धर्माचरणासह साधना करणार्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांना ईश्‍वराचे आशीर्वाद मिळतील ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

‘श्रीराम स्‍वाभिमान परिषदे’च्‍या वतीने कोलकाता (बंगाल) येथे ‘हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’

कोलकाता – हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्त्‍यांनी अराजकीय स्‍तरावर कार्य करण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍यासाठी आपल्‍याला धर्मशिक्षण घेतले पाहिजे. धर्माचरणासह साधना केल्‍याने आपल्‍याला या कार्यात ईश्‍वराचे आशीर्वाद मिळतील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्‍य समन्‍वयक श्री. शंभू गवारे यांनी केले. येथील एन्‍टाली भागात ‘श्रीराम स्‍वाभिमान परिषदे’च्‍या वतीने ‘हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’चे आयोजन करण्‍यात आले होते. यात ते बोलत होते. या अधिवेशनामध्‍ये बंगालच्‍या विविध जिल्‍ह्यांतील २५ हून अधिक हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार, संपादक आणि धर्मप्रेमी यांसह १५० हून अधिक जण उपस्‍थित होते.

या वेळी ‘भारतीय साधक समाजा’चे संस्‍थापक सचिव आणि ‘हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समिती, बंगाल’चे संयोजक श्री. अनिर्बान नियोगी यांनी हिंंदूंनी संघटित होऊन कार्य करण्‍याची आवश्‍यकता विषद केली. ‘श्रीराम स्‍वाभिमान परिषदे’चे  संस्‍थापक श्री. सूरज सिंह आणि श्री. अवनिश जायसवाल यांनी या अधिवेशनाचे आयोजन केले होते. गोवा येथे होणारे वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशन आणि रांची येथे पार पडलेले विभागीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन यांतून प्रेरणा घेऊन ‘श्रीराम स्‍वाभिमान परिषदे’ने या अधिवेशनाचे आयोजन केले होते. या अधिवेशनाचे सूत्रसंचालन श्री. सूरज सिंह यांनी केले.

क्षणचित्रे

१. ‘श्रीराम स्‍वाभिमान परिषदे’चे श्री. अवनिश जायसवाल यांनी अधिवेशनासाठी हिंदु जनजागृती समितीने पाठवलेले शुभेच्‍छापत्र वाचून दाखवले.

२. राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍या कार्यामध्‍ये योगदान देणार्‍या काही योद़्‍ध्‍यांना ‘धर्मवीर’ पुरस्‍कार देऊन सन्‍मानित करण्‍यात आले.