Jamia Masjid Srinagar : श्रीनगरमधील जामिया मशिदीत ‘शब-ए-बारात’च्या रात्री नमाजपठणावर बंदी !

पोलिसांनी लावले कुलूप !

(शब-ए-बारात हा मुसलमानांचा एक महत्त्वाचा सण असून त्या दिवशी ते अल्लाचा आशीर्वाद मागण्यासह त्यांनी केलेल्या कुकृत्यांसाठी क्षमा मागत असतात.)

श्रीनगर – श्रीनगरमधील ऐतिहासिक जामिया मशिदीत ‘शब-ए-बारात’च्या रात्री जम्मू-काश्मीर पोलिसांनी सामूहिक नमाजपठण करण्यास अनुमती नाकारली आहे. यासमवेतच नमाजपठणाला आलेल्या मुसलमानांना संबोधित करणार्‍या फुटीरतावादी नेता मिरवाईज उमर फारूख याला पोलिसांनी नजरकैदेत ठेवले. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या निर्णयाला दुर्दैवी म्हटले आहे. ते म्हणाले की, जामिया मशीद बंद केल्याने प्रशासनाला स्वतःवर आणि लोकांवर विश्‍वास नाही.
मशिदीचे व्यवस्थापन बघणार्‍या अंजुमन औकाफ याने सांगितले की, पोलिसांनी १३ फेब्रुवारी या दिवशी मशीद रिकामी करण्यास सांगितले आणि नंतर मशिदीला कुलूप लावले.

सलग ६ वर्षांपासून नमाजपठणास बंदी !

जामिया मशिदीत ‘शब-ए-बारात’च्या रात्री सामूहिक नमाजपठण करण्यास पोलिसांनी अनुमती न देण्याचे हे सलग सहावे वर्ष आहे. वर्ष २०१९ पासून येथे नमाजपठण करण्यास अनुमती नाही. अंजुमन औकाफने या बंदीला दडपशाहीचे पाऊल म्हटले आहे. तो म्हणाला की, अशा वारंवार निर्बंधांमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातातच, शिवाय त्यांच्या मूलभूत धार्मिक अधिकारांचेही उल्लंघन होते.

संपादकीय भूमिका

या घटनेवरून भारतातील धर्मनिरपेक्षतावादी चमूच्या जोडीला पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांनी ‘मुसलमानद्वेष’ आणि ‘हुकुमशाही’ असा राग आळवून भारताला काश्मीरविरोधी म्हणण्यास आरंभ केला, तर आश्‍चर्य वाटू नये !