जत येथे भाजपचे आमदार पडळकर यांच्या सूचनेनंतर शेतकर्‍यांना त्वरित बसवून दिले जात आहेत ट्रान्सफॉर्मर !

आमदार श्री. गोपीचंद पडळकर

जत (जिल्हा सांगली), ४ डिसेंबर (वार्ता.) – तालुक्यातील येळवी खरात वस्ती येथील ट्रान्सफॉर्मर १ डिसेंबर या दिवशी दुपारी जळला होता. याविषयी शेतकर्‍यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना संदेश पाठवून ही माहिती दिली. आमदार पडळकर यांनी त्वरित ‘महावितरण’ कार्यालयाला सूचना केल्यानंतर २ डिसेंबर या दिवशी दुपारी ट्रान्सफॉर्मर बसवून देण्यात आला. याविषयी शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. यापूर्वी शेतकर्‍यांनी बर्‍याच वेळा मागणी केल्यानंतरही महावितरण कार्यालयाकडून अशी कृती केली जात नव्हती.

यापूर्वी असाच प्रत्यय बनाळी येथील कोळी वस्ती, जाडरबोबलाद येथील डेपोटी सरपंच वस्ती, येळवी येथील रुपनुर वस्ती, रेवनाळ, उटगी, अंतराळ (बुरूटे वस्ती) या परिसरातील शेतकर्‍यांना आला. आमदार पडळकर यांच्या आदेशाने वेळेत ट्रान्सफॉर्मर बसवून मिळत आहेत. गत आठवड्यात प्रतापूर येथील कमते, कोपनूर वस्तीवरील नवीन ट्रान्स्फॉर्मर पडळकर यांच्या पाठपुराव्याने बसवण्यात आले आहेत.

संपादकीय भूमिका 

  • शेतकर्‍यांच्या मागणीला केराची टोपली दाखवणारे कर्तव्यचुकार अधिकारी काय कामाचे ?
  • आमदारांनी संदेश किंवा सूचना केल्यानंतर नव्हे, तर शेतकर्‍यांनी मागणी केल्यानंतर ‘महावितरण’ कार्यालयातील अधिकार्‍यांनी त्वरित ट्रान्सफॉर्मर बसवून देणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई केली पाहिजे.