‘ठेव तो मोबाईल (भ्रमणभाष) आणि अभ्यासाकडे लक्ष दे !’, हा संवाद सध्या घराघरांतून ऐकू येतो. अनेक पालकांच्या तोंडी हा संवाद असतोच. लहान मुलांना भ्रमणभाषमधील सर्वच गोष्टी बर्यापैकी ठाऊक असतात आणि त्यातून ही मुले त्याच्या आहारी जातात. भ्रमणभाषचा वापर अधिक प्रमाणात होत असल्याने लहान वयातील मुलांमध्ये लघुदृष्टीदोष (मायोपिया) निर्माण झाला आहे, असे आधुनिक वैद्यांनी नुकतेच उघड केले आहे. ‘मायोपिया’, म्हणजे स्पष्ट दिसत नसल्याने मुलांना चष्मा लावावा लागतो. ‘भ्रमणभाषच्या वापराला वेळीच पायबंद न घातल्यास येत्या १० वर्षांत हेे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढू शकते’, अशी भीती नेत्ररोगतज्ञांनी व्यक्त केली आहे. हे वृत्त पुष्कळ धक्कादायक आहे. अधिक प्रमाणात ‘रिल्स’ किंवा ‘व्हिडिओ’ वा ‘कार्टून’ पहाणे यांतच मुलांचा वेळ जात असल्याने त्यांचे अभ्यासाकडे लक्ष अल्प झालेले आहे. मुलांना पाढे अल्प आणि सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध झालेली गाणीच अधिक पाठ असतात. मुले जेवत नसली की, दिला त्यांना भ्रमणभाष ! मुले ऐकत नसली की, लावून दिला त्यांना भ्रमणभाषवर एखादा व्हिडिओ ! असेच चित्र न्यूनाधिक प्रमाणात सर्वत्र आढळून येते. ‘जेवतांना काही पाहू किंवा वाचू नये, शांत चित्ताने जेवावे’, असे पूर्वीच्या काळी आपल्याला सांगण्यात येत असे; पण सध्या परिस्थिती उलट आहे. लहान मुलांच्या समोर भ्रमणभाष ठेवला की, त्यातच ती गुंग होतात. त्यामुळे खाल्लेले अंगाला किती लागते ?, हा प्रश्नच आहे. या अतिरेकाची परिणती शारीरिक त्रासांत होते. दृष्टीदोष, स्थूलपणा, न सुचणे असे त्रास वाढतात. पूर्वीच्या काळी ७० ते ८० वयापर्यंतच्या वृद्धांना चष्माच नसे. त्यामुळे कितीही दूरवरचे त्यांना अगदी स्पष्टपणे दिसत असे. त्यांची दृष्टी तीक्ष्ण होती; पण आता मुले ४-५ वर्षांची झाली की, त्यांच्या डोळ्यांवर चष्मा हा येतोच. शाळेमध्ये फळ्यावर लिहिलेले न दिसणे, डोळ्यांतून पाणी येणे, सतत डोळे चोळणे असे प्रकार होत रहातात. हे वेळीच न रोखल्यास डोळ्यांच्या पडद्याला इजा पोचून कायमचे अंधत्व येऊन मोठे नेत्रविकार होण्याची शक्यता बळावते. याचे भान आजच्या पालकांनी ठेवायला हवे !
देशाची भावी पिढी अल्प दृष्टीची किंवा आताच अंधतेकडे वाटचाल करू लागली, तर भारताचे भवितव्य अंधःकारमय होईल. हे टाळायला हवे. लहान मुलांची दृष्टी निरोगी रहाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. डोळ्यांच्या संदर्भातील भविष्यातील धोके लक्षात घेऊन पालकांनी सतर्क रहावे. भ्रमणभाष किंवा दूरचित्रवाणी पहाण्याची वेळ मुलांना नेमून द्यायला हवी आणि त्याच वेळी मुलांच्या हाती भ्रमणभाष द्यावा. मुलांवर सुसंस्कार केल्यास, त्यांना वेळ दिल्यास ती भ्रमणभाषच्या आहारी जाणार नाहीत.
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.