बेळगाव जिल्ह्यातील रेणुकामाता मंदिर परिसरातील ‘जोगणभावी कुंडा’च्या दुरवस्थेसह भाविकांसमोर अनेक अडचणी !

मंदिर प्रशासनासह जिल्हा प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष !

मंदिर परिसरात असलेल्या कुंडातील हिरवे झालेले आणि अस्वच्छ असलेले पाणी

कोल्हापूर, ४ डिसेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र, कर्नाटकसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील रेणुकामाता मंदिर येथे मार्गशीर्ष पौर्णिमेला मोठी यात्रा होत आहे. यात्रेला केवळ १० दिवसांचा कालावधी राहिला असून रेणुकामाता मंदिर परिसरातील ‘जोगणभावी कुंडा’च्या दुरवस्थेसह भाविकांसमोर अनेक अडचणी ‘आ’वासून उभ्या आहेत. कुंडातील पाणी हिरवे झाले असून त्याला दुर्गंध येत आहे. डोंगरावर भाविकांना पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय नसून लाखोंच्या संख्येने येणार्‍या भाविकांना पाणी विकत घेऊन प्यावे लागते. डोंगरावर कचर्‍याची समस्या असून भाविकांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. यात विशेषकरून महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होते. (मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! लाखो भाविक ज्यात स्नान करतात, ते कुंड जर वर्षानुवर्षे स्वच्छ होत नसेल आणि अन्य अडचणी सुटत नसतील, तर प्रशासनासाठी ते लज्जास्पद आहे ! हिंदूंच्या धार्मिक भावनांविषयी निधर्मी प्रशासन यंत्रणेला काहीही देणे-घेणे नसल्याने मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून ती भाविकांच्या कह्यात देणे, हाच त्यावरील उपाय आहे ! – संपादक)

१. ‘जोगणभावी कुंडा’ची दुरवस्था झालेली आहे. याची व्यवस्था एका खासगी ठेकेदाराकडे असून कुंडातील पाणी हिरवे झाले असून त्यावरील एका तवंगाला दुर्गंध येत आहे. यात्रेच्या कालावधीत जो ‘ओल्या अंगाने नेसण्यास येणारा लिंबाचा विधी’ आहे, त्यासाठी ठेकेदार प्रत्येक भाविकाडून ६० रुपये घेतो. अशा प्रकारे प्रत्येक भाविकाकडून पैसे घेत असूनही गेली कित्येक वर्षे या कुंडाची स्वच्छता होत नसल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

२. डोंगरावर असलेल्या स्वच्छतागृहांची स्थितीही चांगली नसून त्यांची नियमित स्वच्छता केली जात नाही. येथील कुंडात महिला भाविकांनी स्नान केल्यावर त्यांना कपडे पालटण्यासाठी कोणत्याही प्रकारची खोली नसल्याने महिलांना उघड्यावरच कपडे पालटावे लागतात.

३. डोंगरावर असलेल्या कचरा कुंडांची दुरवस्था असून त्यातून कचरा बाहेर पडत असतो. डोंगरावर स्वच्छतेसाठी पुरेसे कर्मचारी नसल्याने भाविकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागते. यात्रेसाठी गेलेल्या भाविकांनाच डोंगरावर स्वच्छता करावी लागते.

४. देवीच्या मंदिराजवळ ‘येनी कुंडी’ आहे. त्या ठिकाणीही महिला भाविकांना कपडे पालटण्यासाठी स्वतंत्र कक्ष नाही. येथे महिलांचे दागिने चोरण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. त्यासाठी त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी भाविक करत आहेत.

अनेक वेळा निवेदन देऊन आणि प्रशासनास प्रत्यक्ष भेटूनही भाविकांच्या अडचणींवर उपाय नाही ! – युवराज मोळे, माजी अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना

कोल्हापूर जिल्ह्यातून भाविक मोठ्या प्रमाणात रेणुकामातेच्या दर्शनासाठी जातात. आम्ही प्रत्येक वर्षी संघटनेच्या माध्यमातून एस्.टी. बससह भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करून देतो. गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांना भेडसावणार्‍या कुंडाच्या समस्येसह पिण्याच्या पाण्याच्या समस्येसाठी आम्ही मंदिर प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांस निवेदन देतो; मात्र त्यावर अद्याप म्हणाव्या अशा उपाययोजना निघाल्या नसून भाविकांच्या अडचणींत वाढ होत आहे.

गतवर्षी आम्ही ‘जोगणभावी कुंडा’तील पाणी आणि कुंड परिसर स्वच्छ न केल्यास लिंब नेसण्याच्या विधीवर बहिष्कार टाकण्यात येईल’, अशी चेतावणी दिली होती; पण यानंतरही प्रशासनास जाग आली नाही. आजही कुंडाच्या चारही दिशेच्या पायर्‍या स्वच्छ नसणे, कुंडाच्या शेजारी पुरुष आणि महिला यांना स्नानासाठी स्वतंत्र अन् बंदिस्त व्यवस्था नसणे, पुरेशी स्वच्छतागृहे नसणे यांसह अनेक समस्यांना भाविकांना तोंड द्यावे लागते. तरी या संदर्भात मंदिर प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी लक्ष देऊन भाविकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.

यात्रेच्या कालावधीत देवीच्या मुखदर्शनाची सोय व्हावी ! – भाविकांची मागणी

यात्रेच्या कालावधीत दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येत असल्याने दर्शनासाठी ४ ते ५ घंट्यांचा कालावधी लागतो. अनेक भाविक लांबच्या गावाहून येतात, यात वयोवृद्ध, महिला यांची संख्या असते. त्यामुळे इतके घंटे त्यांना दर्शनासाठी थांबावे लागते. दर्शन लवकर हवे असेल, तर मंदिर प्रशासन १०० रुपये, १५० रुपये आणि २०० रुपये घेऊन वेगळी रांग निर्माण करते; मात्र गरीब भाविकांना ते देणे शक्य नसल्याने त्यांना नियमित दर्शन रांगेतच उभे रहावे लागते. यावर उपाय म्हणून ‘कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटने’ने मंदिर प्रशासनास कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिराप्रमाणे आणि पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या दर्शनाप्रमाणे ‘मुखदर्शना’ची सोय चालू करण्याची मागणी केली होती; मात्र त्याची नोंद मंदिर प्रशासन घेत नाही.