’, यासाठी त्याच्या चरणी कृतज्ञता !’

१०. प्रार्थना

असे म्‍हणतात, ‘मोर नाचतांनाही रडतो आणि राजहंस मरतांनाही गातो.’ मी नाचत राहिले असते, तर सुख-दुःखात अडकलेे असते. आता देवाने मला त्याचे लीलागान करण्याची संधी दिली आहे. ‘मला अखेरच्या श्वासापर्यंत देवाचीच स्तुती करण्याचे भाग्य लाभो’, ही देवाच्या चरणी प्रार्थना !’

– कु. निधी देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक