(‘कॅशलेस’ म्हणजे रोख पैसे देऊन तिकीटन घेता कार्ड वापरणे)
पणजी, ५ डिसेंबर (वार्ता.) – पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड आणि कदंब वाहतूक महामंडळ यांनी शहरातील विजेवरील काही बससेवा कॅशलेस (रोख रकमेविना) करण्याचा निर्णय घेतला होता; परंतु ‘स्मार्ट ट्रान्झिट कार्ड’साठी ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय सध्या पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली आहे. विजेवर चालणार्या सर्व बसगाड्यांमध्ये ‘कॅशलेस’ सेवा देणार, असे प्रारंभी महामंडळाने घोषित केले होते. त्यानुसार ‘स्मार्ट ट्रान्झिट कार्ड’ किंवा ‘युपीआय’ प्रणाली (भ्रमणभाषवरील ॲपद्वारे देयक देणे) वापरून तिकीट काढण्याची सोयही करण्यात आली होती; परंतु ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, असे महामंडळाचे म्हणणे आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘टुमोक’ या भ्रमणभाषवरील ॲपद्वारे प्रवाशांना बसचे रिअल टाईम ट्रॅकींग (व्यक्ती, वाहन किंवा वस्तू यांचे नेमके ठिकाण दाखवणारी यंत्रणा), कॉन्टॅक्टलेस पेमेंट (अप्रत्यक्ष आर्थिक व्यवहार), क्यू आर् कोडवर आधारित तिकीट आरक्षण यांसारख्या सेवा उपलब्ध होणार आहेत.