Prayagraj Kumbh Parva 2025 : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ५२ वरिष्ठ अधिकार्‍यांची महाकुंभक्षेत्री केली नियुक्ती !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

  • प्रयागराज येथील वाहतूक कोंडीचे प्रकरण

  • आयुक्त, तसेच पोलीस उपमहानिरीक्षक रस्त्यावर उतरले !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) : येथील झालेली वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी आणि भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयागराज येथील पोलीस आयुक्त विजय विश्‍वास पंत अन् पोलीस उपमहानिरीक्षक अजय पाल शर्मा रस्त्यावर उतरले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १० फेब्रुवारीच्या सायंकाळी विशेष कृती दलाचे प्रमुख अमिताभ यश यांना विशेष विमानाने प्रयागराज येथे पाठवले आहे, तसेच मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ५२ नवीन आय.ए.एस्, आय.पी.एस्. आणि पी.सी.एस्. अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. सर्वांना त्वरित प्रयागराज गाठून कर्तव्यात सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे. १० फेब्रुवारीपासून ते १३ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत महाकुंभक्षेत्री वाहनांना प्रवेशबंदी आहे. केवळ प्रशासकीय आणि आरोग्य विभागांच्या वाहनांना प्रवेश असेल.

शहरात वाहतूक कोंडी होणार नाही ! – तरुण गाबा, पोलीस आयुक्त

प्रयागराजचे पोलीस आयुक्त तरुण गाबा म्हणाले की, भाविकांना सुखद अनुभव मिळावा, याची आम्ही निश्‍चिती करत आहोत. आता लक्ष्मणपुरी, जौनपूर, प्रतापगड, चित्रकूट, रिवा, वाराणसी यांसह सर्व मार्गांवर वाहतूक सुरळीत आहे. शहरात वाहतूक कोंडी नाही. वाहने वेगवेगळ्या वाहनतळांच्या ठिकाणी पाठवली जात आहेत. लोकांनी केवळ संगमाकडे जाण्याचा प्रयत्न करू नये. माघ पौर्णिमेपूर्वी कुंभमेळा परिसर आजपासून ‘नो व्हेइकल झोन’ असेल. कल्पवासींसाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेली वाहने क्रेनच्या साहाय्याने उचलली जात आहेत.