स्थानिक राजकारणामुळे आक्रमण झाल्याचा संशय
पेडणे, ४ डिसेंबर (वार्ता.) – ‘तुला मायकल हवा’, असे म्हणत ५ अज्ञातांनी मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर ४ डिसेंबर या दिवशी सकाळी जीवघेणे आक्रमण केले. आस्कावाडा, मांद्रे येथील मठाजवळ ही थरारक घटना घडली. घटनेनंतर महेश कोनाडकर यांना तातडीने उपचारार्थ प्रारंभी तुये येथील रुग्णालयात आणि प्राथमिक उपचारानंतर म्हापसा जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मांद्रे पोलीस या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत. स्थानिक राजकारणामुळे हे जीवघेणे आक्रमण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महेश कोनाडकर ४ डिसेंबर या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेले होते. त्यानंतर घरी परतत असतांना अचानक एक चारचाकी वाहन त्यांच्या वाहनासमोर येऊन थांबले. या वेळी तोंडावर मास्क (मुखपट्टी) लावलेले ५ जण वाहनातून उतरले आणि त्यांनी महेश कोनाडकर यांना लोखंडी सळीने मारहाण केली. कोनाडकर यांनी आरडाओरड करताच हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर स्थानिकांनी तातडीने कोनाडकर यांना रुग्णालयात भरती केले. या घटनेनंतर मांद्रे पंचायत मंडळाने २४ घंट्यांच्या आत आक्रमण करणार्यांना कह्यात घेण्याची, तर कळगुंटचे भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्याची मागणी केली आहे. आमदार मायकल लोबो हे पुढील विधानसभा निवडणूक मांद्रे मतदारसंघातून लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा गेले काही दिवस राजकीय गोटात चालू आहे. याच काळात मांद्रे येथील प्रसिद्ध सप्ताहाला आमदार मायकल लोबो आलेले असतांना त्यांच्यासमवेत माजी सरपंच महेश कोनाडकर हेही उपस्थित होते. या प्रसंगानंतर महेश कोनाडकर यांच्यावर हे जीवघेणे आक्रमण झालेले आहे. या घटनेनंतर राजकीय स्तरावर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
आमदार मायकल लोबो म्हणाले,‘‘महेश कोनाडकर यांच्यावर आक्रमण करण्याची सुपारी कुणी दिली हे शोधण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांद्रे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांचे स्थानांतर (बदली) करणार असल्याची हमी मला दिली आहे; मात्र एवढ्याने काम होणार नाही, तर हे एक जीवघेणे आक्रमण आहे.’’ भाजपचे माजी आमदार दयानंद सोपटे यांनी या आक्रमणामागे मांद्रेचे मगो पक्षाचे विद्यमान आमदार जीत आरोलकर यांचा हात असल्याचा आरोप केला. आमदार जीत आरोलकर यांनीही महेश कोनाडकर यांच्यावरील आक्रमणाचा निषेध केला आहे. आमदार जीत आरोलकर म्हणाले, ‘‘अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटना मी माझ्या मतदारसंघात खपवून घेणार नाही. काही जण उगाचच माझा या घटनेशी राजकीय संबंध लावू पहात आहेत. कोनाडकर यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. हल्लेखोरांना जोपर्यंत पकडले जात नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही.’’ याविषयी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र प्रभुदेसाई आणि अधिवक्ता अमित सावंत म्हणाले, ‘‘आक्रमणामागील सूत्रधाराला २४ घंट्यांच्या आत कह्यात न घेतल्यास थेट मुख्यंमत्र्यांच्या निवासस्थानावर धडक देणार आहे.’’