ढगाळ हवामानाचा कांद्याला फटका !
लासलगाव – थंडीची तीव्रता अल्प झाल्यामुळे येथे ढगाळ आणि दमट वातावरण निर्माण झाले आहे. कांदा, तसेच रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे या पिकांवर औषध फवारणी करावी लागत आहे. त्यातून उत्पादन खर्च वाढत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
दोन तोतया महापालिका अधिकार्यांना अटक !
मुंबई – कारवाईच्या नावाखाली दुकानदारांकडून पैसे उकळणार्या २ तोतया महापालिका अधिकार्यांना मुलुंड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून महापालिकेची बनावट ओळखपत्रे जप्त केली आहेत. हनीफ सय्यद आणि विजय गायकवाड अशी त्यांची नावे आहेत.
संपादकीय भूमिका : अशांना कठोर शिक्षाच करायला हवी !
पनवेल आणि उरण येथे गुटखा विक्री !
रायगड – पनवेल आणि उरण परिसरांत उघडपणे गुटख्याची विक्री करण्यात येते; पण अन्न-औषध प्रशासन त्याविरोधात कारवाई करत नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. पोलिसांना याविषयी विचारल्यास ते म्हणतात, ‘‘गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करणे आमचे काम नाही. ते अन्न-औषध प्रशासनाने पहावे.’’ (दायित्व झटकणारे कायद्याचे रक्षक काय कामाचे ? गुटखाबंदीची ऐशीतैशी ! – संपादक)
नागपूर येथे भूकंपाचे धक्के !
नागपूर – नागपूरसह पूर्व विदर्भातील काही ठिकाणी ४ डिसेंबर या दिवशी सकाळी ७.३० ते ७.३५ या वेळेत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तेलंगणा येथील मुलुगू या जिल्ह्यात ५.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली. हे ठिकाण नागपूरपासून सुमारे ४२५ किलोमीटर अंतरावर आहे. विदर्भात कुठेही वित्त अथवा जीवितहानी झालेली नाही.
पोषण आहारात बुरशी आणि अळ्या !
पालघर – पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देण्यात येणार्या पोषण आहारामध्ये बुरशी आणि अळ्या आढळून आल्या आहेत. येथील शाळांमध्ये २ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या प्रकरणी संतप्त पालकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात आला.
संपादकीय भूमिका : विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणार्या संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी !