जुने गोवे येथील ‘हातकातरो खांबा’ला संरक्षित स्मारक घोषित करण्यास ‘बफर झोन’चा अडथळा

(‘बफर झोन’ हा संरक्षित स्मारकापासूनचा १०० मीटर परिसर)

पणजी, ४ डिसेंबर (वार्ता.) – जुने गोवे येथील ‘इन्क्विझिशन पिलर’ किंवा ‘हातकातरो खांब’ संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यास ‘बफर झोन’चा अडथळा येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

पुरातत्व खात्याचे संचालक नीलेश फळदेसाई म्हणाले, ‘‘गोव्याच्या पुरातत्व खात्याने ‘हातकातरो खांब’ संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव सरकारकडे दिला आहे; मात्र याविषयी अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. एखादे स्मारक संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाल्यास स्मारकापासूनचा १०० मीटर परिसर ‘बफर झोन’ म्हणून अधिसूचित करावा लागतो. सद्यःस्थितीत ‘हातकातरो खांब’ हा रस्त्याच्या बाजूला आणि उड्डाणपुलाच्या खाली आहे. ‘हातकातरो खांब’ सध्या संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाल्यास स्मारकाच्या १०० मीटर परिसरातील व्यावसायिकांना विकासकामे करण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.’’