चंद्र अथवा मंगळ यांसारख्या ग्रहांवर मानवाच्या वस्तीसाठी आवश्यक संशोधन !
नवी देहली – भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच ‘इस्रो’ने ३० डिसेंबरला श्रीहरिकोटा येथून ‘स्पेड एक्स’ (अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम) चालू केली. यात ‘सी.एस्.एल्.व्ही.-सी ६०’ रॉकेटच्या साहाय्याने पृथ्वीपासून ४७० कि.मी. वर अंतराळात २ यान जोडले जाणार आहेत. ७ जानेवारीला हे यान जोडले जातील. तत्पूर्वी या मोहिमेच्या अंतर्गत अंतराळात प्रथमच जीव अंकुरण्यात यश प्राप्त झाले आहे. ‘पोयम-४’वर (‘पी.एस्.एल्.व्ही. ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल’वर) पाठवलेल्या ‘क्रॉप्स’ (कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्यूल फॉर ऑर्बिटल प्लांट स्टडीज) या यंत्राद्वारे हा प्रयोग यशस्वी झाला. हा प्रयोग अंतराळात अन्न वाढवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे.
१. ‘क्रॉप्स’ला विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये बनवण्यात आले. यामध्ये चवळीच्या बिया केवळ ४ दिवसांत अंकुरित करण्यात आल्या.
२. चवळी लवकर उगवत असल्याने प्रयोगासाठी तिचे बियाणे निवडण्यात आले. हे संशोधन भविष्यात चंद्र, मंगळ किंवा इतर ग्रह यांवर मानवी वास्तव्य टिकवून ठेवण्यास साहाय्य करेल.
आता पालकावरही होणार प्रयोग !
चवळी उगवण्यात यश मिळाल्यामुळे पालकावरही संशोधन चालू आहे. त्यातही यश येईल, अशी आशा शास्त्रज्ञांना आहे. पालकाच्या पेशींवर एकाच वेळी अवकाशात आणि पृथ्वीवर प्रयोग केले जातील. पालकांच्या पेशींना सूर्यप्रकाश आणि पोषक तत्त्वे ‘एल्.ई.डी. लाईट्स’च्या माध्यमातून पुरवली जातील. वनस्पती पेशींचा रंग आणि वाढ यांचे चित्रीकरण केले जाईल. जर पेशींचा रंग पालटला, तर प्रयोग अयशस्वी असल्याचे मानण्यात येईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अवकाशात आणि पृथ्वीवरील कृषी तंत्रात सुधारणा होण्यास साहाय्य होऊ शकते. यामुळे मंगळ मोहिमेसारख्या लांब अंतराळ प्रवासाच्या वेळी वनस्पती वाढवण्याच्या शक्यतेला आणखी बळकटी मिळेल.