वाळपई, ४ डिसेंबर (वार्ता.) – बजरंग दलाच्या सत्तरी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी वाळपई पोलिसांच्या सहकार्याने ३ डिसेंबरच्या रात्री गोव्यातून कर्नाटकमध्ये होणारी बैलाची अवैध वाहतूक रोखली आहे. वाळपई पोलिसांनी या प्रकरणी वाहनाचा चालकाच्या विरोधात अवैधपणे गोवंशियाची वाहतूक करणे, प्राण्यावर अत्याचार करणे आदी कारणांसाठी गुन्हा नोंद केला आहे. त्याचप्रमाणे नियमबाह्यरित्या वाहनातून गोवंशियाची वाहतूक केल्याच्या प्रकरणी वाहनाची अनुज्ञप्ती रहित करण्यासाठी परिवहन खात्याला कळवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
चोर्ला घाटातील पळवाटा मद्य आणि गोतस्कर यांना माहिती असतांना पोलीस या वाटा बंद का करत नाहीत ?
उपरोल्लेखित घटनेवरून बजरंग दलाचे पदाधिकारी म्हणाले, ‘‘चोर्ला घाटातील पळवाटा मद्य आणि गोतस्कर यांना ठाऊक असतांना पोलीस या वाटा बंद का करत नाहीत ? किंवा या भागात पोलिसांची नेमणूक का करत नाहीत ?’’ याविषयी माहिती देतांना वाळपई पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले, ‘‘या घटनेनंतर या मार्गावर पोलीस नेमण्यात आले आहेत.’’