मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्रकार परिषदेत आश्वासन
मुंबई – आमचे सरकार लोकाभिमुख असेल. अडचणींवर मात करून मार्गक्रमण करू. राज्यात बदल्याचे राजकारण दिसणार नाही, तर पालट घडवणारे राजकारण असेल. हे सरकार पारदर्शकपणे आणि गतीशीलतेने जनतेच्या कल्याणासाठी काम करेल, असा विश्वास महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रालयातील पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘मंत्रीमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी करू’, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले…
१. पायाभूत, सामाजिक, उद्योग क्षेत्र अशा प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी राहील. राज्यात जलसंपदामधील नवीन प्रकल्प, सौरऊर्जेचे प्रकल्प, लाडकी बहीण योजना, महिलांविषयीच्या विविध योजना आदी निर्णय पुढे चालू ठेवणार आहोत. वचननाम्यात जी आश्वासने आम्ही दिली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी पावले उचलणार आहोत. राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा कडकपणे लागू करू !
२. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही चालूच ठेवणार आहोत.’ या योजनेचा निधी २ सहस्र १०० रुपये देणार आहोत; मात्र त्यासाठी आवश्यक आर्थिक व्यवस्था करूनच या योजनेचा वाढीव निधी दिला जाईल.
३. राज्यातील बिघडलेले राजकीय वातावरण योग्य कसे करता येईल, याचा प्रयत्न केला पाहिजे. मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे आदींना दूरभाष करून निमंत्रण देण्यात आले होते. त्यांनी मला शुभेच्छाही दिल्या; परंतु त्यांना काही कारणामुळे येता आले नाही. अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात शत्रुत्व नाही. महाराष्ट्रात राजकीय संवाद संपलेला नाही.