मुंबईत भाजपची सत्ता असल्याने मारवाडीतच बोला ! – दुकानदाराची धमकी

मराठी महिलेला दमदाटी करणार्‍या दुकानदाराला मनसेने चोपले !

तक्रारकर्ती महिला, मारवाडी व्यक्ती आणि आमदार मंगल प्रभात लोढा

मुंबई – मुंबईत भाजपची सत्ता आल्याने यापुढे मारवाडी भाषेतच बोलायचे, अशी दमदाटी गिरगावमधील खेतवाडी येथील एका मारवाडी व्यापाराने मराठीत संवाद साधणार्‍या महिला ग्राहकाला केली. यामुळे संतप्त महिलेने मनसेच्या पदाधिकार्‍यांना याविषयी कळवले. त्यांनी दुकानदाराला चोप दिल्यानंतर त्याने क्षमा मागितली.  (सार्वजनिक स्तरावर मराठीची गळचेपी होण्याला मराठीभाषिकांना मराठीचा अभिमान नसणेच कारणीभूत आहे ! – संपादक) ‘मुंबई भाजपची, मुंबई मारवाड्यांची’, असेही तो व्यापारी म्हणाले.

मराठी भाषेचा अवमान कदापी सहन करणार नाही ! – आमदार मंगल प्रभात लोढा

मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे, आपली अस्मिता आहे. त्यामुळे येथे मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला, अशी सक्ती कुणी करत असेल, तर ते चुकीचे आहे. मराठी भाषेचा अवमान कदापी सहन करणार नाही. भाजपचे नाव घेऊन असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबई सर्वांची आहे; परंतु ती सर्वांत आधी मराठी माणसाची आहे. त्यामुळे ‘असा भाषिक द्वेष पसरवणार्‍या व्यक्तीवर कारवाई व्हावी’, अशी आमची इच्छा आहे, असे मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.