प्रेमभाव असणार्‍या आणि इतरांचा विचार करणार्‍या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या कु. मयुरी डगवार !

सौ. स्वाती संदीप शिंदे यांना कु. मयुरी डगवार यांच्याकडून शिकायला मिळालेले सूत्र पुढे दिले आहे.

कु. मयुरी डगवार

१.  इतरांचा विचार करणे आणि प्रेमभाव 

‘आश्रमात मासातून एकदा नेहमीपेक्षा वेगळा अल्पाहार केला जातो. यामध्ये इडली, डोसे आणि साबुदाणा खिचडी इत्यादी पदार्थ बनवले जातात. ९.१.२०२५ या दिवशी आश्रमात अल्पाहारासाठी इडली करणार होते. आश्रमात आम्ही सेवा करतो त्या विभागात प्रसाद आणि महाप्रसाद यांच्या नोंदींची सेवा कु. मयुरी डगवार या पहातात. या विभागात साधकसंख्या अधिक आहे, तरीही त्यांनी लक्षात ठेवून आपलेपणाने सौ. प्रियांका वाडकर या साधिकेला भ्रमणभाष करून सांगितले, ‘एरव्ही तू अल्पाहार करत नाहीस; पण उद्या तुला अल्पाहार करायचा आहे. उद्या अल्पाहारासाठी इडली आहे. मी तुझी नोंद करत आहे.’ या प्रसंगात मला मयुरी यांच्याकडून ‘इतरांचा विचार करणे, प्रेमभाव आणि आपलेपणा’, हे गुण शिकता आले. छोट्या छोट्या प्रसंगांतही ‘आपण इतरांचा विचार कसा करू शकतो ? जवळीक कशी निर्माण करू शकतो ?’, हे मला शिकायला मिळाले.

सौ. स्‍वाती शिंदे

२. साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता

कु. मयुरी डगवार यांचे बोलणे ऐकून सौ. प्रियांकालाही कृतज्ञता वाटली. प्रियांकाने ‘गुरुदेव साधकांच्या माध्यमातून आपल्याकडे सतत किती लक्ष देत असतात !’, अशी कृतज्ञता व्यक्त केली.

३. ‘सनातनचे साधक सहजपणे इतरांशी जवळीक करतात किंवा इतरांचा विचार करतात, हे गुरुदेवांनी त्यांच्यावर केलेल्या साधनेच्या संस्कारांमुळेच शक्य आहे’, असे मला वाटले.’ 

– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३७ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१.२०२५)