साधकांचे आध्यात्मिक पिता होऊन त्यांच्यावर निरपेक्ष प्रेमाचा वर्षाव करणारे पू. अशोक पात्रीकर (वय ७४ वर्षे) !

‘पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे समष्टी संत) यांच्या ‘ऐंद्री शांती विधी’च्या निमित्ताने १.२.२०२५ च्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये त्यांच्या कुटुंबियांनी लिहिलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये वाचत असतांना माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले. माझ्या मनात त्यांच्या संदर्भातील स्मृती जाग्या झाल्या.

पू. अशोक पात्रीकर

१. साधकांचे आध्यात्मिक पिता

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये यापूर्वी प्रकाशित झालेले पू. काकांच्या साधनाप्रवासाच्या संदर्भातील लेख मला आठवले. पू. काका आम्हा साधकांचे आध्यात्मिक पिता आहेत. पू. काका आमच्यावर निरपेक्ष प्रेमाचा वर्षाव करतात. त्यांनी आम्हाला आमच्या चुका कधी प्रेमाने, तर कधी कठोर शब्दांत सांगितल्या. ‘आमच्या साधनेची हानी होऊ नये’, या तळमळीने पू. काकांनी आम्हाला त्यांच्याकडून क्वचित्च झालेल्या चुकांच्या प्रसंगी प.पू. गुरुदेवांनी त्यांना केलेल्या मार्गदर्शनातील सूत्रे सांगितली आणि आम्हाला साधनेचे योग्य दृष्टीकोन दिले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रतिरूप असलेले पू. पात्रीकरकाका

आमच्या सर्वच प्रकारच्या (शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक) अडचणी आम्ही मोकळेपणाने पू. काकांना सांगतो. पू. काका तेवढ्याच आत्मियतेने आमच्या अडचणी सोडवतात. ते आम्हाला प्रति परम पूज्यच भासतात.

३. गुरुकार्याचा ध्यास

अधिवक्त्या (श्रीमती) श्रुती भट

जिल्ह्यात वेळोवेळी होणारे उपक्रम, शिबिरे आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभा या सर्व प्रसंगी पू. काका वरचेवर दूरदूरच्या ठिकाणावरून प्रवास करून उपस्थित रहातात. ‘दुपारी महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही सेवा करत असतांना पू. काका विश्रांती घेत आहेत’, असे कधीच घडत नाही. त्यांना असलेला गुरुकार्याचा ध्यास पाहून आम्हालाच अपराध्यासारखे वाटते. ‘त्यांना वाटत असलेली गुरुदेवांप्रती कृतज्ञता आम्हाला त्या प्रमाणात जाणवत नाही’, याची आम्हाला नेहमीच जाणीव होते. आम्ही नेहमी साधनेच्या प्रत्येक प्रयत्नात अल्पच पडतो.

४. पू. पात्रीकरकाकांच्या संदर्भातील अनुभूती

पू. काकांना आम्ही वैयक्तिक किंवा साधकांच्या अडचणी मनमोकळेपणाने सांगतो. ‘आम्ही पू. काकांना अडचणी सांगत असतांनाच कितीतरी अडचणी सुटतात’, हे आम्ही नेहमी अनुभवतो.

५. कृतज्ञता

१.२.२०२५ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील पू. काकांच्या संदर्भातील सूत्रे वाचून आम्ही थोडेफार प्रयत्न करू शकलो, तरच आमच्याकडून पू. पात्रीकरकाकांच्या प्रती खर्‍या अर्थाने कृतज्ञता व्यक्त होईल. आमच्याकडून पू. काकांच्या श्री चरणी कृतज्ञतापूर्वक साष्टांग नमस्कार !

‘प.पू. गुरुदेवांनी आम्हा साधकांच्या मनातील पू. पात्रीकरकाकांप्रती असलेला भाव व्यक्त करण्याची संधी देऊन आमच्यावर कृपा केली’, त्याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– अधिवक्त्या (श्रीमती) श्रुती भट, अकोला (१.२.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक