Andhra Pradesh : तिरुपती मंदिराजवळ ‘मुमताज हॉटेल’च्या बांधकामाच्या विरोधात हिंदूंचे आंदोलन !

  • सरकारने भूमी परत घेतली, तरी बांधकाम चालू

  • बांधकाम तातडीने थांबवण्याची मागणी

हिंदूंचे आंदोलन

तिरुपती (आंध्रप्रदेश) – येथील श्री व्यंकटेश्‍वर प्राणी उद्यानाजवळील मुमताज हॉटेलचे बांधकाम तातडीने थांबवण्याच्या मागणीसाठी हिंदू चैतन्य समिती आणि इतर हिंदू संघटन यांनी ३ डिसेंबर या दिवशी निदर्शने केली. टाटानगर येथील नगर विकास प्राधिकरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सरकारने हॉटेलसाठी दिलेल्या भूमीचा करार रहित केला असला, तरी येथे बांधकाम चालू आहे.

१. अलिपिरीजवळील भूमी परत घेण्याच्या तिरुमला तिरुपती देवस्थानम् बोर्डाच्या निर्णयाचे आंदोलनामध्ये सहभागी असलेले स्वामी श्रीनिवासनंद यांनी स्वागत केले; मात्र तरीही मुमताज हॉटेल बांधले जात असून ते तातडीने थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली.

२. बोर्डाने १९ नोव्हेंबर २०२४ या दिवशी एक ठराव संमत करून राज्य सरकारला अलीपिरीजवळील २० एकर जागेवर हॉटेल बांधण्यासाठी दिलेले वाटप रहित करण्याची मागणी केली होती. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जातील, असे म्हटले होते.

३. वर्ष २०२१ मध्ये तत्कालीन वायएस्आर् काँग्रेसच्या सरकारने तिरुपतीमध्ये पर्यटन आणि रोजगार यांना चालना देण्यासाठी पर्यटन प्रकल्प विकसित करण्याचा प्रस्ताव दिला होता. सरकारी आदेशानुसार मुमताज हॉटेल प्रकल्पात २५० कोटी रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणूक योजनेसह २० एकरांवर १०० अत्याधुनिक बंगले आहेत.