सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती सतत कृतज्ञताभावात राहून सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणारे पू. अशोक पात्रीकर (वय ७४ वर्षे) !

१.२.२०२५ या दिवशी सनातनचे ४२ वे (समष्‍टी) संत पू. अशोक पात्रीकर यांचा ‘ऐंद्री शांती विधी’ होणार आहे. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या कुटुंबियांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पू. अशोक पात्रीकर

पू. अशोक पात्रीकर यांच्‍या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्‍कार !

१. सौ. शुभांगी पात्रीकर (पू. पात्रीकरकाकांच्‍या पत्नी) (वय ७१ वर्षे) 

सौ. शुभांगी पात्रीकर

१ अ. इतरांच्‍या आनंदात सहभागी होणे 

‘पू. अशोक पात्रीकर अमरावती सेवाकेंद्रात कधीतरी साधकांसाठी विशेष पदार्थ बनवायला सांगतात. प्रत्‍यक्षात् त्‍यांना असलेल्‍या पथ्‍यामुळे त्‍यांना ते पदार्थ कधीकधी खाताही येत नाहीत; पण ‘साधकांना त्‍यातून आनंद मिळेल’, या विचाराने ते बनवायला सांगतात. त्‍या पदार्थाची प्रसाद म्‍हणून थोडी चव घेतात. तेव्‍हा ‘इतरांच्‍या आनंदात आपल्‍याला सहभागी होता आले पाहिजे’, हे मला त्‍यांच्‍या (संतांच्‍या) या कृतीतून शिकायला मिळाले.

१ आ. अमरावती येथील घराच्‍या विक्रीच्‍या व्‍यवहारात ‘सनातनच्‍या संतांचे असामान्‍यत्‍व समाजातील व्‍यक्‍तींनाही कळते’, हे लक्षात येणे 

अमरावती येथील आमच्‍या घराच्‍या विक्रीच्‍या वेळी ज्‍या व्‍यावसायिकाने (बिल्‍डरने) आमचे घर विकत घेतले, तो आम्‍हाला म्‍हणाला, ‘‘मला तुमच्‍याकडे येण्‍याचा विचार देवानेच दिला. मला कळलेच नाही की, ‘मी तुमच्‍याकडे कसा आलो ?’ मी स्‍वतः व्‍यावसायिक (बिल्‍डर) असल्‍याने स्‍वतःचा लाभ प्रथम पहातो; परंतु तुमच्‍याशी व्‍यवहार करतांना ‘अल्‍प (कमी) किंमत देऊन तुमची जागा विकत घेऊया’, असे मला वाटले नाही. यात मला ‘माझा लाभ (फायदा) व्‍हायला हवा’, असेही वाटले नाही. ‘असे मला का वाटले ?’, हे मला कळले नाही; पण ‘तुम्‍ही सामान्‍य व्‍यक्‍ती नाही’, हे तुमच्‍याशी बोलतांना माझ्‍या लक्षात आले. तेव्‍हा ‘सनातनच्‍या संतांचे असामान्‍यत्‍व समाजातील व्‍यक्‍तींनाही कळते’, हे यातून माझ्‍या प्रकर्षाने लक्षात आले.’

२. श्री. निखिल पात्रीकर (पू. अशोक पात्रीकर यांचा मुलगा)

श्री. निखिल पात्रीकर

‘नोव्‍हेंबर २०२४ मध्‍ये मी आणि माझी पत्नी २५ दिवस अमरावती सेवाकेंद्रात वास्‍तव्‍यास होतो. त्‍या वेळी मला पू. बाबांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्‍यांची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

२ अ. काटकसरीपणा 

‘मी इयत्ता ७ वी मध्‍ये (वर्ष २००४) असतांना मला एक स्‍वेटर घेतला होता. तोे तोकडा (लहान) झाल्‍याने कालांतराने मी तो वापरणे बंद केले; परंतु पू. बाबा अजूनही तो स्‍वेटर हिवाळ्‍यात अधून-मधून वापरतात. अजूनही त्‍यांनी तो पुष्‍कळ व्‍यवस्‍थित ठेवला आहे. ‘प्रत्‍येक गोष्‍टीचा वापर आपण काटकसरीने कसा करायचा ?’, हे मला यातून शिकता आले.

२ आ. विनावापर असलेल्‍या दगडी पाटीचा वापर सेवेसाठी करणे 

लहान मुले वापरतात, तशी एक दगडी पाटी सेवाकेंद्रात विनावापर पडून होती. पू. बाबांनी ती त्‍यांच्‍या खोलीतील पटलावर ठेवली आहे. त्‍यावर प्रसारातील बैठका किंवा आढाव्‍यांचे नियोजन यांविषयीची सूत्रे लिहून ठेवलेली असतात. यामागे ‘पाटीवर मधूनमधून दृष्‍टी पडून त्‍यांची आठवण होईल’, हा उद्देश असतो. खरेतर, ही छोटीशी गोष्‍ट आहे; पण ‘पाटीचा असाही उपयोग करू शकतो’, असा विचार आपण कधी करणार नाही. असे केवळ संतच करू शकतात’, हे माझ्‍या लक्षात आले.

२ इ. साधकांना आध्‍यात्‍मिक स्‍तरावर हाताळणे 

पू. बाबा साधकांना मानसिक स्‍तरावर न हाताळता नेहमीच आध्‍यात्‍मिक स्‍तरावर हाताळतात. ते प्रत्‍येक साधकाच्‍या प्रकृतीला समजून घेऊन त्‍याला साधनेची योग्‍य दिशा देतात. त्‍यामागे ‘त्‍याचे साधनेतील प्रयत्न कसे वाढतील ?’, हाच त्‍यांचा विचार असतो.

२ ई. साधकांना प्रोत्‍साहन देणे 

पू. बाबा विदर्भातील विविध जिल्‍ह्यांतील साधकांच्‍या घरी संपर्क करून साधकांना सेवा आणि व्‍यष्‍टी साधना यांत येणार्‍या अडचणी जाणून घेतात अन् त्‍यांना प्रोत्‍साहन देऊन प्रयत्नांची गती वाढवण्‍यास साहाय्‍य करतात. ते चांगले प्रयत्न करणार्‍या साधकांना खाऊ देतात.

२ उ. प.पू. डॉक्‍टरांप्रती (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती) सतत कृतज्ञताभावात असणे 

पू. बाबा त्‍यांच्‍या संभाषणात अथवा मार्गदर्शनात अनेकदा ‘प.पू. डॉक्‍टर साधकांसाठी किती करतात ! ते साधकांची किती काळजी घेतात ! सर्वांनी याची जाणीव ठेवून अखंड कृतज्ञताभावात राहून साधनेचे प्रयत्न करायला हवेत’, असे सांगतात. ते सांगतांना त्‍यांचा प.पू. डॉक्‍टरांप्रती असलेला भाव जाणवतो.’

३. सौ. नमिता निखिल पात्रीकर (पू. पात्रीकरकाका यांची सून)

सौ. नमिता पात्रीकर

३ अ. मनावरील नियंत्रण आणि संयम 

‘पू. पात्रीकरकाकांचे (पू. बाबांचे) जेवण म्‍हणजे १ पोळी, विनातिखटाची थोडी भाजी, वरण आणि थोडासा भात एवढेच आहे. गेल्‍या अनेक वर्षांपासून त्‍यांनी या प्रमाणाव्‍यतिरिक्‍त कधी अधिक अन्‍न खाल्ले नाही. कितीही आवडता पदार्थ असला, तरी त्‍यांचे जेवणाचे प्रमाण मात्र कधीच पालटत नाही. यातून ‘संतांचा संयम किती असू शकतो ?’, हे लक्षात येते.

३ आ. चैतन्‍य वाढल्‍याचे जाणवणे 

अमरावती सेवाकेेंद्रातील पू. बाबांच्‍या निवासाच्‍या खोलीतील चैतन्‍य पूर्वीच्‍या तुलनेत अधिक प्रमाणात असल्‍याचे जा  पू. बाबा गोवा येथील घरी आले की, त्‍यांच्‍या अस्‍तित्‍वाने घरातील वातावरण चैतन्‍यमय होते.

३ इ. समष्‍टी सेवेची तळमळ

पू. बाबा पहाटे लवकर उठून दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतात. त्‍यानंतर वैयक्‍तिक आवरून लगेच त्‍यांचे सेवांचे आढावे, समन्‍वय, प्रसाराचे नियोजन या सेवा चालू असतात. अनेकदा अल्‍पाहार आणि महाप्रसाद यांची वेळ उलटून गेली, तरी सेवा पूर्ण करूनच ते अल्‍पाहार आणि महाप्रसाद घेतात. ‘ते नेहमी स्‍वतःपेक्षा ‘साधकांचा अमूल्‍य वेळ वाया जाऊ नये’, असा समष्‍टीचा विचार करतात’, हे मला शिकायला मिळाले.

४. सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (पू. पात्रीकरकाकांची मोठी मुलगी, आध्‍यात्मिक पातळी ६० टक्‍के) आणि सौ. अनघा जोशी (पू. पात्रीकरकाकांची धाकटी मुलगी, आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के) 

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

४ अ. सहजता 

‘पू. बाबांशी आम्‍ही किंवा कोणीही साधक अगदी मनमोकळेपणानेे बोलू शकतो. एखादा प्रसंग असो अथवा काही अडचणी असोत, त्‍यांना सांगितल्‍यावर मनावरील अर्धा भार हलका होतो. त्‍यांनी केलेल्‍या मार्गदर्शनामुळे नकारात्‍मक स्‍थितीतून लवकर बाहेर पडण्‍यास साहाय्‍य होते.

सौ. अनघा जोशी

४ आ. प.पू. डॉक्‍टरांवरील दृढ श्रद्धा 

माझा भाऊ निखिल, मी आणि माझी लहान बहीण (सौ. अनघा) आम्‍हा तिघांचे शिक्षण चालू असतांना पू. बाबांनी पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी सरकारी कार्यालयातून स्‍वेच्‍छा निवृत्तीचा निर्णय घेतला. त्‍या वेळी निखिल इयत्ता चौथीमध्‍ये होता. माझे आणि बहिणीचे महाविद्यालयीन शिक्षण चालू होते. तिघांचेही पुढचे शिक्षण बाकी होते. ‘आर्थिक परिस्‍थितीसुद्धा पुष्‍कळ चांगली होती’, असे नव्‍हते. असे असूनसुद्धा केवळ प.पू. डॉक्‍टरांवरील दृढ श्रद्धेच्‍या बळावर त्‍यांनी हा निर्णय घेतला होता. ‘देव सर्वांची काळजी घेईल’, या विचारामुळे त्‍यांनी कोणताही भावनिक विचार केला नाही आणि प्रत्‍यक्षातही देवाच्‍या कृपेने आम्‍हाला कधीही कोणतीच गोष्‍ट न्‍यून पडली नाही.’

५. श्री. शशांक जोशी (पू. पात्रीकरकाका यांचे जावई) 

श्री. शशांक जोशी

५ अ. तळमळीने साधना करून पू. पात्रीकरकाका संतपदी आरूढ झालेे ।

‘पू. पात्रीकरकाकांनी कुटुंबियांची काळजी गुरुचरणांवर वाहिली ।
प्रसार सेवेला जाण्‍याची त्‍यांना काळजी नाही वाटली ॥ १ ॥

गुरुचरणांवर श्रद्धा ठेवून केल्‍या विविध समष्‍टी सेवा ।
गुरूंनी अल्‍पावधीत दिला आध्‍यात्‍मिक उन्‍नतीचा मेवा ॥ २ ॥

गुर्वाज्ञेनुसार भाव आणि प्रेमभाव वाढवलेे ।
तळमळीने साधना करून संतपदी आरूढ झालेे ॥ ३ ॥

अनंत कोटी कृतज्ञता देवा तुझिया चरणी ।
पूज्‍य पात्रीकर काकांच्‍या सत्‍संगाची दिलीस आम्‍हा अनमोल संधी ॥ ४ ॥

शिकून पूज्‍य काकांचे गुण, आम्‍ही आपल्‍या चरणी यावे ।
आपण दिलेल्‍या संधीचे, सार्थक ते व्‍हावे ॥ ५ ॥

सर्व सूत्रांचा दिनांक (२४.१.२०२५)