Maharashtra New CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री !

५ डिसेंबरला होणार शपथविधी !

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – विधानसभेत महायुतीला बहुमत प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण ? या प्रश्‍नाला पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्‍चित झाले असून ५ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आझाद मैदानात सायंकाळी ५ वाजता होणार्‍या भव्य सोहळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या वेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ देतील.

महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मान्यवरांना पाठवण्यात आले आहे. साधू-संतांच्या वंदनीय उपस्थितीमध्ये हा भव्य सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या पदांसह अन्य काही मंत्र्यांचा शपथविधीही या वेळी होण्याची शक्यता आहे.

महायुतीकडून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा दावा !

महाराष्ट्रात महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. ४ डिसेंबर या दिवशी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या नेत्यांनी आमदारांच्या समर्थनाचे पत्र राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर राज्यपालांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीला निमंत्रित केले आहे. ५ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता राज्यपालांनी महायुतीला शपथविधीची वेळ दिली आहे.

‘मुख्यमंत्रीपद’ ही तांत्रिक गोष्ट; पण सरकार एकत्रित चालवू ! – देवेंद्र फडणवीस, भावी मुख्यमंत्री, महाराष्ट्र

‘मुख्यमंत्री’ किंवा ‘उपमुख्यमंत्री’ ही पदे आमच्यासाठी तांत्रिक आहेत. राज्याच्या प्रगतीसाठी महायुती एकत्रित निर्णय घेऊन सरकार चालवेल, असे वक्तव्य महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केले. या वेळी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांसह अन्य नेते उपस्थित होते.
पत्रकार परिषदेमध्ये या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांनी मला मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याच्या समर्थनार्थ राज्यपालांना पत्र सुपुर्द केले आहे. महायुती ही महाराष्ट्राला चांगले सरकार देईल. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.’’

राज्याच्या प्रगतीसाठी सांघिकपणे काम करू ! – एकनाथ शिंदे, अध्यक्ष, शिवसेना

शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे

अडीच वर्षांपूर्वी ‘मी मुख्यमंत्री व्हावे’, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शिफारस केली होती. या वेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी मी शिफारस करत आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सत्ता स्थापन होत आहे. राज्याच्या प्रगतीसाठी सांघिकपणे काम करू.

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रयत्न करू ! – अजित पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार

राज्य चालवण्याचा आम्हाला अनुभव आहे. या अनुभवाचा लाभ समाजाला कसा करून देता येईल, यासाठी आमचा प्रयत्न असेल. विकासामध्ये महाराष्ट्र देशात पुढे आहे. राज्याची आणखी प्रगती व्हावी, यासाठी आमचा प्रयत्न असेल.

शिवसेना सरकारमध्ये येणार कि बाहेरून पाठिंबा देणार ? अद्यापही संभ्रम !

३ डिसेंबर या दिवशी शिवसेनेने मंत्रीमंडळात सहभागी व्हावे, यासाठी मी एकनाथ शिंदे यांना भेटलो. ते सरकारमध्ये सहभागी होतील, अशी आम्हाला आशा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. याविषयी एकनाथ शिंदे यांनी ‘सरकारमध्ये सहभागी होणार कि नाही ? याविषयी सांगू’, असे म्हटले.

भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड !

मुंबई – महाराष्ट्राच्या विधीमंडळातील भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची भाजपकडून एकमताने निवड करण्यात आली. ४ डिसेंबर या दिवशी विधीमंडळात हा कार्यक्रम पार पडला. ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो, त्या पक्षाच्या विधीमंडळ गटनेत्याकडेच मुख्यमंत्रीपद असते.

भाजपच्या विधीमंडळ गटनेत्याच्या निवडीच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी ‘देवेंद्र फडणवीस’ यांच्या नावाचा प्रस्ताव विधीमंडळ गटनेतेपदासाठी मांडला. त्याला पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर यांनी अनुमोदन दिले. या वेळी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रूपानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ गटनेतेपदी नियुक्ती झाल्याची घोषणा केली. त्यानंतर सभागृहात देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. या वेळी मनोगत व्यक्त करातांना ‘या निवडणुकीत ‘एक है, तो सेफ है’ आणि ‘मोदी है तो मुमकिन है’ या विजयाच्या घोषणा होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुतीने विजय प्राप्त केला’, असे फडणवीस म्हणाले.