कालच मकरसंक्रांत झाली. या निमित्ताने अनेक शहरांत पतंग उडवण्याची प्रथा आहे. ‘संक्रांत म्हणजे जणू पतंगोत्सव’, असे समीकरण झाले आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात ईस्ट इंडिया आस्थापनेने ‘मुद्रा कॉड्स’ या नावाने भारतात धागा निर्मितीचा व्यवसाय चालू केला. तेव्हापासून सुती धाग्यांचा वापर करून पतंग उडवण्याचा अलिखित खेळ चालू झाला. कालांतराने स्पर्धेचे युग आले आणि पतंग उडवता उडवता पतंग कापण्याची स्पर्धा चालू झाली. सुती धाग्याला सुती धाग्याने कापणे शक्य नसल्याने काच, धातू, रसायनमिश्रित नायलॉन धागा वापरण्यात येऊ लागला; मात्र हा धागा पतंग कापता कापता माणसांचे गळेही कापू लागला. कागद, बांबूची कामठी आणि सुती धागा यांपासून बनवलेल्या पारंपरिक पतंगाची जागा आता आता प्लास्टिक कागद, प्लास्टिक काड्या अन् नायलॉन धागा यांनी घेतली आहे. नायलॉन धागा हा धारदार शस्त्राप्रमाणे सिद्ध केला जातो. आज भारतभरात अनेक शहरांत नायलॉन धाग्यामुळे मनुष्य, प्राणी, पक्षी हे गंभीर घायाळ झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अनेक जणांचे मृत्यूही झाले आहेत. असे असतांनाही उत्पादकांकडून विक्रेत्यांना परदेशात जाण्याचे आमीष दाखवून नायलॉन धाग्यांची विक्री करण्यात येत आहे. एकीकडे लोकांचे गळे कापले जात आहेत आणि दुसरीकडे परदेशात जाण्याचे आमीष दाखवून या धाग्यांची विक्री वाढवली जात आहे, याला काय म्हणावे ?
खरेतर वर्ष २०१७ मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने नायलॉन, सिंथेटिक आणि चिनी धाग्यावर बंदी घातलेली होती. सुती धागा सहज तुटतो; पण नायलॉन धागा सहज तुटत नाही. छत्रपती संभाजीनगर येथे अल्पवयीन मुलांनी हा धागा वापरल्यास त्यांच्या पालकांवर कलम १० नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात येत असून भारतीय दंड संहितेनुसार ३ वर्षांचा कारावास आणि आर्थिक दंड असे शिक्षेचे प्रावधान (तरतूद) आहे. नागपूर पोलिसांनी १८ लाख रुपयांचा नायलॉन धागा कह्यात घेऊन त्यावर बुलडोझर फिरवले. बुलडोझरद्वारे पोलीस एकवेळा धागा नष्ट करतील; मात्र पुन्हा तो धागा निर्माण करणार्या उत्पादकांचे काय ? नाशिकमध्ये पोलिसांनी ७ पालकांनाही या प्रकरणी कह्यात घेतले. उपरोक्त घटनांवर पालिका प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून नायलॉन धागा वापरणारे, विक्रेते यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. सामाजिक संघटनांकडून नायलॉन धागा न वापरण्याविषयी जनजागृती केली जात आहे. अनेक ठिकाणी दुचाकी वाहनांना धागाविरोधी तार लावली जात आहे. एका दृष्टीने ते अभिनंदनीयही आहे; मात्र हा वरवरचा उपाय झाला. त्यापेक्षा नायलॉन धागा न वापरण्याविषयी मुलांचे प्रबोधन करण्याची आणि तो घेऊ न देण्याची पालकांची मानसिकता सिद्ध करण्याची आवश्यकता आहे !
– श्री. नीलेश पाटील, जळगाव